Wednesday, January 2, 2008

घसरगुंडीची शाळा - २

पहिल्या दिवशीचा अनुभव पाठीशी घेऊन आम्ही दुसर्‍या दिवशी स्कीच्या टेकट्यांकडे निघालो. आमचे कालचे साथिदार आज गायब होते. त्यांना केवळ अनुभव म्हणून एकदा स्कीईंग करुन बघायचे होते ते त्यांनी साध्य केले होते. शिवाय आज त्यांची येण्याची स्थिती सुद्धा नव्हती. कोणाचा गुडघा, कोणाचा खांदा तर कोणाची पाठ दुखत होती. माझेही अंग जरा जड वाटत होते पण दुखापत नसल्याने तसेच उत्साह फुरफुरत असल्याने आम्ही निघालो.

पहिल्या दिवशी थंडी कमी असल्याने (४ ते ७ डि.से.) कान टोपीची वगैरे गरज भासली नव्हती. आज मात्र थंडी चांगलीच असल्याने कानाला हुड लावावे लागत होते. आम्ही अस्त्र-शस्त्रे लेऊन सज्ज झालो. स्कीईंग साठी तीन आवश्यक तर चार-पाच ऐच्छीक साहित्य लागते. आवश्यक सामान या प्रमाणे...

बूट: हे बूट स्नो-बूट प्रमाणेच नडगी बरोबर उंचीचे असातात. त्यात पायाच्या पंजाला तसेच पिंडरी-नडगीला पक्के करण्यासाठी यंत्रना असते. ही यंत्रना दोन-तीन वेगवेगळ्या प्रकारची असते. आम्ही हे असे बूट वापरत आहोत.स्कीज (घसर पट्टी) : स्कीज तुमच्या बुटाच्या मापाच्या असाव्या लागतात. त्यांतली बुटाला आवळणारी पकड लांबीला थोडीशी कमी-जास्त करता येते. बुटांना स्कीमध्ये आडकवण्यासाठी त्यात बुटासह असलेला पाय घालून दाब द्यावा लागतो. तर बूट बाहेर काढण्यासाठी त्याला एक कळ असते. ही कळ हाताने तसेच पोलने दाबायची असते. अवजड बुटांमुळे बरेच वेळा स्की पर्यंत हात पोहचत नाहीत म्हणून पोलचाच उपयोग करावा लागतो.पोल (छड्या) - स्कीईंग करताना बहुतेक खेळाडू दोन्ही हातात पोल पकडतात. पोल पकडताना त्याचा पट्टा हातच्या नाडीला समांतर घेऊन मुठीत आला पाहीजे व त्याला पोल सोबतच पकडले पाहिजे. अन्यथा आंगठा दुखावला जाण्याची शक्यता असते.याशिवाय शिरस्त्रान, गॉगल्स, सुद्धा खेळाडुंनी बाळगायला हव्यात याची प्रचिती आम्हाला दुसर्‍या दिवशी आली.

सुरुवातीला वार्म अप म्हणून मी कालच्याच प्रकारे दोरीला पकडून छोट्या टेकडीवरुन एकदा घसरगुंडी केली. काल आम्हाला शिकवायला असणारे दोन्ही प्रशिक्षक आज दिसत नव्हते. आजही आमच्याकडे शिकाऊ तिकीट असल्याने आम्ही आमच्या शंका तिथे उपस्थित असणार्‍या प्रशिक्षकांना विचारू शकत होतो. पण तशी गरज वाटली नाही. आजचे ध्येय म्हणजे गती न वाढवता अगोदर वळायला शिकणे, त्यानंतर थोडी गती वाढवने जेणे करून एक दोन दिवसानंतर प्राथमिक गटातून वरच्या गटात (मॉडरेट लेवल) जाता येईल.

आणि आम्ही थोड्या मोठ्या टेकडीवर निघालो. वर जाताना कोणत्या मार्गाने यायचे याची आखणी करत होतो. काल त्या छोट्या टेकडीवर आमच्या अशा आखण्यांची वाट लावायला अम्हाला मार्गात हाटकून कोणीतरी धडकत असे (म्हणजे ते समोर आल्यावर आम्हाला वळता न आल्याने आम्ही त्यांना धडकत असू). त्यावर उपाय म्हणून अगदी उतारावर सुद्धा गती पूर्ण थांबवता येण्याची कला आम्ही आज आवगत केली होती (हे आज पर्यंत आमच्या कोणाही मित्राला न जमलेले कसब आल्याने विश्वास वाढला होता).दोरावरुन वरती जाताना पायात किती जास्त ओझे आहे हे जाणवत होते. नेहमी ओझ्याखाली दबलेल्या पायांना हे बुटाचे-पट्ट्यांचे ओझे ताणून लोंबकळत होते. त्याच बरोबर खाली घरगुंडी करत असणार्‍यांकडून बरेच शिकायलाही मिळत होते. नेमके काय केल्याने हमखास पडणार व काय केल्याने नाही याचे आकलन करता करता आम्ही टेकडीवर पोचलो सुद्धा. आरे बापरे! आता या पाळण्यातून खाली उतरताना सावरायचे कसे? आठवले, पिझ्झा! पिझ्झा (उलटे इंग्रजी अक्षर व्ही) केल्याने गती कमी होते. पण तो पर्यंत मागच्या पाळण्यातले लोक पाठीवर येऊन आदळले तर? ठरले, छोटा पिझ्झा!

जमले रे बॉ! चला पहिली पायरी तर झाली. पण हे काय, सगळी टेकडी बंद! मला जाता येण्यायेवढा मार्गच शिल्लक राहिला नव्हता. सगळीकडे पडलेले लोक. एव्हाना आमच्या स्कीने गती पकडलेली. पायांनो वळा, वाळा... राम, राम, राम... आठवले "डावीकाडे वळायला उजव्या पायवर भर द्या अन उजवी कडे वळायला डाव्या पायावर" आमच्या प्रशिक्षकाचे हे वाक्य काय ऐनवेळी आठवले हो!

आणि चक्क पहिल्याच चकरीत मी टेकडीच्या पायथ्यापाशी. चला, सौंच्या हजेरीत पडापडी नाही झाली. त्यातही जर एखादी बाई येऊन आदळली असती तर उद्यापासून स्कीइंग बंद होण्याचा धोका होता... टळला एकदाचा!

दुसर्‍या फेरीत पाळण्यामध्ये एक मित्र झाला. त्याचे नाव ल्यूक, वय केवळ चार वर्ष पण मोठ्यांना लाजवेल अशी त्याची गती, वळणावरचे नियंत्रन. त्या पोराने मला एक ध्येय दिलं. मी शक्य तितक्या लवकर माझ्या मुलीला स्कीईंग शिकवायला आणणार! पण "कोणाला पोहायला शिकवायचं तर दुसर्‍याचा जीव वाचवता येईल येवढं चांगलं पोहता आलं पाहिजे" हा नियम ईथे सुद्धा वापरायचा होता. आता स्वतःची साधन सामग्री विकत घ्यायचीच!

बघता बघता चार तास कसे गेले कळलेच नाही. प्रत्येक चकरी सोबत गतीवरचं तसच वळनांवरचं नियंत्रण जास्त चांगलं जमत होतं. आता त्या मोठ्या टेकड्या/डोंगर खुणावत होते. तितक्यात मस्त हिमवर्षाव सुरु झाला. पाळण्यातून समोर दिसणारे डोंगर, खाली पांढर्‍या शुभ्र बर्फाचे गालीचे अन त्यात हे अलगद झोकावत-झोकावत खाली येणारे हे कापसा सारखे बर्फाचे पुंजके... किती विहंगम दृष्य ते! पण हे काय, घरगुंडी सुरु झाल्यावर गती घेऊन खेळताना ते सुंदर बर्फाचे इवले-इवले दिसणारे पुंजके सुयांप्रमाने डोळ्यात घुसत होते. उद्याला गॉगल पाहिजे हे खरं पण बंद डोळ्याने खालपर्यंत पोचायला तर हवं!

----
या लेखावर येथे चर्चा चालू आहे.

No comments: