Thursday, August 6, 2009

एक कर्मयोगी रामदास

बालवयापासून कौटुंबिक जबाबदार्‍या, काबाडकष्ट करून घेतलेले शिक्षण आणि पुढे नोकरी व एकत्रित कुटुंबासाठी वाहून घेतलेले जीवन हा आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबप्रमुखाच्या जीवनाचा लेखाजोखा. यात कितीतरी मूक यातना, क्षणोक्षणी उराशी बाळगलेली परंतू कधीही पूर्ण न झालेली स्वप्ने, समाजाबरोबरच आप्तस्वकियांकडून झालेला मानसिक त्रास असा प्रचंड गाळ साचलेला असतो. या गाळात रुतून धीर खचलेल्या मनाने व क्षीण बनलेल्या शरीराने मग हा मध्यमवर्गी कुटूंब प्रमूख काळाशी तडजोडी करत उत्तर आयुष्याला खंगलेल्या अवस्थेत सामोरा जातो. त्यातही काही शारीरिक व्याधींचा ससेमिरा लागलेला असेल तर विचारायलाच नको. त्यात समाजही टिपण्ण्या टाकायला लागतो... "खूप कष्ट केलेत हो, आता थकलेत ते", "आता काय राहिलय? मुलं-मुली आपापल्या संसारात लागलेत. यांचं काम यांनी केलंय, आता सगळं भगवंताच्या हाती". आणि या अशा तिन्हीसांजेला कोणाला सुद्धा या पिकल्या पाणाच्या मनात राहून गेलेल्या स्वप्नांच्या ठाव-ठिकाणांची कल्पनाही नसते.

मात्र काही अपवाद असतात जे केवळ नातवंडासाठीच नव्हे तर पूर्ण समाजासाठीही आदर्श बनून जातात. थकलेल्या पंखात केवळ गरूडभरारी घेण्याची ताकदच नव्हे तर मनातही उमेद आहे हे ते सिद्ध करून दाखवतात. अशाच एका फिनिक्सला पाहण्याचे भाग्य मला लाभलेय, नव्हे त्यांच्या आशिर्वादाचा हातही माझ्या पाठीवरुन फिरला आहे. अशा या चिरतरुणाबद्दल लिहिणे हा सुद्धा माझे अहोभाग्यच.

दहा-पंधरा वर्षांपासून असंख्य व्याधिंनी त्रस्त असताना अन शरीर घराबाहेर पाऊल टाकायला साथ देत नसताना एखाद्या तरूण संशोधकाला सुद्धा थक्क करायला लावेल असे काही या व्यक्तिने केलय. या ऋषितुल्य व्यक्तिचं नाव उमाकंत रामदासी; आपल्या संस्कृतीनुसार माझ्यासाठी पितृतुल्य, माझे सासरे.

साधारण दहा-बारा वर्षापूर्वी मृत्यूशी झूंज देऊनही हा पठ्ठ्या सहिसलामत बाहेर आला. अजाराने शरीराकडून मुघली कर वसूल केला होता. शरीरात त्राण नसलं तरी मन मात्र अजूनही तरूणच होते. हे तरूण मन समाजासाठी काहीतरी करण्यासाठी जिद्दीने पेटून उठलेले होते. ज्या मातीत धर्म-संस्कृतीच्या रक्षणासाठी रामदास-शिवरायांपासून ते सावरकरांपर्यंत महान विभूती जन्माला आल्या त्या मातीत जन्माला येऊन किड्या-मुंगीसारखे जीवन जगणे या तरूण मनाला मान्य नव्हते. धर्म संस्कृतीसाठी काय करता येईल याच्या शोधात असताना त्यांना एक गोष्ट सापडली. बीड शहराच्या मध्यभागी बिंदूसरेच्या कडेवर एका मोठ्या उकीरड्यात आपल्या संस्कृतीचा एक मोठा वारसा नष्ट होत आहे हे लक्षात आले आणि तन-मन कामाला लागले.

From Misc_Photos


साधारण एक हजार वर्षापूर्वीच्या काही समाध्या, त्यावरील शिलालेख यांचा अभ्यास होऊ लागला. जवळपासच्या शहरातील इतिहासतज्ञ, अभ्यासक, पत्रकार तसेच शहरातील मदत करु शकतील अश्या व्यक्तिंना श्री. उमाकांतराव रामदासींचे फोन यायला लागले. पुरातन पुस्तकांची पाने चाळली जाऊ लागली. बघता बघता एका ऐतिहासिक वारशाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी समाजधुरिणांची एक फौज कामाला लागली.

दाहाव्या व अकराव्या शतकात बीड शहरात एक महान ज्ञानी योगी रहात असत. ते दुसरे तिसरे कोणी नसून संत ज्ञानेश्वरांचे, मुक्ताबाईंचे अजोबा होत. त्यांची समाधी त्या उकीरड्याखाली सापडली. तिचे हे छायाचित्र.

From Misc_Photos


या संशोधनाला पुढे सरकार दरबारी मान्यता मिळाली. या चळवळीतले कार्यकर्ते, नेते व हौशा-नौशांनी मिळून या समाधिस्थळाला शहरातील इतर महान ऐतिहासिक स्थळांच्या पंक्तिमध्ये बसवण्यासाठी कार्यक्रमांची रीघ लावली.

From Misc_Photos


आता तेथे मुक्ताईंची पालखी पण त्यांच्या आजोबांच्या दर्शनासाठी थांबून जाऊ लागली आहे.

From Misc_Photos


आणि हे कार्य सफल झाल्याच्या आनंदात हा फिनिक्स आता नवीन भरारी घेण्याच्या विचारात आहे.
From Misc_Photos


------------------

या लेखावर अधिक प्रतिक्रिया मिसळपाव या संकेतस्थळावर आल्या आहेत. त्या वाचण्यासाठी येथे टिचकी मारा.

Wednesday, July 15, 2009

मनिष कुलकर्णी - २३ एप्रिल १९९९

Today I received an email from Manish which took me back by a decade. Here it is...

परवा नगरला गेलो होतो तेव्हा जुनी डायरी वाचत होतो. एका पानावर थांबलो. त्या पानावरचा मजकूर जसाच्या तसा देतोय. नवीन विरोधीनाम संवत्सराच्या अनंत शुभेच्छा!

"... स्नेहसंमेलनाचे वारे वाहू लागले. महाविद्यालयाची स्मरणिका काढायची असा भास्करने चंग बांधला होता. हो-नाही मनस्थितीत होतो कारण परिषदेचे (अभाविप) 'perspective' काढले तेव्हा खूप त्रास झाला होता. पण भास्करची इच्छा असल्याने मी त्रास घ्यायचे ठरवले. हळूहळू तयारी सुरु झाली. एखाद्या मोठ्या साहित्यिकाची मुलाखत असावी म्हणून आम्ही परिषदेमार्फत दमांशी (द. मा. मिरासदार) संपर्क केला. नशीब चांगले त्यांनी होकार पण दिला. मग काय, आनंदी आनंद गडे. गुढी पाडव्याच्या अदल्या दिवशी बुके सरांच्या कृपेने कॉलेजचे अडीच गांधीजी @ घेऊन आम्ही पुण्याला निघालो.
येताना आधी मौजला आलो. टिपिकल ग्रामिण मराठवाडी गाव. त्या वातावरणाला शोभेल असाच वाडा. अर्थात केन्डे गुरुजींचा वाडा म्हणून प्रसिद्ध. रात्रीचे जेवण छान अंगणात केले. आजी बरोबर मस्त गप्पा मारल्या. त्यांच्या लग्नात आमरसाचा बेत होता अन अंब्याचा रस करायला मोठा हौद तयार केला होता, आणि रस करण्याकरिता काही माणसे त्यात उतरली होती... या कल्पनेने मी तर उडालोच.** रात्री खूप वेळ गप्पा मारुन आम्ही झोपलो. तसे रात्रीच्या गप्पा ह्या मला आणि भास्करला काही नव्या नव्हत्या. 'प्रकाशगड', लक्ष्मी कॉलनी $$ ची गच्ची याची साक्षीदार आहे. अनेक रात्री आम्ही तिथे जागल्या, बहुतेक सर्व विषयांवर चर्चा करताना घालवल्या आहेत. असो.
सकाळी उठून आम्ही 'होल वावर इज आवर' उरकून आलो. येताना लिंबाचा डोहाळा आणला. केन्डे वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे न्हाणीघर... बहुतेक जगातील सर्वांत मोठे बाथरुम हेच असावे. मी आजपर्यंत येवढ्या मोठ्या खोलीवजा बाथरुम मध्ये अंघोळ केली नव्हती. त्यामुळे अंघोळ न ठरता नव वर्षाचे पहिले शाही स्नान ठरले. मस्त आवरून आणि नाष्ता करुन आम्ही विवेकच्या लुनावरुन बीडला गेलो. येताना कनकालेश्वर, खंडेश्वरीच्या दीपमाळा... त्याही उंचीवर गप्पा मारल्या... शेवटी साईट पाहून आम्ही जेवायला घरी आलो. छानपैकी पुरणपोळ्यांचा अस्वाद घेतला. पुरणपोळ्या म्हणजे आमचा वीक-पॉईंट. यथेच्च भोजन करुन झाडाखाली अंगणात वामकुक्षी घेतली. नवहिंदूवर्षाच्या पहिल्या दिवशी मौजला मजा करुन अनंत आठवणी सोबत घेऊन संध्याकाळी आम्ही भास्करच्या आवडत्या गाडीने (ट्रक) नगरला निघालो....."
२३ एप्रिल १९९९

