Friday, September 19, 2008

पाऊस - बालगीत

मागच्या जुलै महिन्यात इयत्ता सहावीच्या माझ्या भाचीला भेटायला गेलो होतो. तेव्हा त्या भेटीदरम्यात तिने एक छोटीशी मुक्त छंदातली कविता माझ्यासाठी लिहून दिली. ती अशी...

सर सर सर वारा सुटला
काळ्या ढगांना घेऊन आला||

रिमझिम रिमझिम पाऊस आला
इंद्रधनुष्य खुलवू लागला ||

वीज कडाडली कड कड कड
थेंबे बरसली टप टप टप||

झाडे वेली फुलपाखरे
आनंदली पशु पाखरे ||

धरतीचा हा सुगंध आला
आसमंती दरवळू लागला ||

धरती माता आनंदली
खुदू खुदू हसू लागली ||

--कु. प्राजक्ता वांजरखेडकर, अंबाजोगाई, इयत्ता ६वी

Wednesday, September 17, 2008

मुलींचा अनुशेष

या विषयावर येथे चर्चा सुरु आहे


मागच्या आठवड्यात आमच्या पुतणीला (वर्ग सहावी) राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कांस्यपदक मिळाले. या स्पर्धेत तिला व आमच्या बंधुंना (जे तिच्या सोबत अंतिम फेर्‍यांसाठी दिल्लीला स्पर्धेसाठी गेले होते) आलेले अनुभव ऐकून व्यथित होऊन आम्ही चाटच पडलो. कारण राष्ट्रीय स्पर्धा म्हटल्यावर चुरशीने होणार्‍या स्पर्धा तसेच स्पर्धकांव्यतिरिक्त आयोजक, पालक, स्नेही यांचा स्पर्धेतील उत्साह, उक्तंठा याची अपेक्षा होती. पण जे ऐकले ते असे...
१. महाराष्ट्रातून शालेय गटात केवळ एका मुलीसोबत तिचे पालक स्पर्धेला आले होते (अर्थात आमचे बंधु). बाकी मुलींच्या पालकांना एकतर या स्पर्धांचे महत्व नव्हते वा असूनही त्यांच्या अर्थिक परिस्थितीमुळे ते येऊ शकले नव्हते.
२. जवळपास सर्वच सहभागी मुली मध्यम वा गरीब घरातल्या होत्या. ... कदाचित सर्व श्रीमंत घरातील मुलींना डॉक्टर-इंजिनिअर बनायचे असेल??
३. बर्‍याच फेर्‍या खेळाडू अनुपस्थित राहिल्याने उपस्थित खेळाडूंना विजेते घोषित करून आटोपण्यात आल्या. एका सूवर्णपदक विजेत्या मुलीला शेवटच्या चार फेर्‍या खेळव्याच लागल्या नाहीत... तिच्या गटात स्पर्धकच नव्हते!
४. बहुतांश विजेत्या मुली "चला शासनाची नोकरी पक्की" या विचारानेच सुखावल्या होत्या.

आमच्या पुतणीला गेल्या वर्षी सुद्धा बर्‍याच स्पर्धांमध्ये हा अनुभव आला होता. कब्बडी, कुस्ती, लांब उडी, उंच उडी, मल्लखांब, दोर्‍यांवरच्या कसरती अशा अनेक खेळात जिल्हा पातळीवर एकदोन स्पर्ध येतात व विजयी होतात असे विदारक चित्र महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर पहायला मिळते.

काय चालले आहे हे? अशा पद्दतीने निवडल्या गेलेल्या खेळाडूंकडून आपण ऑलम्पिकमध्ये पदक आणण्याची आशा कशी करणार? आपण एक सुजान नागरीक म्हणून आपल्या आजूबाजूच्या मुलींना खेळांमध्ये या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी काय करु शकतो? खेळाने मुलांचा सर्वांगिण विकास होतो व अभ्यासाठी आवश्यक असणारे मनोबल, शारिरिक क्षमता निर्माण होते हे आपण पालकांना कसे पटवून देऊ शकतो?

मला वाटते मुलांच्या स्पर्धांमध्ये सुद्धा कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र असावे. मुलांमध्ये खेळाची आवड असणार्‍या व पालकांचा पाठिंबा असणार्‍यांचा कल सुद्धा जास्त करून क्रिकेट वा टेनिस, फुटबॉल अशा आजकाल पैसा/प्रसिद्धि देणार्‍या खेळांकडे असतो.

शासन दरबारी तर सगळा आनंदी आनंदच आहे. ऑलम्पिक समितीकडून कसलीही मदत न झालेल्या सूवर्णबिंद्राने स्वकष्टाने/स्वखर्चाने यशशिखर गाठले आणी आपल्या पुण्यात "भव्य" सत्कार झाला तो कलमाडींचा! का, तर कमिटीचे अध्यक्ष म्हणून!! यश मिळवलेल्या त्रिमुर्तींनी दोन्-तीन आठवडे प्रसारमाध्यमे गाजवली. त्यांच्यावर बक्षिसांची खैरात पण झाली. पण केवळ एक्-दोन महिन्यात आपली ही प्रसार माध्यमे, समाज व सरकार हे कदाचित या त्रिमुर्तींना विसरूनही गेले. येत्या काही वर्षात व पुढील पिढीत असे शेकडो अभिनव कसे तयार होतील याच्यावर कोणी काही केल्याचे ऐकीवात नाही. तेव्हा अशा या नाकर्त्या शासनाकडून काही अपेक्षा न ठेवलेल्याच बर्‍या.

पण मग खेळातला हा मुलींचाच नव्हे तर मुलांचा तसेच आपल्या देशाचा अनुशेष कसा भरून काढता येईल??

तिथींचा महिमा

आमच्या आजोबांनी लहानपणी शिकवलेले...


गुढी पाडवा एकाचा
तुकाराम बीज दोनाचा
अक्षय तृतीया तिनाचा
गणेश चतुर्थी चाराचा
नागपंचमी पाचाचा
चंपा षष्ठी सहाचा
रथसप्तमी साताचा
कालाष्टमी आठाचा
राम नवमी नवाचा
विजया दशमी दहाचा
आषाढी एकादशी आकराचा
कार्तिकी द्वादशी बाराचा
धनत्रयोदशी तेराचा
नरक चतूर्थी चौदाचा
हनुमान जयंती पंधराचा


आकड्यांचा महिमा चर्चा येथे सुरू आहे. त्यातून...

Thursday, September 11, 2008

अवडंबर

कथा काल्पनिक आहे. एखाद्या व्यक्ति वा परिस्थितीशी साम्य वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
वार्‍याची हळुवार आलेली झुळूक जशी मावळत्या उन्हात लांबच लांब कललेल्या झाडांच्या सावल्यांना झाडाच्या फांद्यांपेक्षा जास्तच हलवत होती तशीच ती लक्ष्मीच्या तगमगत्या देहावर हळूच गारव्याचा भासही देत होती. नेहमीच वक्तशीर असणारी लक्ष्मी आज उशीर होऊ नये म्हणून धडपडत होती. 'कशाला मी त्या जुनाट ट्रंकेतून या सगळ्या आठवणींच्या गाठोड्याला काढत बसले?' असे स्वगत विचारत ती एकएक वस्तू पुन्हा तीत ठेऊन देत होती. लग्नात माहेरुन आलेला बाळकृष्ण कितीतरी दिवसांनी पाहताना तिला अंमळ चुकल्यासारखे वाटत होते. पेटारा बंद केला पण बाळकृष्णाचा हाताला झालेला स्पर्श बर्‍याच आठवणींना जागा करून गेला होता.

काळोख दाटून येऊ लागला तसे लक्ष्मीनं दिवाणखान्यातले व माडीतल्या प्रशस्त खोल्यांचे मंद दिवे लावले. तशी आज तिच्याकडे लोकांची वर्दळही नव्हती.
- - - - -

लक्ष्मी जीवनात आली अन कालपर्यंतच्या गोरक्याला गाव हळूहळू गोरख म्हणू लागले . आई-बापाची, बायकोची काळजी घेणारा गोरख कष्टाळू होता. बहिनीच्या लग्नातले कर्ज या सालात मोकळे करुन पुढच्या पाडव्याला एखादी बैलजोडी घ्यायच्या जिद्दीनं रानात राब-राब राबत होता. बायको पण पदर कमरेला खोऊन साथ देत होती. म्हातारे आई-बाप होईल तेवढं जनवार-ढोर, खुरपनी, राखनी करायचे. सगळ कसं सुखात चाललं होतं. पण नदीला महापूर काय आला आणी सगळं होत्याचं नव्हतं झालं. आई-बापाला वाचवायला गोरख्यानं पुरात उडी मारली आणी सगळ्यांवरच काळानं झडप घातली.

पण मागे उरलेल्या लक्ष्मीला काम मिळालं ते बरं झालं. पोटचा अंकूर रोपटं बनू शकला. पुरग्रस्तांना मदत करायला परदेशातून पैसे आणलेल्या संस्थेने दवाखाना काढला. त्यात लक्ष्मीला काम मिळालं.

डॉक्टरच्या हाताखाली काम करता करता, पुढं नर्स झाली. जिल्ह्याच्या ठिकाणी त्याच संस्थेचा मोठा दवाखाना झाला. तिथं बढती मिळाली. दवाखान्यात व्यवस्थापनाची तसेच धर्मप्रचाराची धुरा मोठ्या नेटाने पुढे चालविली. पुढे संस्थेचा व्याप वाढला. संस्थेनं मोठी शाळा सुरु केली. तिथल्या बर्‍याच जबाबदर्‍या आल्या. पोर सुद्धा मोठं होत गेलं. संस्थेने पुढं त्याला विदेशात शिक्षणासाठी पाठवलं. चार गावात नाव झालं.

हे सगळं मिळवताना लक्ष्मीला काय कमी कष्ट पडले? पण आता हा कष्टाचा रगाडा ओढवत नव्हता. तसेही आजूबाजूच्या गावातल्या अनेक लक्ष्म्यांना पोटापाण्याची भ्रांत होती. त्यातली एक मालन. तिची गरज, तिची गुणवत्ता, हे सगळं बघता ती यापुढे आपली कामे यशस्वी रित्या करील अशी लक्ष्मीची खात्री होती. म्हणूनचा आज तिला लक्ष्मीनं खास बोलावून घेतलं होतं. लेकरांना चांगलं शि़क्षण, रहायला संस्थेची जागा, नोकरी, हे सगळं मिळणार म्हणून मोठ्या आशेनं आलेली मालन दारात वाट पहात उभी होती. ती दिसली तशी लक्ष्मी तिला सामोरी गेली. मालनला नोकरी, पगार, कामे हे सगळं समजाऊन सांगितलेलं होतच. बर्‍याच वर्षापूर्वी त्या पूरग्रस्त गावात तिच्याही जीवनाला अशीच नवी दिशा देणारा असा दिवस उगवला होता. त्यावेळीही असेच या संस्थेत मान असलेले, फादर रोड्रीग्ज कलकत्याहून पूरग्रस्त गावात आले होते. त्यांच्याशी ओळख करुन देऊन झाली. एवढा दीर्घ अनुभव पाठीशी असूनही त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सतत नवनवीन उपक्रम राबत राहणे ही त्यांची खासीयत होती. अशाच एका नवीन पर्वाची सुरुवात करण्यासाठी फादर तयार झाले.

कथेवरील प्रतिसाद व चर्चा येथे पहा

आख्खे काश्मीर भारतात!!

आज बीबीसी वाल्यांनी आमचा दिवस आनंदी करायला मदत केली बॉ.... चक्क पाक व्याप्त काश्मीर भारताच्या अख्त्यारीत दाखवून. हे पहा...

From Kashmir on BBC


नाहीतर नेहमी ते काश्मीरचा भूभाग हा असा दाखवतात ज्यात पाकव्याप्त काश्मीराला पाकीस्तान कंन्ट्रोल्ड काश्मीर उल्लेखले जाते.
From Kashmir on BBC


या विषयावर अधिक चर्चा येथे पहा

आपला,
(अखंड-भारतवादी) भास्कर

Wednesday, September 10, 2008

तुरुंग फोडायचा आहे

रोज आठ तास आम्ही तुरुंगात असतो. ५ बाय ५ च्या चौकटीत बसून बाहेरचे तापमान किती आहे ते संगणकावर पाहतो. बायकोचा फोन आला की लेकरांचा आवाज अस्पष्ट ऐकतो. आई-वडिल गावी कसे असतील याचा विचार करतो. किमान पुढच्या वर्षीची दिवाळी तरी भावंडासोबत घालवायची हा विचार करत ५ चा ठोका किती वेळाने पडणार असे म्हणत देवाने दिलेले सुंदर आयुष्य चार दमडीसाठी सडवतो.

हा तुरुंग फोडायचाय. ३६५ पैकी ३६५ दिवस शेतात उघड्या छातीने घाम गाळायचाय पण .... पोराबाळांच्या मुखात दोन घास जातील याची खात्री करून (मराठवाड्यातल्या शेतकर्‍याचे स्वप्न शेवटी!).

एक नाटक बसवायचय... दिनानाथ मध्ये चालवालया नाही पण संध्याकाळी गावच्या चावडीत दाखवायला.

आणी पंतप्रधान बनायचय.... समान नागरी कायदा करायला.

आपला,
(कैदी) भास्कर

http://www.misalpav.com/node/3391#comment-48221