Thursday, January 10, 2008

सूर्यनमस्कार यज्ञ, शक्तिची उपासना

या वर्षी दुसर्‍यांदा अमेरिकेत हिंदू स्वयंसेवक संघ या संस्थेने सूर्यनमस्कार यज्ञ आयोजित केला आहे. या यज्ञ कालावधित वेगवेगळ्या ठिकाणी सर्व सहभागी लोकांनी मिळून कमित कमी दहा लाख सूर्यनमस्कार करायचे असा या यज्ञाचा निर्धार आहे. दररोज केवळ सात-आठ मिनिटे देऊन सुद्धा आपण सूर्यनमस्काराच्या माध्यमातून निरोगी राहू शकतो याची जाणीव लोकांना व्हावी तसेच व्यायामाची, योगासनांची गोडी निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा हेतू. आम्ही गेल्या वर्षी या कार्यक्रमात सहकुटुंब सहभागी झालो होतो. त्यासाठी आम्ही या संकेतस्थळावरुन चलतचित्रफित उअरवून घेतली होती व त्यासोबतच आम्ही सूर्यनमस्कार करत असू. यज्ञाच्या २१ दिवसाच्या कालावधित सूर्यनमस्काराची जी सवय लागली ती अद्याप अखंडपणे चालू आहे. अगदी भारतभेटीला गेल्यावर तिथे सुद्धा नातेवाईकांसमवेत आम्ही सूर्यनमस्कार करत असू.

या उपक्रमात या संस्थेव्यतिरिक्त अनेक स्थानिक संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, मंदिरे, वगैरे सुद्धा सहभागी होत आहेत. गेल्या वर्षी तर एका राज्याने तर इतर काही शहरांनी या यज्ञा दरम्यान योग-दिन जाहीर केला होता. आपल्या संस्कृतीचा असा जागतीक प्रसार होताना पाहुन मनाला आनंद तर होतोच शिवाय त्यामुळे इतरांचेही कल्याण होते आहे हे पाहून आत्मिक समाधानही मिळते.

आपण सुद्धा या उपक्रमात सहभागी होऊन स्वतःचा फायदा का करुन घेत नाही?

----
या लेखावर येथे चर्चा चालू आहे.

Friday, January 4, 2008

दंत (कथा नव्हे) अनुभव

आरोग्य पत्रिकात सगळे विद्वान सांगत असतात की तुम्ही कितीही पैलवान असाल पण जर दाताच्या आरोग्याकडे तुमचे लक्ष नसेल तर तुमच्या अरोग्याला तुम्ही सुरुंग लावलेत असे समजा. दात खराब असतील म्हणजे किडलेले असतील वा साफ केलेले नसतील तर तुम्ही खात/पीत असलेल्या प्रत्येक घासा सोबत/घोटासोबत तुम्ही त्या अन्नाचे मारेकरी पोटात पाठवत आहात. अन्नाची वाट लाऊन हे जीवजंतू स्वस्थ बसतीलच असे नाही तर तुमच्या पचन संस्थेवर तसेच पुढे शरीरात शिरुन आतल्या अनेक संस्थांवर ते हल्ले करत राहतात.

म्हणजेच निरोगी रहायचे असेल तर दातांना सुद्धा निरोगी ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य बनते. सुदैवाने वा दुर्दैवाने आम्हाला पाश्चात्य जीवनाबरोबरच भारतीय ग्रमीण तसेच शहरी जीवन सुद्धा चांगलेच अनुभवायला मिळाले आहे. या तिन्ही जीवनपद्धतीत आमच्या दंत आरोग्यावर वेगवेगळे परिणाम झाले. त्यांना येथे उतरवत आहोत.

ग्रामीण जीवन :
आमच्या परस बागेत तसेच गावात कडुलिंबांची संख्या भरपूर असल्याने कडुलिंबाची काडी हे आमचे दात साफ करण्याचे (केवळ घासन्याचे नव्हे) मुख्य साधन असे. कधी कधी बदल म्हणून मोगला, उंबर (औदुंबर), सुबाभूळ, वगैरे झाडांच्या काड्या सुद्धा आम्ही वापरत असू. फार कोवळी वा फार मजबूत नसलेली एक वीतभर काडी एका टोकाला आडकित्त्याने व्यवस्थित तोडून नंतर तिला हळू-हळू चावत चावत एका टोकाला एक इंचभर लांबीचा ब्रश बनवायचा. मग त्या मऊ पडलेल्या ब्रशने दातांच्या मधून तसेच हिरड्यांची सफाई करायची. ब्रशचे धागे नैसर्गिक रित्या तयार झालेले असल्याने त्यांत लहान मोठे तसेच मजबूत व मऊ असे सगळ्या प्रकारचे धागे असत. ब्रश तयार करताना दाढींचे पृष्ठभाग साफ व्हायचे तर नंतरच्या ब्रशमुळे दातांच्या मधले अन्नकण पूर्णपणे निघून जात. कडुलिंबाच्या औषधी गुणांमुळे घशातले जीवजंतूही मरुन जात व दिवसभर श्वास कसा मस्त तजेलदार रहात असे.

शहरी जीवन :
आमच्या दातांना थोडेफार ग्रहण लागले ते शहरात रहायला लागल्यावर. कडुलिंब न मिळाल्याने नाईलाजाने आम्हाला ब्रश-पेस्टचा सहारा घ्यावा लागला. आपल्याकडे अजूनही खूप चांगल्या प्रकारचे ब्रश वापरणे सामान्यांच्या आवाक्यातले नाही (किमती हजार रुपयांच्या पुढे आहेत). साधारण ब्रशने दांतांच्या मधले किटाणू जात नाहीत तसेच हिरड्यांची सुद्धा झीज होते. एकंदरीत शहरी पद्धतीने (ग्रामीण भागात सुद्धा) राहणार्‍या सर्वांच्या दांचे आयुर्मान प्रचंड कमी असते. पन्नाशीत बत्तीशी पूर्णपणे गमावलेले अनेक लोक आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. काही म्हणतात की ही आपल्या समाजाची संक्रमण अवस्था आहे. पण त्यासाठी काय दोन-तीन पिढ्यांनी आपले बलिदान द्यायचे? मी केवळ दातांचेच नाही तर त्यांच्या आयुष्याचे म्हणतोय. कारण निरोगी दात असतील तरच निरोगी आरोग्य.
बरे आपल्याकडचे डेंटिस्ट तरी काय मजेशीर. मी मुंबईतल्या एका चांगल्या डेंटिस्ट कडे सहामाई दंतसफाई साठी गेलो होतो. त्याने माझे दात साफ करायचे सोडून सल्ला दिला की तुझे दात साफ करायची काही गरज नाही कारण दात-हिरड्या फार व्यवस्थीत दिसत आहेत. आणि नेहमी-नेहमी अशी सफाई केल्याने तुझ्या हिरड्यांची झीज होईल (व्यवस्थित सफाई केल्यास हिरड्यांना इजा पोचत नाही हे मी त्याला शिकवायाची गरज पडावी?). मी म्हटलो की मला कधी-कधी दुर्गंधी आल्यासारखी वाटते. तर म्हणाला की तुझ्या दाताला शक्यच नाही! काय बोलणार, कप्पाळ!


पाश्चात्य जीवन :
इकडे अमेरिकेत जवळपास सर्व जनता दर सहा महिन्याला दंत-सफाई करुन घेते. प्रत्येक दाताचे हिरडीसोबतचे आंतर मोजले जाते. जर हिरडी घट्ट नसेल तर त्यावर उपाययोजना केली जाते. आणि जर एखाद्यच्या हिरड्यातून रक्त येत असेल वा त्यात किटाणू मर्यादेपेक्षा जास्त असतील तर त्याची हिरड्यांच्या शल्यचिकित्सकाकडून सखोल सफाई केली जाते (मला वाटते ०.००१ मिमि पर्यंत). येथे डेंटिस्ट विद्युत घारणी असलेला ब्रशच सर्वांना वापरायला सांगतात. तसेच ब्रश सकाळ संध्याकाळ करायला सांगतात. त्याच बरोबर ब्रशने दातांच्या सांधींमधून तसेच खोल हिरड्यांमधून अन्नकण निघत नसल्याने फ्लॉस वापरणे अनिवार्य असल्याचे सांगतात. भारतात फ्लॉस काय भानगड असते ते कित्येक औषध विक्रेत्यांना सुद्धा माहित नसते. मग प्रश्न पडतो की आपण पाश्चात्यांप्रमाणे ब्रश वापरण्याचे सुद्धा अंधानुकरणच करत नाही का?

दंत शस्त्रक्रिये विषयी :
भारतात सर्वसाधारणपणे रुट कॅनाल केलेल्या दाताच्या मुळाला काही वर्षात पुन्हा किटाणू संसर्ग होतो व बहुतेक वेळेला तो दात गमावण्याची पाळी आपल्यावर येते. त्याचे कारण समजावून घेताना असे लक्षात आले की अद्ययावत यंत्रसामग्रीच्या अभवाने भारतातल्या बहुसंख्य रुट कॅनाल शस्त्रक्रियेत दात साफ करताना त्याच्या मुळाशी जाणे शक्य होत नाही. तो भाग खूपच चिंचोळा असतो व तेथे खूप कमी किटाणू मावू शकतात. ते किटाणू त्रास देण्याच्या संख्ये येवढे वाढेपर्यंत अनेक वर्षे गेलेले असतात. पण या दीर्घ काळा नंतर आपल्यावर दात गमावण्याची वेळ आलेली असते.
हीच बाब दताला टोपी (कॅप) बसवताना वा पूल (ब्रीज) बसवताना सुद्धा प्रकर्षाने जाणवते. आमच्या सौ.च्या दातांवर भारतात बसवलेल्या चार टोप्या व एक पूल दोन-तीन वर्षात उध्वस्त झाले. कारणे काय तर पुन्हा अद्ययावत यंत्रसामग्री व योग्य धातूमिश्रण यांचा अभाव. त्यामुळे बसवलेल्या टोप्यांची कडा दताच्या आवरणाशी एकजीव होऊन न बसल्याने वा जेथे तो धातू संपून दाताचा पृष्ठभाग सुरु होतो तेथे खाच निर्माण होते. हीच खाच किटाणूंचे घर बनते व कालांतराने टोपी वा पूल उध्वस्त होतो.

यावर जाणकार अधिक व शास्त्रीय दृष्टीकोणातून योग्य माहिती देऊ शकतील. आम्ही आमच्या अल्प बुद्धिला जेवढे समजले तेवढे लिहिले. पण एक मात्र खरे की जर आमच्या पुरते बोलायचे तर ग्रामीण जीवना नंतर गमावलेले दंत आरोग्य पुन्हा मिळवले आहे म्हणून आम्ही आनंदी आहोत.

----
या लेखावर येथे चर्चा चालू आहे.

Wednesday, January 2, 2008

घसरगुंडीची शाळा - २

पहिल्या दिवशीचा अनुभव पाठीशी घेऊन आम्ही दुसर्‍या दिवशी स्कीच्या टेकट्यांकडे निघालो. आमचे कालचे साथिदार आज गायब होते. त्यांना केवळ अनुभव म्हणून एकदा स्कीईंग करुन बघायचे होते ते त्यांनी साध्य केले होते. शिवाय आज त्यांची येण्याची स्थिती सुद्धा नव्हती. कोणाचा गुडघा, कोणाचा खांदा तर कोणाची पाठ दुखत होती. माझेही अंग जरा जड वाटत होते पण दुखापत नसल्याने तसेच उत्साह फुरफुरत असल्याने आम्ही निघालो.

पहिल्या दिवशी थंडी कमी असल्याने (४ ते ७ डि.से.) कान टोपीची वगैरे गरज भासली नव्हती. आज मात्र थंडी चांगलीच असल्याने कानाला हुड लावावे लागत होते. आम्ही अस्त्र-शस्त्रे लेऊन सज्ज झालो. स्कीईंग साठी तीन आवश्यक तर चार-पाच ऐच्छीक साहित्य लागते. आवश्यक सामान या प्रमाणे...

बूट: हे बूट स्नो-बूट प्रमाणेच नडगी बरोबर उंचीचे असातात. त्यात पायाच्या पंजाला तसेच पिंडरी-नडगीला पक्के करण्यासाठी यंत्रना असते. ही यंत्रना दोन-तीन वेगवेगळ्या प्रकारची असते. आम्ही हे असे बूट वापरत आहोत.



स्कीज (घसर पट्टी) : स्कीज तुमच्या बुटाच्या मापाच्या असाव्या लागतात. त्यांतली बुटाला आवळणारी पकड लांबीला थोडीशी कमी-जास्त करता येते. बुटांना स्कीमध्ये आडकवण्यासाठी त्यात बुटासह असलेला पाय घालून दाब द्यावा लागतो. तर बूट बाहेर काढण्यासाठी त्याला एक कळ असते. ही कळ हाताने तसेच पोलने दाबायची असते. अवजड बुटांमुळे बरेच वेळा स्की पर्यंत हात पोहचत नाहीत म्हणून पोलचाच उपयोग करावा लागतो.



पोल (छड्या) - स्कीईंग करताना बहुतेक खेळाडू दोन्ही हातात पोल पकडतात. पोल पकडताना त्याचा पट्टा हातच्या नाडीला समांतर घेऊन मुठीत आला पाहीजे व त्याला पोल सोबतच पकडले पाहिजे. अन्यथा आंगठा दुखावला जाण्याची शक्यता असते.



याशिवाय शिरस्त्रान, गॉगल्स, सुद्धा खेळाडुंनी बाळगायला हव्यात याची प्रचिती आम्हाला दुसर्‍या दिवशी आली.

सुरुवातीला वार्म अप म्हणून मी कालच्याच प्रकारे दोरीला पकडून छोट्या टेकडीवरुन एकदा घसरगुंडी केली. काल आम्हाला शिकवायला असणारे दोन्ही प्रशिक्षक आज दिसत नव्हते. आजही आमच्याकडे शिकाऊ तिकीट असल्याने आम्ही आमच्या शंका तिथे उपस्थित असणार्‍या प्रशिक्षकांना विचारू शकत होतो. पण तशी गरज वाटली नाही. आजचे ध्येय म्हणजे गती न वाढवता अगोदर वळायला शिकणे, त्यानंतर थोडी गती वाढवने जेणे करून एक दोन दिवसानंतर प्राथमिक गटातून वरच्या गटात (मॉडरेट लेवल) जाता येईल.

आणि आम्ही थोड्या मोठ्या टेकडीवर निघालो. वर जाताना कोणत्या मार्गाने यायचे याची आखणी करत होतो. काल त्या छोट्या टेकडीवर आमच्या अशा आखण्यांची वाट लावायला अम्हाला मार्गात हाटकून कोणीतरी धडकत असे (म्हणजे ते समोर आल्यावर आम्हाला वळता न आल्याने आम्ही त्यांना धडकत असू). त्यावर उपाय म्हणून अगदी उतारावर सुद्धा गती पूर्ण थांबवता येण्याची कला आम्ही आज आवगत केली होती (हे आज पर्यंत आमच्या कोणाही मित्राला न जमलेले कसब आल्याने विश्वास वाढला होता).



दोरावरुन वरती जाताना पायात किती जास्त ओझे आहे हे जाणवत होते. नेहमी ओझ्याखाली दबलेल्या पायांना हे बुटाचे-पट्ट्यांचे ओझे ताणून लोंबकळत होते. त्याच बरोबर खाली घरगुंडी करत असणार्‍यांकडून बरेच शिकायलाही मिळत होते. नेमके काय केल्याने हमखास पडणार व काय केल्याने नाही याचे आकलन करता करता आम्ही टेकडीवर पोचलो सुद्धा. आरे बापरे! आता या पाळण्यातून खाली उतरताना सावरायचे कसे? आठवले, पिझ्झा! पिझ्झा (उलटे इंग्रजी अक्षर व्ही) केल्याने गती कमी होते. पण तो पर्यंत मागच्या पाळण्यातले लोक पाठीवर येऊन आदळले तर? ठरले, छोटा पिझ्झा!

जमले रे बॉ! चला पहिली पायरी तर झाली. पण हे काय, सगळी टेकडी बंद! मला जाता येण्यायेवढा मार्गच शिल्लक राहिला नव्हता. सगळीकडे पडलेले लोक. एव्हाना आमच्या स्कीने गती पकडलेली. पायांनो वळा, वाळा... राम, राम, राम... आठवले "डावीकाडे वळायला उजव्या पायवर भर द्या अन उजवी कडे वळायला डाव्या पायावर" आमच्या प्रशिक्षकाचे हे वाक्य काय ऐनवेळी आठवले हो!

आणि चक्क पहिल्याच चकरीत मी टेकडीच्या पायथ्यापाशी. चला, सौंच्या हजेरीत पडापडी नाही झाली. त्यातही जर एखादी बाई येऊन आदळली असती तर उद्यापासून स्कीइंग बंद होण्याचा धोका होता... टळला एकदाचा!

दुसर्‍या फेरीत पाळण्यामध्ये एक मित्र झाला. त्याचे नाव ल्यूक, वय केवळ चार वर्ष पण मोठ्यांना लाजवेल अशी त्याची गती, वळणावरचे नियंत्रन. त्या पोराने मला एक ध्येय दिलं. मी शक्य तितक्या लवकर माझ्या मुलीला स्कीईंग शिकवायला आणणार! पण "कोणाला पोहायला शिकवायचं तर दुसर्‍याचा जीव वाचवता येईल येवढं चांगलं पोहता आलं पाहिजे" हा नियम ईथे सुद्धा वापरायचा होता. आता स्वतःची साधन सामग्री विकत घ्यायचीच!

बघता बघता चार तास कसे गेले कळलेच नाही. प्रत्येक चकरी सोबत गतीवरचं तसच वळनांवरचं नियंत्रण जास्त चांगलं जमत होतं. आता त्या मोठ्या टेकड्या/डोंगर खुणावत होते. तितक्यात मस्त हिमवर्षाव सुरु झाला. पाळण्यातून समोर दिसणारे डोंगर, खाली पांढर्‍या शुभ्र बर्फाचे गालीचे अन त्यात हे अलगद झोकावत-झोकावत खाली येणारे हे कापसा सारखे बर्फाचे पुंजके... किती विहंगम दृष्य ते! पण हे काय, घरगुंडी सुरु झाल्यावर गती घेऊन खेळताना ते सुंदर बर्फाचे इवले-इवले दिसणारे पुंजके सुयांप्रमाने डोळ्यात घुसत होते. उद्याला गॉगल पाहिजे हे खरं पण बंद डोळ्याने खालपर्यंत पोचायला तर हवं!

----
या लेखावर येथे चर्चा चालू आहे.

Tuesday, January 1, 2008

शाळा skiing ची - १

ही skiing काय भानगड आहे या उत्सुकतेपोटी मित्रांसोबत आम्ही जवळच्याच Mount Southington या घसरकेंद्राकडे (स्की-केंद्र) निघालो. सगळेच नवे. पण मित्रांचे अनुभव ऐकून होतो. सगळेच जण हाताला, पायाला वा एखाद्या सांध्याला ईजा घेऊन परत आलेले होते. तेव्हा आपल्याला सुद्धा ईजा झाली तरी कामावर जास्त खंड पडू नये म्हणून सुटीतला पहिला दिवस पकडून निघालो होतो. एक नवीन अनुभव घेणे व जखमी न होता घरी परतने हे घ्येय ठरवून तेथे पोचलो.



