Tuesday, November 18, 2008

दर्शन भारत मातेचे (भाग २)

मुंबई-पुणे दृतगती मार्गावरुन पुण्याला वळसा घालून शिक्रापूर मार्गे अहमदनगर-बीड असा आमचा प्रवास सुरु झाला. अद्यापपर्यंत दृतगतीमार्गावर दोनवेळेला टोल भरला होता. पण वाचलेल्या वेळामुळे अन हा महामर्ग नसताना पूर्वीच्या मार्गावर अनेकदा तासन तास घालवल्याच्या आठवणी विसरलेल्या नसल्याने हा टोल भरताना काही वाटले नाही.

पुढे पुण्याच्या वळणरस्त्यावर असताना बंधू म्हणाला, "अण्णा, पुढच्या वळणावर काही तरी गडबड असणार आहे". मी चमकलोच.
"तुझा अध्यात्मातला अभ्यास चांगला आहे. पण तुला भविष्य कधिपासून कळायला लागले?" मी प्रश्न टाकला. तसे आम्ही त्या वळणापर्यंत पोचलो होतो. आणि काय आश्चर्य तेथे एक अपघात झालेला होता. वाईट वाटण्यापेक्षा मला खूप राग आला होता.

प्लेगच्या बातम्या पसरल्या होत्या तेव्हा शासनाने उंदीर मारण्यासाठी ठिकठिकाणी सापळे लावले असल्याचे ऐकून होतो. पण येथे तर सरकारी लोकांनी प्रत्यक्ष माणसांना मारण्यासाठीच सापळा लावला होता. रस्त्याच्या कडेला बांधकामासाठी एक खड्डा खोदलेला होता व बांधकामासाठी आणलेल्या वाळूचा भर हमरस्त्यात ढीग घातला होता. त्याच्या बाजूला अंधारात सूचना देण्यासाठी साधे पांढरे दगड सुद्धा टाकलेले नव्हते. रात्रीच्या प्रवासात समोरुन येणार्‍या गाड्यांच्या दिव्यांमुळे हा ढीग दिसने शक्यच नव्हते. बंधूला मघाशी काय म्हणायचे होते ते मला चांगलेच समजले होते. त्याचे ते भविष्य कोणा शेमड्या पोराने सुद्धा वर्तवले असते पण शासनाला दिसले नव्हते... पण राग आणून करणार काय? सुदैवाने बंधू काल रात्री यातून वाचला होता. मुंबईकडे येताना त्याच्या समोरची कार अचानक उजवीकडे वळून या ढिगार्‍याला वळसा घालून पुढे गेली व हे या ढिगार्‍यावर चढले म्हणे. गती कमी असल्याने हे वाचले. पण त्या अपघातात सापडलेले जे कोणी होते ते सुदैवी नव्हते बिचारे.

असो. आम्ही जीव मुठीत घेऊन, भगवंताचे नाव घेत पुढे निघालो.


अशा पद्धतीची रहदारी बघितली नाही असे नाही. पण मध्येच उगीच पोटात गोळा आल्यासारखे होत होते.

पुण्याहून जसजसे मराठवाड्याच्या जवळ जाऊ लागलो तसतसे उघडी-बोडकी शेतं जास्त दिसू लागली. जुलैचा महिना पण एप्रिल-मे प्रमाणं कोरडं वाटत होतं. नगर जिल्ह्यात हमरस्त्याच्या बाजूला शेतात एक वस्ती होती. तिथं ही मुलं क्रिकेट खेळताना दिसली म्हणून त्यांच्याशी थोड्या गप्पा केल्या. शेतीची उन्हाळ कामं पारंपारिक पद्धतीनं उरकलेली होती. आता पावसाची वाट पाहनं चालू होतं. अन काम नाही म्हणून दररोज दिवसभर क्रिकेट खेळतो असं त्यांचं म्हणनं होतं.



शेणापासून स्वयंपाकाचा गॅस तसेच विद्यूत बनवता येते हे त्या मुलांना सुद्धा ठाऊक होतं. तसे प्रयत्न सुद्धा तिथे केले गेले होते पण योग्य मर्गदर्शन नसल्याने ते फसले. काही लोकांनी तर म्हणे जमीनीत खड्डे न खणता शे-दोनशे खर्चून जमीनीवरच नकली बांधकाम करुन बायोगॅसच्या योजनेचे पैसे खाल्ले होते. त्या तरुणांना विचारले तुम्हाला कुणी खरोखर मार्गर्शन केले तर तुम्ही बायोगॅस यशस्वी कराल का तर ते सगळे फिदी-फिदी हसले. आम्ही समजायचे ते समजून पुढे निघालो.

नगरपासून पूर्वेला बीडकडे जाणार्‍या रस्त्यालगत काही किमी वर हा यादवकालीन बारव आहे. उत्सुकतेपोटी त्यात पाणी किती आहे हे पहायला गेलो आणि...


याच्या कडेला ती माणसं बसली आहेत ना, त्याखाली छोट्या-छोट्या खोल्या आहेत. त्या वाटसरुंच्या निवार्‍यासाठी बनवलेल्या आहेत. त्यांची आता वाट लागलेली आहे हा भाग अलहिदा. या बारवाच्या बाजूला एक मंदिर होते (बहुतेक महादेवाचे) जे मुसलमानी राजवटीत नष्ट झाले. त्याचे काही अवशेष या कोरड्या बारवात पहायला मिळाले. आता तिथे केवळ एक छोटेखानी मंदिर उरलेले आहे.
हे विदीर्ण करणारे चित्र पाहून पुढे निघालो पण तेवढ्यात ग्रिष्मातल्या सरी याव्यात तशी एक आनंदाची झुळूक मनाला स्पर्ष करुन गेली.

