Thursday, September 11, 2008

अवडंबर

कथा काल्पनिक आहे. एखाद्या व्यक्ति वा परिस्थितीशी साम्य वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
वार्‍याची हळुवार आलेली झुळूक जशी मावळत्या उन्हात लांबच लांब कललेल्या झाडांच्या सावल्यांना झाडाच्या फांद्यांपेक्षा जास्तच हलवत होती तशीच ती लक्ष्मीच्या तगमगत्या देहावर हळूच गारव्याचा भासही देत होती. नेहमीच वक्तशीर असणारी लक्ष्मी आज उशीर होऊ नये म्हणून धडपडत होती. 'कशाला मी त्या जुनाट ट्रंकेतून या सगळ्या आठवणींच्या गाठोड्याला काढत बसले?' असे स्वगत विचारत ती एकएक वस्तू पुन्हा तीत ठेऊन देत होती. लग्नात माहेरुन आलेला बाळकृष्ण कितीतरी दिवसांनी पाहताना तिला अंमळ चुकल्यासारखे वाटत होते. पेटारा बंद केला पण बाळकृष्णाचा हाताला झालेला स्पर्श बर्‍याच आठवणींना जागा करून गेला होता.

काळोख दाटून येऊ लागला तसे लक्ष्मीनं दिवाणखान्यातले व माडीतल्या प्रशस्त खोल्यांचे मंद दिवे लावले. तशी आज तिच्याकडे लोकांची वर्दळही नव्हती.
- - - - -

लक्ष्मी जीवनात आली अन कालपर्यंतच्या गोरक्याला गाव हळूहळू गोरख म्हणू लागले . आई-बापाची, बायकोची काळजी घेणारा गोरख कष्टाळू होता. बहिनीच्या लग्नातले कर्ज या सालात मोकळे करुन पुढच्या पाडव्याला एखादी बैलजोडी घ्यायच्या जिद्दीनं रानात राब-राब राबत होता. बायको पण पदर कमरेला खोऊन साथ देत होती. म्हातारे आई-बाप होईल तेवढं जनवार-ढोर, खुरपनी, राखनी करायचे. सगळ कसं सुखात चाललं होतं. पण नदीला महापूर काय आला आणी सगळं होत्याचं नव्हतं झालं. आई-बापाला वाचवायला गोरख्यानं पुरात उडी मारली आणी सगळ्यांवरच काळानं झडप घातली.

पण मागे उरलेल्या लक्ष्मीला काम मिळालं ते बरं झालं. पोटचा अंकूर रोपटं बनू शकला. पुरग्रस्तांना मदत करायला परदेशातून पैसे आणलेल्या संस्थेने दवाखाना काढला. त्यात लक्ष्मीला काम मिळालं.

डॉक्टरच्या हाताखाली काम करता करता, पुढं नर्स झाली. जिल्ह्याच्या ठिकाणी त्याच संस्थेचा मोठा दवाखाना झाला. तिथं बढती मिळाली. दवाखान्यात व्यवस्थापनाची तसेच धर्मप्रचाराची धुरा मोठ्या नेटाने पुढे चालविली. पुढे संस्थेचा व्याप वाढला. संस्थेनं मोठी शाळा सुरु केली. तिथल्या बर्‍याच जबाबदर्‍या आल्या. पोर सुद्धा मोठं होत गेलं. संस्थेने पुढं त्याला विदेशात शिक्षणासाठी पाठवलं. चार गावात नाव झालं.

हे सगळं मिळवताना लक्ष्मीला काय कमी कष्ट पडले? पण आता हा कष्टाचा रगाडा ओढवत नव्हता. तसेही आजूबाजूच्या गावातल्या अनेक लक्ष्म्यांना पोटापाण्याची भ्रांत होती. त्यातली एक मालन. तिची गरज, तिची गुणवत्ता, हे सगळं बघता ती यापुढे आपली कामे यशस्वी रित्या करील अशी लक्ष्मीची खात्री होती. म्हणूनचा आज तिला लक्ष्मीनं खास बोलावून घेतलं होतं. लेकरांना चांगलं शि़क्षण, रहायला संस्थेची जागा, नोकरी, हे सगळं मिळणार म्हणून मोठ्या आशेनं आलेली मालन दारात वाट पहात उभी होती. ती दिसली तशी लक्ष्मी तिला सामोरी गेली. मालनला नोकरी, पगार, कामे हे सगळं समजाऊन सांगितलेलं होतच. बर्‍याच वर्षापूर्वी त्या पूरग्रस्त गावात तिच्याही जीवनाला अशीच नवी दिशा देणारा असा दिवस उगवला होता. त्यावेळीही असेच या संस्थेत मान असलेले, फादर रोड्रीग्ज कलकत्याहून पूरग्रस्त गावात आले होते. त्यांच्याशी ओळख करुन देऊन झाली. एवढा दीर्घ अनुभव पाठीशी असूनही त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सतत नवनवीन उपक्रम राबत राहणे ही त्यांची खासीयत होती. अशाच एका नवीन पर्वाची सुरुवात करण्यासाठी फादर तयार झाले.

कथेवरील प्रतिसाद व चर्चा येथे पहा

No comments: