Tuesday, November 11, 2008

दर्शन भारत मातेचे

प्रत्येक वेळी भारतात जायचं म्हटलं की तो दिवस उजाडण्याची उक्तंठा लागून राहिलेली असते. विमानात बसल्यावर वाटतं की किती हळू हळू उडत आहे हा उडन खटारा! भारतात गेल्यावर काय काय करायचं याचे बेत मनात गर्दी करत असतात. घरी गेल्यावर दार कोण उघडेल. आई का भाऊ का वहिणी? आई-वडिलांच्या डोळ्यांच्या पानावलेल्या कडा, त्यांचे गोंजारणे, पाठीवरुन त्याच मायेने फिरणारा आजीच्या थरथरत्या हाताचा मायेचा स्पर्श, भावंडांच्या भेटीतला आनंद, मध्येच एखाद्या बहिनीचेही पानावलेले डोळे चोरुन पुसणे, "किती मोठी झाली आहे गं तू" असं आईचं तिच्या नातीला लाडानं बोलनं... मन अगदी अधीर होतं देशात पोहचण्यासाठी. तसच मागच्या भेटीतही झालं.

समोरच्या टिव्हीवरून हळू हळू युरोप पार करुन आखाताच्या पुढे सरकणारं विमान कधी एकदा मुंबईत पोचणार आणी कधी एकदा पवित्र मायभूमीचं दर्शन होणार असं झालं होतं. प्रवासात मनात अनेक विचार तरळत होते, आठवणी जाग्या होऊन जात होत्या. त्यापैकी एक डॉ. कलामांनी परदेशस्थित भारतीयांना उद्देशून केलेल्या भाषणाची. परदेशात असताना जसे काटेकोर नियमाचे पालन करता तसे भारतात आल्यावर सुध्दा का करत नाही या अब्दुल कलामांच्या प्रश्न वजा अवाहनाला यावेळी तंतोतंत पाळायचे असे अनाहुतपणे मनाने ठरवले. एरव्ही सुद्धा तसा मी नियमांचे पालन करतो पण यावेळी कटेकोर करायचे ठरवले.

शेवटी एकदाचं विमान मुंबईत उतरलं आणी आम्ही प्रवासी विमानतळात प्रवेश करु लागलो. दरवेळे प्रमाणे यावेळी सुद्धा नुतनीकरणाचं काम चालूच होतं. त्याचं ओंगळ प्रदर्शन व तिथला बुरसट वास आपण योग्य गावी आल्याची सुचना मेंदूपर्यंत पोचवून गेला. आम्ही सगळे दाटीवाटीनं बारीला लागलो. काही तासांपूर्वी युरोप-अमेरिकेतल्या विशाल व भव्य-दिव्य विमानतळात असणारे या चिमुकल्या विमानतळावर पोचलोच होतो तेवढ्यातच काहींच्या देशाच्या ओंगळपणाला लाखोल्या सुरु झाल्या. मला मात्र डोळ्यासमोर माझं घर, आई-वडिल, भावडं दिसत होती. काही तासांनी भाचे कंपनी "मामा मामा" करत आपल्या अंगा खांद्यावर उड्या मारत असतील या सुखाच्या कल्पनेत असलेल्या मनाला तेवढ्यात कोणाच्या तरी खेकसण्याने ताळ्यावर आणले. समोरच्या कुटुंबाचा खिडकीपाशी नंबर लागलेला होता.

"हे फॉर्म पासपोर्टात लावा अन मग द्या. शिकले सवरलेले आहेत म्हणे हे", त्या कुटुंबाचे सरकारी स्वागत कारकुनाने केले. त्या कुटुंबातल्या बापड्याने अज्ञेचे पालन करुन पुन्हा पारपत्रांचा गठ्ठा टेबलावर ठेवला. आपल्याला अत्यंत महत्वाचे वाटणारे पारपात्र म्हणजे या कारकुनांना किराणा दुकानातल्या रद्दीसमान आहे याची जाणीव आपल्याला व्हावी म्हणून की काय ठप्पा मारण्यापूर्वी त्याने ते पारपत्र अगोदर उलटे दुमडले व मग सरळ केले. एव्हाना पारपत्र धारकाचा जीव केविलवाना झालेला होता. तितक्यात दुसरे पारपत्र उघडून त्याने पुन्हा एक षटकार मारला.

"तुमची बायको अगोदरची का मुलगा?" कारकूनाचा प्रश्न न उमगलेला बाप्या म्हणाला, "म्हणजे?"
"अहो, बायकोचा पसपोर्ट मुलांच्या अगोदर लावायचा असतो. हॅ काय हे!" असे कुरकुरत कारकूनाने तो गठ्ठा परत त्या बाप्याकडे सरवला, "क्रमाने लाऊन द्या पुन्हा"... त्या बाप्याच्या चेहर्‍यावरचा संताप आता स्पष्ट दिसत असतो. ठप्पे लावण्यासाठी क्रमाची काय गरज? बरे उरलेली दोन पारपत्रे कोणाची आहेत हे समोरच्या कुटुंबाकडे पाहून शेंबड्या पोरानेही सांगितले असते. मग असा हेकटपणा का? माझ्यासारख्या बघ्यांना त्या कारकूनाच्या वागण्याने संभ्रमात टाकले. तसे मी आपले पारपत्र व कागदपत्रे व्यवस्थित क्रमाने लावलेली आहेत याची खात्री करुन घेतली. आम्हाला मात्र येथे नशिबाने साथ दिली व आम्ही त्या कारकूनाचे काही ऐकून न घेता आपले काम उरकते झालो.

