Thursday, January 10, 2008

सूर्यनमस्कार यज्ञ, शक्तिची उपासना

या वर्षी दुसर्‍यांदा अमेरिकेत हिंदू स्वयंसेवक संघ या संस्थेने सूर्यनमस्कार यज्ञ आयोजित केला आहे. या यज्ञ कालावधित वेगवेगळ्या ठिकाणी सर्व सहभागी लोकांनी मिळून कमित कमी दहा लाख सूर्यनमस्कार करायचे असा या यज्ञाचा निर्धार आहे. दररोज केवळ सात-आठ मिनिटे देऊन सुद्धा आपण सूर्यनमस्काराच्या माध्यमातून निरोगी राहू शकतो याची जाणीव लोकांना व्हावी तसेच व्यायामाची, योगासनांची गोडी निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा हेतू. आम्ही गेल्या वर्षी या कार्यक्रमात सहकुटुंब सहभागी झालो होतो. त्यासाठी आम्ही या संकेतस्थळावरुन चलतचित्रफित उअरवून घेतली होती व त्यासोबतच आम्ही सूर्यनमस्कार करत असू. यज्ञाच्या २१ दिवसाच्या कालावधित सूर्यनमस्काराची जी सवय लागली ती अद्याप अखंडपणे चालू आहे. अगदी भारतभेटीला गेल्यावर तिथे सुद्धा नातेवाईकांसमवेत आम्ही सूर्यनमस्कार करत असू.

या उपक्रमात या संस्थेव्यतिरिक्त अनेक स्थानिक संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, मंदिरे, वगैरे सुद्धा सहभागी होत आहेत. गेल्या वर्षी तर एका राज्याने तर इतर काही शहरांनी या यज्ञा दरम्यान योग-दिन जाहीर केला होता. आपल्या संस्कृतीचा असा जागतीक प्रसार होताना पाहुन मनाला आनंद तर होतोच शिवाय त्यामुळे इतरांचेही कल्याण होते आहे हे पाहून आत्मिक समाधानही मिळते.

आपण सुद्धा या उपक्रमात सहभागी होऊन स्वतःचा फायदा का करुन घेत नाही?

----
या लेखावर येथे चर्चा चालू आहे.

No comments: