Friday, January 4, 2008

दंत (कथा नव्हे) अनुभव

आरोग्य पत्रिकात सगळे विद्वान सांगत असतात की तुम्ही कितीही पैलवान असाल पण जर दाताच्या आरोग्याकडे तुमचे लक्ष नसेल तर तुमच्या अरोग्याला तुम्ही सुरुंग लावलेत असे समजा. दात खराब असतील म्हणजे किडलेले असतील वा साफ केलेले नसतील तर तुम्ही खात/पीत असलेल्या प्रत्येक घासा सोबत/घोटासोबत तुम्ही त्या अन्नाचे मारेकरी पोटात पाठवत आहात. अन्नाची वाट लाऊन हे जीवजंतू स्वस्थ बसतीलच असे नाही तर तुमच्या पचन संस्थेवर तसेच पुढे शरीरात शिरुन आतल्या अनेक संस्थांवर ते हल्ले करत राहतात.

म्हणजेच निरोगी रहायचे असेल तर दातांना सुद्धा निरोगी ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य बनते. सुदैवाने वा दुर्दैवाने आम्हाला पाश्चात्य जीवनाबरोबरच भारतीय ग्रमीण तसेच शहरी जीवन सुद्धा चांगलेच अनुभवायला मिळाले आहे. या तिन्ही जीवनपद्धतीत आमच्या दंत आरोग्यावर वेगवेगळे परिणाम झाले. त्यांना येथे उतरवत आहोत.

ग्रामीण जीवन :
आमच्या परस बागेत तसेच गावात कडुलिंबांची संख्या भरपूर असल्याने कडुलिंबाची काडी हे आमचे दात साफ करण्याचे (केवळ घासन्याचे नव्हे) मुख्य साधन असे. कधी कधी बदल म्हणून मोगला, उंबर (औदुंबर), सुबाभूळ, वगैरे झाडांच्या काड्या सुद्धा आम्ही वापरत असू. फार कोवळी वा फार मजबूत नसलेली एक वीतभर काडी एका टोकाला आडकित्त्याने व्यवस्थित तोडून नंतर तिला हळू-हळू चावत चावत एका टोकाला एक इंचभर लांबीचा ब्रश बनवायचा. मग त्या मऊ पडलेल्या ब्रशने दातांच्या मधून तसेच हिरड्यांची सफाई करायची. ब्रशचे धागे नैसर्गिक रित्या तयार झालेले असल्याने त्यांत लहान मोठे तसेच मजबूत व मऊ असे सगळ्या प्रकारचे धागे असत. ब्रश तयार करताना दाढींचे पृष्ठभाग साफ व्हायचे तर नंतरच्या ब्रशमुळे दातांच्या मधले अन्नकण पूर्णपणे निघून जात. कडुलिंबाच्या औषधी गुणांमुळे घशातले जीवजंतूही मरुन जात व दिवसभर श्वास कसा मस्त तजेलदार रहात असे.

शहरी जीवन :
आमच्या दातांना थोडेफार ग्रहण लागले ते शहरात रहायला लागल्यावर. कडुलिंब न मिळाल्याने नाईलाजाने आम्हाला ब्रश-पेस्टचा सहारा घ्यावा लागला. आपल्याकडे अजूनही खूप चांगल्या प्रकारचे ब्रश वापरणे सामान्यांच्या आवाक्यातले नाही (किमती हजार रुपयांच्या पुढे आहेत). साधारण ब्रशने दांतांच्या मधले किटाणू जात नाहीत तसेच हिरड्यांची सुद्धा झीज होते. एकंदरीत शहरी पद्धतीने (ग्रामीण भागात सुद्धा) राहणार्‍या सर्वांच्या दांचे आयुर्मान प्रचंड कमी असते. पन्नाशीत बत्तीशी पूर्णपणे गमावलेले अनेक लोक आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. काही म्हणतात की ही आपल्या समाजाची संक्रमण अवस्था आहे. पण त्यासाठी काय दोन-तीन पिढ्यांनी आपले बलिदान द्यायचे? मी केवळ दातांचेच नाही तर त्यांच्या आयुष्याचे म्हणतोय. कारण निरोगी दात असतील तरच निरोगी आरोग्य.
बरे आपल्याकडचे डेंटिस्ट तरी काय मजेशीर. मी मुंबईतल्या एका चांगल्या डेंटिस्ट कडे सहामाई दंतसफाई साठी गेलो होतो. त्याने माझे दात साफ करायचे सोडून सल्ला दिला की तुझे दात साफ करायची काही गरज नाही कारण दात-हिरड्या फार व्यवस्थीत दिसत आहेत. आणि नेहमी-नेहमी अशी सफाई केल्याने तुझ्या हिरड्यांची झीज होईल (व्यवस्थित सफाई केल्यास हिरड्यांना इजा पोचत नाही हे मी त्याला शिकवायाची गरज पडावी?). मी म्हटलो की मला कधी-कधी दुर्गंधी आल्यासारखी वाटते. तर म्हणाला की तुझ्या दाताला शक्यच नाही! काय बोलणार, कप्पाळ!