धन्यवाद!
मनिष मधुकरराव कुलकर्णी
---------------------
टीपः
@ (म्हणजे गांधीजींच्या प्रतिमेवाल्या नोटा)
** मनिष, एक सुधारणा... ही घटना त्या आजींच्या लग्नातली नव्हे तर त्यांच्या व्याह्यांच्या म्हणजे माझ्या अजोळच्या आजी अजोबांच्या लग्नातली आहे जी मौजच्या आजींनी सांगितली.
$$ प्रकाशगड म्हणजे अभाविपचे कार्यालय जेथे आम्ही रहायचो व जे श्री प्रकाश पाठक यांच्या कर्यकाळात बांधले गेले... त्याचे नामकरण आम्ही प्रकाशगड केले होते हे त्यांना कळाले असते तर आम्ही कदाचित फटके खाल्ले असते. असो.. प्रकाशभैय्यांची आठवण झाली की आजही भिती वाटायला लागते...

Tuesday, July 14, 2009

My Great Eye Opener!

God doesnt give what we want; He gives what we need!

Just three days back my mother, who brought me to this world, who was my whole world for more than a decade, who did everything to give me best possible education and upbringing, who put hundreds and hundreds of hours telling me stories of great heros, who wanted me to follow their path, was begging me one thing. She wanted to see me at least once a year as I had promised her before leaving for the US. That mother, who never asked me anything, was asking much much less than what she desevred from so called successful son.

And here I was having equations of my career through this bad times. I needed this project where we are working cut throat. I was thinking what would I do if I lose project in such bad times. This is the project I have got by sacrificing so many things. I am working so hard to make it go longer that I am swiching off my cell phone, too. What would happen if I ask for a leave! No no, I couldn't afford the project loss.

And there was He, laughing from the heavens.

Today my superviser called me for a meeting and gave me what I needed, not what I wanted. Among her words were, "dont pull yourself in a dark hole. You are best performer here. But just your timings are wrong. You came in and your project was put in for re-consideration...."

Now I am so greatful to the great Lord! I dont have to beg for leave now to go and meet my parents.

I dont know about other fellows who got the same message with me but I know what I am going to do... Aai, I am coming for you with no burden of joining date!

Monday, January 26, 2009

अमेरिकेत तीन आठवड्यात दहा लाख सूर्य नमस्कार!

अमेरिकेत मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी मर्यंत दहा लाख सूर्यनमस्कार घालण्यत येणार आहेत. न्यूयार्क सारख्या मोठमोठ्या शहरांत तसेच काही राज्यांत या दरम्यान योग-दिन साजरे होत आहेत. निमित्त आहे हिंदू स्वंयसेवक संघा या स्वंयसेवी संस्थेने आयोजित केलेल्या सूर्यनमस्कार यज्ञाचे.

