Wednesday, July 15, 2009

मनिष कुलकर्णी - २३ एप्रिल १९९९

Today I received an email from Manish which took me back by a decade. Here it is...

परवा नगरला गेलो होतो तेव्हा जुनी डायरी वाचत होतो. एका पानावर थांबलो. त्या पानावरचा मजकूर जसाच्या तसा देतोय. नवीन विरोधीनाम संवत्सराच्या अनंत शुभेच्छा!

"... स्नेहसंमेलनाचे वारे वाहू लागले. महाविद्यालयाची स्मरणिका काढायची असा भास्करने चंग बांधला होता. हो-नाही मनस्थितीत होतो कारण परिषदेचे (अभाविप) 'perspective' काढले तेव्हा खूप त्रास झाला होता. पण भास्करची इच्छा असल्याने मी त्रास घ्यायचे ठरवले. हळूहळू तयारी सुरु झाली. एखाद्या मोठ्या साहित्यिकाची मुलाखत असावी म्हणून आम्ही परिषदेमार्फत दमांशी (द. मा. मिरासदार) संपर्क केला. नशीब चांगले त्यांनी होकार पण दिला. मग काय, आनंदी आनंद गडे. गुढी पाडव्याच्या अदल्या दिवशी बुके सरांच्या कृपेने कॉलेजचे अडीच गांधीजी @ घेऊन आम्ही पुण्याला निघालो.
येताना आधी मौजला आलो. टिपिकल ग्रामिण मराठवाडी गाव. त्या वातावरणाला शोभेल असाच वाडा. अर्थात केन्डे गुरुजींचा वाडा म्हणून प्रसिद्ध. रात्रीचे जेवण छान अंगणात केले. आजी बरोबर मस्त गप्पा मारल्या. त्यांच्या लग्नात आमरसाचा बेत होता अन अंब्याचा रस करायला मोठा हौद तयार केला होता, आणि रस करण्याकरिता काही माणसे त्यात उतरली होती... या कल्पनेने मी तर उडालोच.** रात्री खूप वेळ गप्पा मारुन आम्ही झोपलो. तसे रात्रीच्या गप्पा ह्या मला आणि भास्करला काही नव्या नव्हत्या. 'प्रकाशगड', लक्ष्मी कॉलनी $$ ची गच्ची याची साक्षीदार आहे. अनेक रात्री आम्ही तिथे जागल्या, बहुतेक सर्व विषयांवर चर्चा करताना घालवल्या आहेत. असो.
सकाळी उठून आम्ही 'होल वावर इज आवर' उरकून आलो. येताना लिंबाचा डोहाळा आणला. केन्डे वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे न्हाणीघर... बहुतेक जगातील सर्वांत मोठे बाथरुम हेच असावे. मी आजपर्यंत येवढ्या मोठ्या खोलीवजा बाथरुम मध्ये अंघोळ केली नव्हती. त्यामुळे अंघोळ न ठरता नव वर्षाचे पहिले शाही स्नान ठरले. मस्त आवरून आणि नाष्ता करुन आम्ही विवेकच्या लुनावरुन बीडला गेलो. येताना कनकालेश्वर, खंडेश्वरीच्या दीपमाळा... त्याही उंचीवर गप्पा मारल्या... शेवटी साईट पाहून आम्ही जेवायला घरी आलो. छानपैकी पुरणपोळ्यांचा अस्वाद घेतला. पुरणपोळ्या म्हणजे आमचा वीक-पॉईंट. यथेच्च भोजन करुन झाडाखाली अंगणात वामकुक्षी घेतली. नवहिंदूवर्षाच्या पहिल्या दिवशी मौजला मजा करुन अनंत आठवणी सोबत घेऊन संध्याकाळी आम्ही भास्करच्या आवडत्या गाडीने (ट्रक) नगरला निघालो....."
२३ एप्रिल १९९९

धन्यवाद!
मनिष मधुकरराव कुलकर्णी
---------------------
टीपः
@ (म्हणजे गांधीजींच्या प्रतिमेवाल्या नोटा)
** मनिष, एक सुधारणा... ही घटना त्या आजींच्या लग्नातली नव्हे तर त्यांच्या व्याह्यांच्या म्हणजे माझ्या अजोळच्या आजी अजोबांच्या लग्नातली आहे जी मौजच्या आजींनी सांगितली.
$$ प्रकाशगड म्हणजे अभाविपचे कार्यालय जेथे आम्ही रहायचो व जे श्री प्रकाश पाठक यांच्या कर्यकाळात बांधले गेले... त्याचे नामकरण आम्ही प्रकाशगड केले होते हे त्यांना कळाले असते तर आम्ही कदाचित फटके खाल्ले असते. असो.. प्रकाशभैय्यांची आठवण झाली की आजही भिती वाटायला लागते...

No comments: