Wednesday, August 24, 2011

राहिला दूर गाव माझा

राहिला दूर गाव माझा
मी असा का भरकटलो
श्वास इथे अन आत्मा तिकडे
खरे, असा मी का जगलो?

क्षण क्षणातून जगलो मी
का कण कणातून मी वधलो
नेत्र इथे अन अश्रू तिकडे
खरे, असा मी का रडलो?

नव्हता दुश्मन रणही नव्हते
दमून पुरता मी हरलो
हृदय इथे अन स्पंदन तिकडे
अरे असा मी का लढलो?

जावे फिरूनी कुशी गावच्या
साद गावची घुमत असे
उगव भास्करा रात्र ढळू दे
प्रभात मंगल पुन्हा दिसे.

Tuesday, February 1, 2011

जीवन

प्रवाहातल्या ओंडक्या
अश्रू कासले ढाळतोस?
पाणि तुझं ऐकणार नाही
धडपड कसली करतोस?

प्रवाहासोबत वाहन्याशिवाय
तुला आता पर्याय नाही
नदी-सागराच्या किनार्‍याशिवाय
तुला आता थारा नाही

किनार्‍याला लागल्यावर
खत तुझं वापरतील
ओंडक्या तुझ्या तनावर
वेली-फुलं बहरतील

त्रागा नको करुन घेऊ
प्रारब्ध त्याचं नाव आहे
प्रवाहासोबत जाण्यशिवाय
दुसरा काय पर्याय आहे?