हिंदू संस्कृतीने जगाला दिलेल्या अनेक मौल्यवान योगदानांपैकी एक महत्वाचे म्हणजे योग साधना. निरोगी शरीर व मनासाठी योगाभ्यासाला तोड नाही. अमेरिकेत सुद्धा योग साधनेबद्दल प्रचंड आकर्षण आहे व ते वाढतच आहे. तिथल्या प्रत्येक शहरांत योगा क्लासेसच्या नावावर अनेक संस्था भरभक्कम पैसा लाटत आहेत. हिंदू स्वयंसेवक संघ ही संस्था मात्र योगाचा लोकांना मोफत लाभ व्हावा म्हणून या सूर्यनमस्कार यज्ञाच्या रुपाने या वर्षी सलग तिसर्‍यांदा देशभर योगाचा प्रसार करत आहे. त्यात त्यांनी अमेरिकेतील इतरही अनेक संस्थांना सहभागी करून घेतले आहे. हिंदू जिथे जिथे जतो तिथे तिथे तो आपल्या ज्ञानाचा फायदा स्थानिक लोकांना करुन देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करतो हे त्याचे एक उदाहरणच मानायला हवे.

सूर्यनमस्कारात पायाच्या बोटापासून ते मानेपर्यंत सर्व स्नायूंचा तसेच फुफ्फुसांचा व शरिरातील इतर आंतर्गत अवयवांचा व्यायाम होतो. अशा या योग पद्धतीचे महत्व पटवून देण्यासाठी या संस्थेने त्यांच्या स्वयंसेवकांच्या पुढाकाराने गावोवागी मंच स्थापन केले आहेत. दररोज अगदी दहा मिनिटांत सूर्यनमस्कार कसे करावेत, त्याचे फायदे काय हे समजाऊन देऊन लोकांना प्रव्रूत्त केले जात आहे. या अंतर्गत आयोजित केलेल्या योग मॅरेथॉन, सूर्यनमस्कार मॅरेथॉन यांना सुद्धा प्रत्येक स्तरातून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी मार्गदर्शनपर माहितीपत्रके, व्हिडीओ, यांचीही मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. ही माहिती त्यांच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. प्रत्येक राज्यात गावोगावी लोकांनी वैयक्तिक वा सांघिक पद्धतीने सूर्यनमस्कार घालून त्याची नोंदणी संकेतस्थळावर करायची आहे.

अधिक माहितीसाठी www.hssus.org/sny या संकेतस्थळाला भेट द्या अथवा या sny@hssus.org विरोप (इमेल) पत्यावर संपर्क करा.

Tuesday, January 13, 2009

संक्रांतीच्या शुभेच्छा! (Happy Sankranti)

तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

संक्रांत म्हटलं की तीळ-गुळ, तिळाचे लाडू, तीळ लावलेल्या भाकरी, वाला-वांगी-पेरु-बोर वगैरे भाज्यांच्या रसरशीत व खमंग गावराण जेवणाचा अस्वाद, सुवासिनिंचे हळद-कुंकवाला एकमेकींकडे जाणे येणे, आवा लुटणे, नवीन सुगड्यात बोरे, चिंचा, उसाची कांडे भरुन त्यांची पुजा करणे, चिल्या-पिल्यांचे बोर न्हाण, पतंगांच्या भरार्‍या... ही सगळी लगबग डोळ्यासमोर येते.

मला मात्र एक गोष्टीची गंमत वाटते. आजकालच्या संक्रांतीची भेटकार्डे व शुभेच्छापंत्रांत तिळ-गुळाचा भरपूर उधो-उधो होतो. पण त्यासारख्याच किंबहुना त्याही पेक्षा महत्वाच्या सांस्कृतीक गोष्टींकडे मात्र आपण पाहिजे तेवढे लक्ष देत नाही. तेव्हा आपण आपल्या वाड-वडिलांकडून कळालेल्या काही पैलुंना येथे मांडू यात का?

आमच्या आजोबांनी तसेच आईने सहजपणे सांगितलेल्या तर निरिक्षणातून लक्षात आलेल्या या काही बाबी...



संक्रांतीपासून दिवस मोठा व्हायला लागतो. म्हणजेच उन्हाळ्याची चाहूल लागू लागते. हा काळ म्हणजे रबीच्या पिकांच्या काढणीचा, पारंपारिक फळांच्या बहराचा. शेतात ओंब्या, हुरडा अन टहाळ चापायचा, पेरुच्या बागांमधून हुंदडायचे, बोरा-चिंचा-कवट असा रानमेवा खुश्शाला गिळायचा... अन रात्रीच्या थंडीत शेकोटीच्या उबीने शाल पांघरुन गप्पा-टप्पा करत आंथरुन जवळ करायचे. अशा या आनंदाच्या काळात आपल्या पूर्वजांनी हा सण व त्यात करायच्या गेष्टी फार विचार करून नेमल्या.




या काळात आपल्याकडे हवा मंद वाहत असते. पाऊस नसतो तशी उघड्यावर उभे राहिल्याने उन्हाने अंगाची होरपळही होत नसते. म्हणूनच पतंग उडवायची मजा खरे तर याच मोसमात. रबीचा हंगाम हातात आल्याचा आनंदोतस्व साजरा करायला मग पतंगाचा पर्याय आहे की नाही मस्त?



लहान मुलांना सर्व प्रकारच्या पारंपारिक फळांची आवड लागावी तसेच रखरखीत उन्हाळा येण्यापूर्वी या सगळ्या फळांना खाऊन सर्वांची तब्येत चांगली व्हावी म्हणून लहान मुलांचे बोर नहाणाची प्रथा अस्तित्वात आणली. बोर नहाणात मुलांना मौज येते व ती ही फळे आनंदाने लपेटायला लागतात. त्याच बरोबर भाज्याही सर्वांनी खाव्यात हा ही संदेश द्यायचा होता. तर 'मला आमुक भाजी नाही आवडत' असे नखरे करणार्‍यांना सुद्धा नैवेद्याच्या-प्रसादाच्या नादाने का होईना पण डझनभर वेगवेगळ्या भाज्या एकत्र करून खायला लावण्यासाठी मिश्र भाजीचा दंडकही आणला गेला.

सुगडे (मातीचे नवे कोरे माठ/मडके) आणून त्यात शेतात असलेल्या ओंब्या, टहाळ, बोरे, चिंचा, वगैरे टाकून त्याची पुजा करायची. काही दिवसांनी या सुगड्यांत पाणी भरुन ठेवायचे. म्हणजे उन्हाळ्यापर्यंत या सुगड्यांचे पाझरणे थोडे कमी होऊन ती दैनंदिन वापरासाठी उपयोगात येतात. त्यात संक्रांतीच्या दिवशी रानमेवा व पिकांचे नमुने एक संकेत म्हणून भरुन ठेवायचे की देवा या सुगड्यांना उतरंडीमध्ये असेच भरलेले राहू दे. तसेच या सुगड्यांमध्ये भाज्या, विड्याची पाणे, साठवल्यास बरेच जास्त काळ टिकत. कदाचित तो संदेशही असावा.

आवा लुटण्याचा हा असाच एक अफलातून प्रकार. ताट, चमचे, वाट्या, बांगड्या अशा छोट्या-छोट्या भेटवस्तू हळदी-कुंकवासोबत सुवासिनी एकमेकिंना देतात. या सगळ्या कामाच्या नवनवीन वस्तू अनपेक्षित पणे घरात वापरायला मिळाल्याने त्यांना दररोजच्या कामात थोडा बदल व उत्साह जाणवत असावा. तसेच हातात आलेल्या पैशाने घरातल्या वापरासाठी नवीन वस्तू याव्यात. व्यापार उदीमही वाढावा. असाही दृष्टीकोन असवा असे वाटते. जाणकार अधिक माहिती देतीलच.

असा हा मकर संक्रांतीचा विषेश सांस्कृतिक सण तुम्ह सर्वांना आनंदाचा जावो.

टीप: हा लेख येथे पूर्वप्रसिद्ध केलेला आहे.