<दिंडी व्हिडीओ>

या दिंडीच्या जवळ जाताच आम्ही गाडी थांबवली व वारकरी होऊन विठ्ठल नामात क्षणभर मन मग्न झाले. दुर्दैवाने आमच्या वाटा वेगळ्या असल्यानं पुन्हा गाडीत येऊन बसलो अन बीडाकडं निघालो.

दहा वर्षापूर्वी होता तसाच दहा ठिकाणी हाडं दुखावणाराच होऊनही दहा ठिकाणी विनाकारण टोल दिल्यामुळं दहा पटीने महाग झालेला प्रवास संपवून शेवटी आम्ही आमच्या मौज या गावी पोचलो.



बालपणीच्या आमच्या सवंगड्याने सुरु केलेले आमच्या गावातले हे दुकान. अशी आणखी दोन दुकानं गावात आहेत.

अशी उदास, भकास चेहर्‍याची बक्कळ माणसं आमच्या दुष्काळी भागात दिसतात.

हा आमच्या गावचे पुढारी द्वारकादास डावकर यांचा वाडा. काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षातून आत बाहेर उड्या मारण्यात, विधानसभा, पंचायत समित्या यांच्या निवडनुका लढण्यात अन मंत्री बनन्याची स्वप्नं बघण्यात हे साहेब एवढे मग्न असतात की वीज विकत घ्यायची असते हे माहित करुन घ्यायला त्यांना अद्याप वेळच मिळालेला नाही.

एकट्या बीड जिल्ह्यात विद्युत महामंडळाचे दर महिन्याला करोडो रुपयांचे नुकसान का होते त्याचे हे उत्तर.

----
क्रमशः

हा लेख मिसळपाव वर सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे. त्यावरचे प्रतिसाद वाचण्यासाठी येते टिचकी मारा (क्लिक करा).

Monday, November 17, 2008

कनकालेश्वर - ऐतिहासिक मानबिंदू

औरंग्याने महाराष्ट्रातल्या वास्तव्यात हजारो मंदिरे उध्वस्त केली. त्यातली बरीच मशिदींमध्ये बदलवली गेली, काही नामशेष झाली, काही आजही डगडुगीच्या/जिर्नोद्धाराच्या प्रतिक्षेत आहेत तर थोडी पुन्हा नव्याने उभारी घेऊन उभी राहिली. त्यापैकी एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे हे कनकालेश्वर...




बीड शहराच्या पूर्वेला बिंदूसरेच्या तिरावर असलेले हे महादेवाचे हजारो वर्षांपूर्वीचे मंदिर पुराणांमध्ये तसेच रामायणातही उल्लेखलेले आहे. काही पुराणांमध्ये परशुरामाने येथे महादेवाची स्थापना केली असा उल्लेख आहे. तर इतिहासकारांच्या मते हे किमान १००० ते १४०० वर्षे जुने असावे. याचे बांघकाम हेमाडपंथी स्वरुपातले आहे... केवळ दगडांवर दगड गुंफून हजारो वर्षे उभे असलेल्या या देवळाने केवळ ऊन, पाऊस, वारा यांचाच नव्हे तर मुसलमानी आक्रमकांच्या पहारी, हातोडे, तोफा, यांचाही सामना केला आहे.

या दुष्काळी/कोरड्या भागातही कोरडे न पडणार्‍या या तळ्याच्या मध्यभागी असलेल्या या देवळात जायला एक छोटा दगडी पूल आहे जो पावसाळ्यात पाण्याखाली असतो. त्यावरुन आत गेलो की हे प्रवेशद्वार दिसते.




अल्लाउद्दीन खिलजीचा मूळचा गुजराथ/राजस्थान या भागातला सेनापती महादेव कपूर ज्याचे धर्मांतर केल्यानंतर मलिक कपूर असे नामकरण करण्यात आले त्याने पहिल्यांदा या देवळावर आक्रमण केले. पुढे औरंग्याच्या कर्दनकाळी सैन्याने या मंदिरावर कमीत कमी २७ वेळा हल्ले केले. त्यात एकून एक सर्व मुर्ती भग्न केल्या गेल्या. हे मंदीर त्या नंतर बहुतेक वेळा हिंदूंसाठी बंदच होते. ते परत हिंदूंच्या हाती यायला १९४८ साल उजडावे लागले.

या देवळाच्या आत सर्व भिंतीवर देवदेवतांच्या सुबक व कोरीव भग्न मूर्ती त्या आक्रमकांच्या क्रौर्याची साक्ष आजही देतात.



गाभ्यार्‍याच्या छताचे मूळ कोरिवकाम सुदैवाने आजही सुरक्षित आहे. ते पाहताना मंत्रमुग्ध व्हायला होते. या देवळाला त्याच्या या श्रीमंतीमुळे/वैभवामुळे कनकालेश्वर हे नाव पडले. (कनक = सोने, सूवर्ण).



या मंदिराचे पुजारी कल्याण महाराज हे प्रसिद्ध समाजसेवक आहेत. त्यांच्या मते हे देऊळ स्वातंत्र्य मिळण्याच्या काळात जर हिंदूंनी मिळवले नसते तर याचेही बाबरी झाले असते. त्यांचे हे म्हणने किती वास्तववादी आहे याची प्रचिती याच शहरातील आणखी एक मंदीर (पद्मावती मंदीर) जे की आज एका विशाल मशिदीमध्ये रुपांतरीत झालेले आहे त्याकडे पाहून येते. तेथे मदरशे म्हणजे आतंकवादी तयार करण्याचे कारखाने मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तर या कनकालेश्वर मंदिरात अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. जसे की या मागास भागातल्या ग्रामीण व गरीब कुटुंबातल्या लग्न कार्यांसाठी हे देऊळ अगदी वाजवी दराने दिले जाते, वगैरे.



येथे कर माझे दोन्ही जुळती.

जाता-जाता - दहावीच्या परिक्षेच्या काळात देवळाचा हा भाग माझी दिवसभराची अभ्यासाची खोली होता.

बहेर रणरणते ऊन असू देत पण येथे मात्र कसे थंड-थंड वाटे. बरेचदा अभ्यास सोडून मी या तळ्यातल्या रंगिबेरंगी माशांना पहात तर कधी कधी ते सुंदर कोरीव नक्षिकाम तासन तास न्यहाळत बसे.
कनकालेश्वराच्या या तळ्यात एक ते दोन फूट लांबीचे वेगवेगळ्या रंगाचे चमकदार मासे हे बच्चे कंपनीचे विषेश आकर्षण होते. पण या काही वर्षात ते मासे नष्ट झाल्याचे कळते. तसेच या तळ्यात गाळही खूप साचला आहे. लोक या तळ्यात गणपती विसर्जन करतात. तसेच निर्माल्यही फेकतात. ते थांबायला हवे नाहीतर हे तळेच नष्ट व्हायचे.

असे हे आमचे कनकालेश्वर मंदिर... आम्हा बीडकरांचे श्रद्धास्थान, आमच्या पूर्वजांच्या वैभवाचे, लढवय्येपणाचे प्रतिक... सध्या त्या वैभवशाली वारशाच्या वारसदारांकडून योग्य त्या काळजी अभावी एकटेच परिस्थितीशी झुंज देत उभे आहे.

या विषयावर मिसळपाव वर चर्चा चालू आहे. येथे क्लिक केल्यास वाचता येईल.

Tuesday, November 11, 2008

दर्शन भारत मातेचे

प्रत्येक वेळी भारतात जायचं म्हटलं की तो दिवस उजाडण्याची उक्तंठा लागून राहिलेली असते. विमानात बसल्यावर वाटतं की किती हळू हळू उडत आहे हा उडन खटारा! भारतात गेल्यावर काय काय करायचं याचे बेत मनात गर्दी करत असतात. घरी गेल्यावर दार कोण उघडेल. आई का भाऊ का वहिणी? आई-वडिलांच्या डोळ्यांच्या पानावलेल्या कडा, त्यांचे गोंजारणे, पाठीवरुन त्याच मायेने फिरणारा आजीच्या थरथरत्या हाताचा मायेचा स्पर्श, भावंडांच्या भेटीतला आनंद, मध्येच एखाद्या बहिनीचेही पानावलेले डोळे चोरुन पुसणे, "किती मोठी झाली आहे गं तू" असं आईचं तिच्या नातीला लाडानं बोलनं... मन अगदी अधीर होतं देशात पोहचण्यासाठी. तसच मागच्या भेटीतही झालं.

समोरच्या टिव्हीवरून हळू हळू युरोप पार करुन आखाताच्या पुढे सरकणारं विमान कधी एकदा मुंबईत पोचणार आणी कधी एकदा पवित्र मायभूमीचं दर्शन होणार असं झालं होतं. प्रवासात मनात अनेक विचार तरळत होते, आठवणी जाग्या होऊन जात होत्या. त्यापैकी एक डॉ. कलामांनी परदेशस्थित भारतीयांना उद्देशून केलेल्या भाषणाची. परदेशात असताना जसे काटेकोर नियमाचे पालन करता तसे भारतात आल्यावर सुध्दा का करत नाही या अब्दुल कलामांच्या प्रश्न वजा अवाहनाला यावेळी तंतोतंत पाळायचे असे अनाहुतपणे मनाने ठरवले. एरव्ही सुद्धा तसा मी नियमांचे पालन करतो पण यावेळी कटेकोर करायचे ठरवले.

शेवटी एकदाचं विमान मुंबईत उतरलं आणी आम्ही प्रवासी विमानतळात प्रवेश करु लागलो. दरवेळे प्रमाणे यावेळी सुद्धा नुतनीकरणाचं काम चालूच होतं. त्याचं ओंगळ प्रदर्शन व तिथला बुरसट वास आपण योग्य गावी आल्याची सुचना मेंदूपर्यंत पोचवून गेला. आम्ही सगळे दाटीवाटीनं बारीला लागलो. काही तासांपूर्वी युरोप-अमेरिकेतल्या विशाल व भव्य-दिव्य विमानतळात असणारे या चिमुकल्या विमानतळावर पोचलोच होतो तेवढ्यातच काहींच्या देशाच्या ओंगळपणाला लाखोल्या सुरु झाल्या. मला मात्र डोळ्यासमोर माझं घर, आई-वडिल, भावडं दिसत होती. काही तासांनी भाचे कंपनी "मामा मामा" करत आपल्या अंगा खांद्यावर उड्या मारत असतील या सुखाच्या कल्पनेत असलेल्या मनाला तेवढ्यात कोणाच्या तरी खेकसण्याने ताळ्यावर आणले. समोरच्या कुटुंबाचा खिडकीपाशी नंबर लागलेला होता.

"हे फॉर्म पासपोर्टात लावा अन मग द्या. शिकले सवरलेले आहेत म्हणे हे", त्या कुटुंबाचे सरकारी स्वागत कारकुनाने केले. त्या कुटुंबातल्या बापड्याने अज्ञेचे पालन करुन पुन्हा पारपत्रांचा गठ्ठा टेबलावर ठेवला. आपल्याला अत्यंत महत्वाचे वाटणारे पारपात्र म्हणजे या कारकुनांना किराणा दुकानातल्या रद्दीसमान आहे याची जाणीव आपल्याला व्हावी म्हणून की काय ठप्पा मारण्यापूर्वी त्याने ते पारपत्र अगोदर उलटे दुमडले व मग सरळ केले. एव्हाना पारपत्र धारकाचा जीव केविलवाना झालेला होता. तितक्यात दुसरे पारपत्र उघडून त्याने पुन्हा एक षटकार मारला.

"तुमची बायको अगोदरची का मुलगा?" कारकूनाचा प्रश्न न उमगलेला बाप्या म्हणाला, "म्हणजे?"
"अहो, बायकोचा पसपोर्ट मुलांच्या अगोदर लावायचा असतो. हॅ काय हे!" असे कुरकुरत कारकूनाने तो गठ्ठा परत त्या बाप्याकडे सरवला, "क्रमाने लाऊन द्या पुन्हा"... त्या बाप्याच्या चेहर्‍यावरचा संताप आता स्पष्ट दिसत असतो. ठप्पे लावण्यासाठी क्रमाची काय गरज? बरे उरलेली दोन पारपत्रे कोणाची आहेत हे समोरच्या कुटुंबाकडे पाहून शेंबड्या पोरानेही सांगितले असते. मग असा हेकटपणा का? माझ्यासारख्या बघ्यांना त्या कारकूनाच्या वागण्याने संभ्रमात टाकले. तसे मी आपले पारपत्र व कागदपत्रे व्यवस्थित क्रमाने लावलेली आहेत याची खात्री करुन घेतली. आम्हाला मात्र येथे नशिबाने साथ दिली व आम्ही त्या कारकूनाचे काही ऐकून न घेता आपले काम उरकते झालो.

आता पुढचा टप्पा. आपले सामान कुठे मिळणार म्हणून काही प्रवासी उगीच कुठे दिशादर्शक वा माहिती फलक आहेत का हे शोधत असल्यासारखे दिसत होते. तर काही जन "काय वेडे हे? अजून अमेरिकेतच आहोत का काय असं वाटतय वाटतं ह्यांना", अशा भावनांनी जमिनीवर उतरलेले असावेत असे वाटत होते. कारण ते बॅगा कुठे मिळणार याची देशी पद्धतीने चौकशी करत होते. दरम्यान गणवेशधारी विमानतळ कर्मचार्‍यांनी मला एव्हाना चार-पाच वेळा हटकले होते, "साठ डॉलर द्या, तुमच्या बॅगा काढून देतो. कितीही सामन आसू द्या साहेब... कॅमेरे, डिव्हिडी... आगदी बाहेर पोचवतो. बरं चला चाळीस द्या."

"अरे बाबा माझ्याकडं खरच काही नाहीये. तुम्ही सोडा मला", असे म्हणत मी माझे सामान घेऊन सगळे सोपस्कर करीत बाहेर आलो. सही सलामत बाहेर आल्यावर मनात उगीच विजयी भावना उत्पन्न झाल्या.

गाडीकडे जाताना मी काहीतरी शोधतो आहे हे आमच्या ड्रायवर ने हेरले. "साहेब, चहा शोधताय का मुतारी?" त्याने सरळ प्रश्न विचारल्यावर त्याला मी खिशातून चिंगमची रिकामी बेगडं काढून दाखवली. "मघाशी रांगेत असताना चिंगम चघळायला काढलं त्याची टरफरलं (बेगड) टाकण्यासाठी केव्हाची कचरापेटी शोधतोय पण सापडतच नाही", असे सांगितल्यावर मिश्किल हसत तो म्हणाला, "आना इकडं". अन क्षणार्धात त्याने तो कचरा माझ्या हातातून घेऊन रस्त्याच्या कडेला फेकला सुद्धा.

"कलाम सर, माफ करा. पहिली चूक. पुढच्या वेळी आम्ही कचरा कचरापेटीतच टाकू हो, पण ती आहे कुठं?" असा प्रश्न मनातल्या मनात कलाम साहेबांना विचारत गाडीपाशी पोचलो. दरम्यान गाडीत न बसल्याने एक मोठी बॅग गाडीच्या टपावर विराजमान झाली होती. आमची दिंडी गावाकडे निघाली.

तोच अंधेरी-कुर्ला मार्ग. उसाचा रस प्यायचो ती रसवंतीची जागा, ते वड्याचे गाडे, मित्राचा छोटेखानी कारखाना असलेली अरूंद बोळ अशा अनेक ओळखीच्या खुना न्यहाळत मुंबईच्या बाहेर पडलो.

"ये ती बॅग खाली काढून दाखव", नाक्यावरच्या हवालदाराने आमच्या ड्रायवरला फर्मान सोडले. बॅगा उघडून बघण्या अगोदर हवालदाराने मला विचारले, "ओ, काही सामान नसेल तर उगीच कशाला बॅगा उचकायला लावता?"
"तुमच्या कामात मी कशाला अडथळा आणू?" या माझ्या प्रश्नावर साहेबाची स्वारी जरा नाराज झालेली दिसली.
"मग सगळ्या बॅगा तिथं चौकीपशी घेऊन चला", हवालदारानं आदेश सोडला.
"भाऊंना फोन करु. म्हणजे इथं वेळ जाणार नाही", लहान बंधुने सल्ला दिला. पण कलाम सरांना दिलेल्या वचनामुळे मी त्या सल्ल्याला न बधता हवालदाराला सगळे सामान उचकटून टाकण्याची संधी दिली.
"या कंपूटरची पवती कुठं आहे?" काहीतरी सापडल्यामुळे त्याला आनंद झाला होता. पावती दाखवली.
"पावती तर ३ वर्षे जुनी आहे. याचीच कशावरून?", हवालदार त्याचे काम इमान ऐतबारे करत होता. म्हटलं संगणक बघून खात्री करुन घे. तर म्हणतो, "ते तपासायला तुमचा कंपूटर इथं जमा करुन घ्यावा लागेल."
म्हटलं हा काय कायदा आहे बुवा. तर तेच फिल्मी उत्तर मिळाले की आम्हाला कायद्याची भाषा शिकवू नका वगैरे. म्हटलं ठीक आहे. कोणत्या कायद्यानं जमा करायचा आहे ते पावतीवर लिहून द्या. मी तो न्यायला पुन्हा येईन. तर त्यावर हवालदार साहेब म्हणाले, "तुम्हाला ही तपासणी होईपर्यंत इथेच थांबावे लागेल".