आरे बापरे! स्कीचे बूट आहेत की दगड! पाय घोट्यातून अजिबात हलवता येत नव्हता...

स्की सुद्धा चांगल्याच जड होत्या.

चला शाळा सुरु झाली एकदाची. दोन शिक्षक, त्यातली एक स्त्री. खरच येथे सगळ्या क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीत आहेत बा. (पण आपले काय) ... असो.



आम्ही हे घडे शिकलो...
१. बुटात उभे राहिल्यावर गुढघ्यात वाकायला हवे. असे वाकल्यावर नडगीवर भार यायला हवा. नडगीवर भार येत नसेल तर बुट आणखी घट्ट करावा.
२. हातातल्या छाड्या/काठ्या (पोल) पकडताना दोरी/पट्टा आतल्या बाजूने मुठीत आलेला असावा. आंगठा व चाफेकळीच्या मधून हा पट्टा गेलेला असल्यास आंगठा दुखावू शकतो/उपटला जाऊ शकतो.
३. या छड्यांचा उपयोग केवळ तोल राखण्यासाठी करण्याचा प्रयत्न करावा. आवश्यकता वाटत नसेल तर या न वापरल्यासही चालेल.
४. स्थिर उभे रहायचे असेल चढ-उतार हे डाव्या उजव्या बाजूला यावेत. चढ-उतार हे समोर वा पाठमोरे आल्यास तुम्ही घसरु लागता. तसेच कधीही टेकडीकडे तोंड करुन उताराकडे पाठमोरे उभे राहू नका. पाठमोर्या दिशेने
५. स्कीची रुंद बाजू जमीनीला कोणात ठेवावी जेणेकरुन त्याची कडा बर्फात रुतून बसेल.
६. उतारावरून स्की समांतर ठेवल्याने गती वाढते. गती कमी करायची झाल्यास पायांतील आंतर वाढवून स्कींना इंग्रजी उलटे V असे पकडावे.

हे धडे प्रत्यक्षात आणताना मात्रा आम्ही असे पडत होतो...




दोराला पकडून असे छोट्या टेकडीवर जाऊन हळू हळू सुरुवात केली. टेकडीवर पोचल्यावर मुख्य प्रश्न असायचा तो चढ-उतार हे डाव्या उजव्या बाजूला यावेत म्हणून बाजूला वळण्याचा. हे करताना आम्ही बहुतेक वेळा पडत होतो.




पण आता थोडे-थोडे जमायला लागले होते.

तितक्यात आमच्या एका मित्राने मोठ्या टेकडीवरुन जाऊन येण्याचा प्रयत्न केला. अपेक्षेप्रमाणे चार वेळा चांगला आपटला होता तो. मी मात्र ठरवल्या प्रमाणे पाया पक्का झाल्या शिवाय घाई करायची नाही हे ठरवले होते.

चार तास प्रयत्न केल्यावर आता मी त्या छोट्या टेकडीवरुन न पडता खाली येत होतो.
पहिल्या दिवशीची घसरगुंडी पाहण्यासाठी येथे टिचकी मारा.


----
या लेखावर येथे चर्चा चालू आहे.

इंग्रजी उत्सव सोहळा

डिसेंबरच्या तिस-या आठवड्यापासून घरा घरांना रोशनाई दिसू लागल्याने उत्सवाची चाहूल लागली होती. काही घरांचा झगमगाट अन सौंदर्य टिपण्याजोगे होते. त्यापैकी हे एक.



परसातली सजावट सुद्धा मनमोहक ...



३१ तारखेला आम्ही Forest Park, Springfield, MA येथे Bright Night नावाची सजावट केलेली बाग बघायला गेलो. शेकडो वेगवेगळे मनमोहक देखावे नजर खिळवून ठेवत होते.



या बागेत आम्ही खूप फोटो घेतले. ते येथे ठेवले आहेत... क्लीक करा.

त्यानंतर आम्ही आमच्या इमारतीच्या गच्चीवरून हार्टफोर्डच्या फटाक्यांचा आनंद लुटला.