पाश्चात्य जीवन :
इकडे अमेरिकेत जवळपास सर्व जनता दर सहा महिन्याला दंत-सफाई करुन घेते. प्रत्येक दाताचे हिरडीसोबतचे आंतर मोजले जाते. जर हिरडी घट्ट नसेल तर त्यावर उपाययोजना केली जाते. आणि जर एखाद्यच्या हिरड्यातून रक्त येत असेल वा त्यात किटाणू मर्यादेपेक्षा जास्त असतील तर त्याची हिरड्यांच्या शल्यचिकित्सकाकडून सखोल सफाई केली जाते (मला वाटते ०.००१ मिमि पर्यंत). येथे डेंटिस्ट विद्युत घारणी असलेला ब्रशच सर्वांना वापरायला सांगतात. तसेच ब्रश सकाळ संध्याकाळ करायला सांगतात. त्याच बरोबर ब्रशने दातांच्या सांधींमधून तसेच खोल हिरड्यांमधून अन्नकण निघत नसल्याने फ्लॉस वापरणे अनिवार्य असल्याचे सांगतात. भारतात फ्लॉस काय भानगड असते ते कित्येक औषध विक्रेत्यांना सुद्धा माहित नसते. मग प्रश्न पडतो की आपण पाश्चात्यांप्रमाणे ब्रश वापरण्याचे सुद्धा अंधानुकरणच करत नाही का?

दंत शस्त्रक्रिये विषयी :
भारतात सर्वसाधारणपणे रुट कॅनाल केलेल्या दाताच्या मुळाला काही वर्षात पुन्हा किटाणू संसर्ग होतो व बहुतेक वेळेला तो दात गमावण्याची पाळी आपल्यावर येते. त्याचे कारण समजावून घेताना असे लक्षात आले की अद्ययावत यंत्रसामग्रीच्या अभवाने भारतातल्या बहुसंख्य रुट कॅनाल शस्त्रक्रियेत दात साफ करताना त्याच्या मुळाशी जाणे शक्य होत नाही. तो भाग खूपच चिंचोळा असतो व तेथे खूप कमी किटाणू मावू शकतात. ते किटाणू त्रास देण्याच्या संख्ये येवढे वाढेपर्यंत अनेक वर्षे गेलेले असतात. पण या दीर्घ काळा नंतर आपल्यावर दात गमावण्याची वेळ आलेली असते.
हीच बाब दताला टोपी (कॅप) बसवताना वा पूल (ब्रीज) बसवताना सुद्धा प्रकर्षाने जाणवते. आमच्या सौ.च्या दातांवर भारतात बसवलेल्या चार टोप्या व एक पूल दोन-तीन वर्षात उध्वस्त झाले. कारणे काय तर पुन्हा अद्ययावत यंत्रसामग्री व योग्य धातूमिश्रण यांचा अभाव. त्यामुळे बसवलेल्या टोप्यांची कडा दताच्या आवरणाशी एकजीव होऊन न बसल्याने वा जेथे तो धातू संपून दाताचा पृष्ठभाग सुरु होतो तेथे खाच निर्माण होते. हीच खाच किटाणूंचे घर बनते व कालांतराने टोपी वा पूल उध्वस्त होतो.

यावर जाणकार अधिक व शास्त्रीय दृष्टीकोणातून योग्य माहिती देऊ शकतील. आम्ही आमच्या अल्प बुद्धिला जेवढे समजले तेवढे लिहिले. पण एक मात्र खरे की जर आमच्या पुरते बोलायचे तर ग्रामीण जीवना नंतर गमावलेले दंत आरोग्य पुन्हा मिळवले आहे म्हणून आम्ही आनंदी आहोत.

----
या लेखावर येथे चर्चा चालू आहे.

1 comment:

A woman from India said...

"दाताच्या आरोग्याकडे तुमचे लक्ष नसेल तर तुमच्या अरोग्याला तुम्ही सुरुंग लावलेत असे समजा." सहमत.
माझ्या भारतातील दाताच्या डॉक्टरनेही माझे दात चांगले आहेत आणि काहीच करायची गरज नाही असे सांगितले. पण अमेरिकेतल्या डॉक्टरांनी मात्रं मी रात्री झोपताना दात एकमेकांवर घासत असल्याचा निष्कर्ष काढला. त्यासाठी रात्री झोपताना दाताला प्लॅस्टिकचे आवरण घालायला सांगितले.
हे आवरण बनवुन घेणे मात्र भारतात फार स्वस्तं पडते.