मी पण मग निवांत उभा राहिलो. पुन्हा त्या हवालदाराला थोडा आनंद झाला. आता कॅमेरा सापडला होता. त्याचीही पावती दाखवली. पावत्यावरुन गिर्‍हाईक परदेशातून आलं आहे याची जाणिव साहेबाला झालेली होती. सामानात बाकी काही सापडले नाही. तसा पाच्-दहा मिनिटात दुसरा गणवेशात नसलेला त्याचा सहकारी म्हणाला, "काय साहेब, दोन्-चारशे द्यायचे. निघायचं. उगं कशाला टाइम पास करता फॉरेनवून आल्या आल्या". त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता मी तसाच उभा होतो. शेवटी त्यांनी कंटाळून आम्हाला तिथून निघण्यास सांगितले. तशी पडत्या फळाची अज्ञा समजून आम्ही पण निघालो. वाटले चला सगळे आडथळे पार पडले. आता सरळ गावी जाऊ.

पण कदाचित नशीब म्हणत होते. ये तो अभी शुरुवात है, आगे आगे देखो होता है क्या...

क्रमशः

वा लेखावर मिसळपाव वर भरपूर व गरमागरम चर्चा चालू आहे. ती पाहण्यासाठी येथे टिचकी मारा (क्लिक करा).

सेवाभावी (भाग १)

भाऊसाहेबांचा पंधरा वर्षाचा दबदबा मोडीत काढून अशातच मिसरुड फुटलेला तरणाबांड गोकूळ सरपंच झाला. चांगलं कमावलेलं शरीर, *सटीच्या जत्रात मागच्या पाच दहा वर्षात हमखास कुस्त्या मारलेल्या गोकूळचं बोलणं मोठं भारदस्त पण लाघवी. कुस्तिच्या आखाड्यात तसेच कबड्डीच्या संघात खास दोस्त बनलेले त्याचे मित्र ग्राम पंचायतीत उर्वरीत गटांमधून निवडून आणलेले. आठ पैकी सात जागा घेऊन पॅनलनं भाऊसाहेबाला चांगलाच लोळवला होता. आता गावालाही या तरण्या पोरांकडून चांगल्या अपेक्षा होत्या. तशी गावात ग्रामसभेची दंवंडी झाली.

"आरं शिवा, हे ग्रामसभा काय हाय रं?", तमाकू चोळत चोळत घरातून बाहेर पडत नानांनी ग्राम पंचायतीवर निवडून आलेल्या आपल्या लेकाला प्रश्न टाकला.
"नाना, गावातल्या सगळ्या लोकांनी मिळून ठरवायचं आपल्याला काय काय करायचं ते. आन मग आमी गोकूळसंग जाऊन तहसीलमधून त्या कामाच्या मंजूर्‍या आणायच्या," शिवाने उत्साहाने उत्तर दिले.

या नव्या आणी हव्या हव्या बदलाने सगळेच गावकरी आनंदले होते.

"खंडोबाच्या तसंच गावातल्या सगळ्या वडीलधार्‍या मंडळींच्या आशिर्वादानं आन संवगंड्यांच्या प्रयत्नानं आपण आज आपल्या गावात इतिहास घडवलाय", नवीन सरपंच गावाकर्‍यांना सांगत होता, "आजपर्यंत ह्या अशा ग्रामसभा झाल्याचं कुणी कधी बघितलय का? नाही. कारन ह्या सभा व्हायच्या त्या आपल्या भाऊसाहेबांच्या चमच्यांच्या दप्तरात. तर आता बोला मंडळी आपल्याला काय सुधारणा करायच्या आहेत येत्या वर्षात?"

सुरुवातीला संकोच कराणारे गाववाले एकाने सुरु करताच एका नंतर एक बोलू लागले. कोणी म्हणत होता आधी बोरेवेल घेऊन दोन्-चार हापशे बसवून पाण्याचा प्रश्न सोडवायला हवा तर कोणाला आपल्या घराच्या बाजूची हगणदारी हटवायची होती तर कोणाला पाटाच्या पाण्याच्या आळी-पाळीत आपल्या गावचा नंबर आधी लावायचा होता. पण पुन्हा सगळे शांत झाले ते शांताबाईच्या मागणीवर, "मपल्या धोंट्याचा बाप मपली रोजंदारी उचलून दररोज ढुंगण उताणा करुन बेंदाडात पडतोय. गोकूळा, बा आता तूच सोडव मला ह्याच्यातून. एक तर हातभट्टी बंद कर न्हायतर प्यानार्‍यायला उचलून कुटं तरी गाडून ये".
धोंड्याच्या बापाप्रमाणे पिण्याची सवय असणार्‍या सर्व जणांच्या चेहर्‍यांवरचा उत्साह येव्हाणा मावळला होता.

"शांता काकी म्हणती ते बराबर हाये पण तिचं ऐकलं तर समदे पिदडे आपल्या विरोधात जातेल", रमेश शिवाच्या कानात कुजबुजला.

"ठीकय मंडळी, आता हे सगळेच विषय घेऊन आमी सगळे सदस्य तहसीलात जातो. एक एक करुन सगळ्याच गोष्टी करु आपण. पण जरा धीर धरा", गोकूळने वेळ मारुन घेतली अन सभा पण आटोपती घेतली.

आता ग्राम पंचायतीच्या आठ पत्र्याच्या त्या उजाड कार्यालयात नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांव्यतिरिक्त भिंतीवर लटकलेले गांधी आणि नेहरु ते काय उरले होते. बाकी ग्रामस्थांनी आपापल्या शेताकडे, गुराढोरांकडे आपला मोर्चा वळवला होता.

"गोकूळ, आपल्यला सालाकाठ किती फंड मिळणार हाये? आन त्याच्यात हे सगळं कसं भागणारे? आन मर्दा, आपलं ते सेवाभावी संस्थेचं कधी सुरु करणार?" रमेशला काही केल्या हे प्रश्न पोटात ठेवणे भाग नव्हते.

"जरा चड्डीत र्‍हा ना भौ! बुळकांडी लागल्यागत यवढा कामून घायी करायला तू?" शिवानं त्याच्या भाषेत प्रेमाचा सल्ला दिला.

"आरं गड्या शिवा, रम्या मनतोय ते पन बराबर हाये. आपण आतापसून ठरविलं तरच हे जमणार हाये. नाईतर पाच वर्षे कसे निघून जातेन कळायचे बी न्हाईत," गोकूळने दूरवच्या पिंपळाच्या उंच शेंड्याकडे बघत शिवाला बुचकळ्यात टाकले.

"रम्या, तू एक काम कर. मी तुला गायकवाड सायबानी दिल्याले पॉम्प्लेट देतो. त्याच्यात सरकारी योजना आन त्याला मिळणारे फंड ह्यांची रितसर लिश्ट हाये. त्या योजना आपल्याला कशा महत्वाच्या हायेत हे तू एका कागदावर लिहून काड. आन मग आपण संस्था रजिस्टर करायचा फार्स उरकून घेऊ." रमेशला त्याच्या आवडीचे काम देऊन गोकूळ आता शिवाकडं वळला, "गड्या शिवा, तुला गावात लयी सज्जन मानत्येत. आन तू बी तसा हाईस. तवा तू कनाय हे हापशे, हाणदारी, दारु भट्टी असल्या गोष्टीत लक्ष घाल. उपसरंच हायेस लेका तू."

"मंजे तुमी सगळे गावचे काम करणारे सज्जन आन मी मंजे संस्था टाकून तिच्यात चरायला सोडल्याला कठाळ्या व्हय रं? मायला म्हंजे पुडच्या टायमाला माझा पत्ता कट करायचा हाय का काय तुमा दोघांना," रम्यानं बरोबर हेरलं होतं. तसा गोकूळ त्याच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला, "आरं पाच वर्षात तू संस्था टाकून दुसरा भाऊसाहेब झालास तर लोकं तुला निवडून थोडेच देणार हायेत. तवा तुझ्या एखाद्या भावाला तिकीट देऊ. आता रेंद्यात हात घालायचा मनल्यावर जरा लांब र्‍हावा लागन का न्हाई. पन मनून आपन सगळ्यांनी तेच केलं तर कसं जमायचं? आन तूच तर मनीत व्हतास की आपल्याला एक टर्म दिली तरी बास पण संस्था काढाय मिळाली मंजी झालं. काय बराबर का न्हाई?"


क्रमशः

टीप - ही कथा सत्य घटनेवर आधारित असली तरी काल्पनिक आहे.
*सट: चंपाषष्ठी. खंडोबची जत्रा असते या दिवशी.


टीप:
ही कथा येथे पूर्वप्रकाशित केलेली आहे.

खपली

रुतलेल्या सहस्त्र जखमा
मी सांभाळतो उराशी
रुदनाचे सोयर तुटले
मज खंत ना जराशी

आक्रोश ना कदापी
ना द्रोह जीवनाशी
अजुनी सजीव आहे
ना राग हा तुझ्याशी

गाऊ नको वॄथा तू
माझी मलाच गाणी
वांझोट्या स्वप्नांनीही
मानले रिक्त हे पाणी

जा सोड इथेच आता
चल मोह पाश तोडू
झेपेना स्पर्ष हताचा
खपली नकोस काढू

टीप : ही रचना येथे पूर्वप्रसिद्ध केलेली आहे.

Tuesday, November 4, 2008

फ्वॉरेन रिटर्नचा समाचार!!

भारतातल्या काही मित्रांकडून मागच्या ३-४ वर्षात बरेचदा एक अजब इमेल आलेला. म्हटलं एकदा त्याच्यावर काय ते वैयक्तिक मत येथे मांडून ठेवावे व आला इमेल की पाठव हा दुवा हा मार्ग अवलंबावा. कोणी तरी अमेरिकेतून भारतात गेला आणि त्याचे कोणीतरी निरिक्षण करुन २१ मुद्धे तयार केले. तो फ्वॉरेन रिटर्न अतिशयोक्तिने वागत होता की हे मुद्दे लिहिणारा हे ते दोघे वा साक्षात देवच जाणो. बरेच मुद्दे केवळ pure exaggeration आहेत. तर काही गंमतीशीर आहेत.

21. Tries to use Credit Card in road side Hotel.
च्या मारी, कोण रे तो श्याणा!

20. Drinks and carries Mineral Water and always speaks of Health. (proving to be very health conscious).
आम्ही तर बॉ रस्त्याच्या कडेला पावभाजी, पाणीपुर्‍या खाल्ल्या. पण या मुद्यात दम आहे बरं का मंडळी. अमेरिकेत बरेच दिवर राहुन भारतात गेल्यावर जाम अजारी पडणारी अनेक मुले मी पाहिले आहेत. माझ्या पोरीला सुद्धा किडणी इन्फेक्शन झाले होते. हो, तिला आम्ही मिनरल पाण्याच्या बाटल्या अथवा उकळवलेले पाणीच दिले तरीही. डॉक्टर म्हणाले की हवेत असणार्‍या प्रदुषित धुळीमुळे व त्याची मुलांना सवय नसल्याने हे होतेच होते. तेव्हा एखाद्याच्या तब्येतीला झेपत नसेल तर त्याला उगीच दाताड काढण्याचा मुर्खपणा आम्ही तरी टाळतो.

19. Sprays DEO such so that he doesn't need to take bath.
काही तरीच!!

18. Sneezes and says 'Excuse me'.
अमेरिकेत आल्यावर मला जाणवलेल्या शिष्टाचारातली ही एक गोष्ट. चालताना चुकुन समोरासमोर आल्यावर भारतात "च्यायला दिसत नाही का" हे ऐकणे जसे सामान्य आहे तसेच किंबहुना त्याहुनही जास्त सामान्य "उप्स, आय ऍम सॉर्री" अथवा "Excuse me" हे ऐकणे सामान्य आहे. आणि काही कालावधी नंतर समाजातून अशा सवयी आपल्यात नेहमीच येत असतात. ही सवय वाईट नाही व हिला समांतर असा शिष्टाचार मराठीत नाही. आम्ही शिंक आल्यावर "श्री राम" अथवा "विठ्ठला, पांडुरंगा" अथवा केवळ "देवा" असे म्हणतो.

17. या सतराव्या मुद्यातील खाली दिलेल्यापैकी काही गोष्टि अतिशय सामान्य आहेत तर काहींमध्ये लक्ष देण्यासारखे आहे. (पुन्हा एकदा - ज्या अतिशयोक्ति आहेत त्यांना आम्ही फाट्यावर मारतो).

Says "Hey" instead of "Hi".
आम्ही हे दोन्हीही वापरत नाही. अमेरिकन लोकांशी वा कार्यालयीन कामांबद्दल बोलताना आम्ही लोकांना "हेलो" म्हणतो तर देशी बांधवांना "नमस्कार्"च म्हणतो. गंमत म्हणजे ज्या ज्या मित्रांनी हा इमेल मला पाठवला ते मात्र आवर्जुन "Hey" अथवा "Hi" म्हणतात असा अनुभव आहे. :)

Says "Yogurt" instead of "Curds".
अमेरिकेत सहसा योगर्टच मिळते. त्याला कर्ड म्हणने चूक आहे. तसेच भारतात योगर्ट म्हणने हा शुद्ध गाढवपणा आहे. अशा गाढवांच्या ढुंगणावर लाता माराव्यात ;)

Says "Cab" instead of "Taxi".
हे दोन्ही शब्द भारतात तसेच अमेरिकेत आलटून पालटून वापरले जातान मी पाहिले आहेत. तेव्हा या मुद्द्यांमध्ये याचा उल्लेख करणाराच गाढव म्हणावा लागेल.

Says "Candy" instead of "Chocolate".
उलट भारतातच गोळीला सुद्धा चॉकलेट म्हणताना पाहिले आहे. कँडी आणी चॉकलेट यांचा वापर विशिष्ट पदार्थांसाठी होतो ही माहिती हे मुद्दे लिहिणार्‍या आडाण्याला नसावी असे दिसते. स्वतःचे ज्ञान पाजळायचे अन दुसरे काय?

Says "Oh" instead of "Zero", (for 704, says Seven Oh Four Instead of Seven Zero Four)
Says "Cookie" instead of "Biscuit".
पुन्हा तेच. वरील दोन्ही मुद्द्यांशी समांतर.

Says "Free Way" instead of "Highway".
अमेरिकेत हायवे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बहुसंख्य हायवे हे फ्रिवे प्रकारातले असतात ज्यांवर सिग्नल नसतो तसेच काही कर द्यावा लागत नाही. बाकी टोलवे, बेल्टवे (रिंग रोड) , वगैरे असतात. फ्रीवे शन्दाचा वापर हा सवयीचा परिणाम असावा. अर्थात आमच्या बाबतीत तसे होत नाही. भारतातले बरेच हायवे हे फ्रि वे प्रकारातले आहेत. मुंबई-पुणे हायवे चा उल्लेख मात्र एक्सप्रेसवे असा होतो. त्यात अक्षेप घेण्यासारखे ते काय?

Says "Got To Go" instead of "Have To Go".
पुन्हा लेखकाच्या बौद्धिक दिवाळखोरिचा नमुना.

16. Doesn't forget to crib about air pollution. Keeps cribbing every time he steps out.
भारतीय माणूस अंमळ बडबडा आहे. त्याच्या मनात जास्त काही रहात नाही. भारतात रहातात ते काय प्रदुषनाबद्दल ओरडत नाहीत? भारता पेक्षा कितीतरी पटीने जास्त पेट्रोलियम पदार्थ, प्लास्टिक, अशा प्रदुषणकारी वस्तू वापरुनही अमेरिकेत प्रथमदर्शनी कोठेच प्रदुषण दिसत नाही. तेव्हा आपल्या भावना जास्त प्रकर्षाने प्रकट होतात असे वाटते. अर्थात काही महानग स्वतः काही करुन दाखवण्यापेक्षा आपल्या देशाचा नावाने बोंबा मारण्यातच धन्यता मानतात हे सुद्धा मन्य.

15. Says all the distances in Miles (Not in KiloMeters), and counts in Millions.(Not in Lakhs)
अमेरिकेत आल्यावर काही दिवस मैलांचा वापर कसासा वाटतो. पण नंतर सवय पडून जाते. अर्थात हीच सवय पुढे भारतात गेल्यावर सुरु ठेवण्याची गरज नाही. काही सवंग लोक जर मुद्धामहुन तसे करत असतील त्यांची कीव करावी. काय म्हणता?

14. Tries to figure all the prices in Dollars as far as possible (but deep down the heart multiplies by 43 times).
हे मात्र काहितरीच. मला तरी भारत भेटीत रुपये वापरताना डॉलरचा विचारही डोक्यात येत नाही. हो मात्र अमेरिकेत बरेचदा रुपयांचा विचार येतो. जर हे कोणी मान्य करत नसेल तर पुन्हा त्याच्या सवंगपणाची कीव करावी.

13. Tries to see the % of fat on the cover of a milk pocket.
अमेरिकेत बरेच वर्षे राहिल्यावर या बाबतीत थोडाफार फरक होणारच म्हणा. जर तुम्ही डोळस असाल तर टिव्हीवरच्या जाहिराती वा दुकानात आकर्षक पद्धतीने ठेवलेले व त्यातल्या फॅट मधील प्रमाणानुसार वेगवेगळे केलेले पदार्थ तुम्ही नजरेआड करु शकता काय? आता हेच पहा, तुम्हाला दूध आणायचे आहे. दुकानात विटॅमिन डी वाले होल दूध, एक टक्का, दोन टक्का वा अगदीच फॅट नसलेले दूध पुन्हा ते ही साधारण वा ओर्गॅनिक असे विभागून ठेवलेले असते. अमेरिकेत प्रत्येक खाद्य पदार्थावर त्यात काय आहे व ते कशापासून बनवलेले आहे हे लिहिलेले असने आवश्यक असते. आम्ही सुद्धा आता सगळ्या पदार्थांवरची ही माहिती वाचून मगच खरेदी करतो. काय सांगा पुजेच्या प्रसादासाठी आणलेल्या एखाद्या पदार्थात मांस असेल तर! असो. अशा वातावरणात काही वर्षे राहिल्यावर सहजच ही सवय लागून जाते. पण भारतात गेल्यावर आम्ही आपसूकच भारतातल्या पद्धती नुसार खरेदी करतो.
जे परिस्थिनुरुप रहात नाहीत त्यांच्यात व बिजिंगला बर्फ पडल्यावर कोलकत्यात कोट घालुन बसणार्‍या लाल भाईंमध्ये मला तरी काही फरक वाटत नाही.

12. When need to say Z (zed), never says Z (Zed), repeats "Zee" several times, if the other person unable to get, then says X, Y, Zee (but never says Zed).
पुन्हा हे काहितरीच सवंग. आम्ही अशा वागणार्‍यांना फाट्यावर मारतो.

11. Writes date as MM/DD/YYYY & on watching traditional DD/MM/YYYY, says "Oh! British Style!!!!"
यातला अर्धा भाग सत्य आहे. अमेरिकेत आल्यावर मी सवयी नुसार सुरुवातीला बरेचदा DD/MM/YYYY मध्ये तारखा लिहिल्या आहेत. भारतात गेल्यावर बरेचदा याच्या उलट्या चुका होतात. पण "Oh! British Style!!!!" हे म्हणजे काहितरीच... अतिशयोक्ती!!

10. Makes fun of Indian Standard Time and Indian Road Conditions.
च्यायला म्हणजे अमेरिकेत जसे घड्याळाच्या काट्यावरच राहतात हे. इतक्या वर्षात एकाही भारतीय (वैयक्तिक वा सामाजिक) कार्यक्रमात सगळे वेळेवर आलेले मी तरी पाहिले नाहीत. आपला भारतीय प्रमाणवेळेचा प्रकार येथे पण चालू असतो. जर कोणी अशा शानपट्ट्या मारल्या तर त्याला फाट्यावर मारावे.
रस्त्यांबद्दल बोलायचे तर भारतात राहणारे काय कमी बोंबलतात? रस्ते अंमळ खराब आहेतच देशात.

9. Even after 2 months, complaints about "Jet Lag".
8. Avoids eating more chili (hot) stuff.
च्यायला. काय पण काय? निव्वळ फालतू अतिशयोक्ती आहेत या.

7. Tries to drink "Diet Coke", instead of Normal Coke.
आम्ही तर बॉ पाणिच पितो.

6. Tries to complain about any thing in India as if he is experiencing it for the first time.
लय वैतागलेला दिसतोय बॉ. पण हे मुद्दे लिहिणार्‍या शान्याला म्हणाव येकदा मला येऊन भेट.

5. Pronounces "schedule" as "skejule", and "module" as "Mojule".
आम्ही आपले मर्‍हाटीतूनच बोलतो. कसं? आन जर विंग्रजी फंडे मारायचे असले तरी आपल्य शिवराळ टोन मध्येच घेतो लपेटुन.

4. Looks suspiciously towards Hotel/Dhaba food.
आम्ही आशांना फाट्यावर मारतो. अन ढाब्यावर मस्तपैकी बुक्कीने कांदा फोडून जेवतो व वरती लस्सी मारुन निवांत ढेकर काढतो. ज्यांना याची लाज वाटते त्यांना त्यांच्या आय्-बापाची बी वाटत आसल.

3. From the luggage bag, does not remove the stickers of Airways by which he traveled back to India, even after 4 months of arrival.
ज्यांना आपला ओला टॉवेल खुर्चीवरून दोन्-दोन दिवस उचलायचा कळत नाही अशा आळशी माणसांना त्यांच्या बॅगवर लोंबळणारा तो टॅग काढायचा समजला तर सूर्य पश्चिमेला नाही का उगवणार? आळशी लोकांचा गुण तो. सगळ्यांना का चिटकवता हा टॅग?

2. Takes the cabin luggage bag to short visits in India, tries to roll the bag on Indian Roads.
हा हा हा... हे मात्र अतिच. अंमळ मजा आली वाचुन.

1. Tries to begin conversation with "In US ...." or "When I was in US..."
इच्छा असुनही पुन्हा युयस ला जायला जमणार नसेल तर त्या आठवणीवर जीवन काढाव्या लागणार्‍या अतृप्त आत्म्याचे लक्षण आहे हे. अथवा अमेरिकेत जाऊन आलो म्हणजे फार बाजीराव झालो असे समजून आर्ध्या हळकुंडात पिवळे होणार्‍यांचे.

बाकी वाचुन अंमळ मजा आली. ज्याने कोणी हे मुद्दे लिहिले त्याची मळमळ पोचली. त्याच्या अशांत आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थणा! ;)