आता पुढचा टप्पा. आपले सामान कुठे मिळणार म्हणून काही प्रवासी उगीच कुठे दिशादर्शक वा माहिती फलक आहेत का हे शोधत असल्यासारखे दिसत होते. तर काही जन "काय वेडे हे? अजून अमेरिकेतच आहोत का काय असं वाटतय वाटतं ह्यांना", अशा भावनांनी जमिनीवर उतरलेले असावेत असे वाटत होते. कारण ते बॅगा कुठे मिळणार याची देशी पद्धतीने चौकशी करत होते. दरम्यान गणवेशधारी विमानतळ कर्मचार्‍यांनी मला एव्हाना चार-पाच वेळा हटकले होते, "साठ डॉलर द्या, तुमच्या बॅगा काढून देतो. कितीही सामन आसू द्या साहेब... कॅमेरे, डिव्हिडी... आगदी बाहेर पोचवतो. बरं चला चाळीस द्या."

"अरे बाबा माझ्याकडं खरच काही नाहीये. तुम्ही सोडा मला", असे म्हणत मी माझे सामान घेऊन सगळे सोपस्कर करीत बाहेर आलो. सही सलामत बाहेर आल्यावर मनात उगीच विजयी भावना उत्पन्न झाल्या.

गाडीकडे जाताना मी काहीतरी शोधतो आहे हे आमच्या ड्रायवर ने हेरले. "साहेब, चहा शोधताय का मुतारी?" त्याने सरळ प्रश्न विचारल्यावर त्याला मी खिशातून चिंगमची रिकामी बेगडं काढून दाखवली. "मघाशी रांगेत असताना चिंगम चघळायला काढलं त्याची टरफरलं (बेगड) टाकण्यासाठी केव्हाची कचरापेटी शोधतोय पण सापडतच नाही", असे सांगितल्यावर मिश्किल हसत तो म्हणाला, "आना इकडं". अन क्षणार्धात त्याने तो कचरा माझ्या हातातून घेऊन रस्त्याच्या कडेला फेकला सुद्धा.

"कलाम सर, माफ करा. पहिली चूक. पुढच्या वेळी आम्ही कचरा कचरापेटीतच टाकू हो, पण ती आहे कुठं?" असा प्रश्न मनातल्या मनात कलाम साहेबांना विचारत गाडीपाशी पोचलो. दरम्यान गाडीत न बसल्याने एक मोठी बॅग गाडीच्या टपावर विराजमान झाली होती. आमची दिंडी गावाकडे निघाली.

तोच अंधेरी-कुर्ला मार्ग. उसाचा रस प्यायचो ती रसवंतीची जागा, ते वड्याचे गाडे, मित्राचा छोटेखानी कारखाना असलेली अरूंद बोळ अशा अनेक ओळखीच्या खुना न्यहाळत मुंबईच्या बाहेर पडलो.

"ये ती बॅग खाली काढून दाखव", नाक्यावरच्या हवालदाराने आमच्या ड्रायवरला फर्मान सोडले. बॅगा उघडून बघण्या अगोदर हवालदाराने मला विचारले, "ओ, काही सामान नसेल तर उगीच कशाला बॅगा उचकायला लावता?"
"तुमच्या कामात मी कशाला अडथळा आणू?" या माझ्या प्रश्नावर साहेबाची स्वारी जरा नाराज झालेली दिसली.
"मग सगळ्या बॅगा तिथं चौकीपशी घेऊन चला", हवालदारानं आदेश सोडला.
"भाऊंना फोन करु. म्हणजे इथं वेळ जाणार नाही", लहान बंधुने सल्ला दिला. पण कलाम सरांना दिलेल्या वचनामुळे मी त्या सल्ल्याला न बधता हवालदाराला सगळे सामान उचकटून टाकण्याची संधी दिली.
"या कंपूटरची पवती कुठं आहे?" काहीतरी सापडल्यामुळे त्याला आनंद झाला होता. पावती दाखवली.
"पावती तर ३ वर्षे जुनी आहे. याचीच कशावरून?", हवालदार त्याचे काम इमान ऐतबारे करत होता. म्हटलं संगणक बघून खात्री करुन घे. तर म्हणतो, "ते तपासायला तुमचा कंपूटर इथं जमा करुन घ्यावा लागेल."
म्हटलं हा काय कायदा आहे बुवा. तर तेच फिल्मी उत्तर मिळाले की आम्हाला कायद्याची भाषा शिकवू नका वगैरे. म्हटलं ठीक आहे. कोणत्या कायद्यानं जमा करायचा आहे ते पावतीवर लिहून द्या. मी तो न्यायला पुन्हा येईन. तर त्यावर हवालदार साहेब म्हणाले, "तुम्हाला ही तपासणी होईपर्यंत इथेच थांबावे लागेल".

मी पण मग निवांत उभा राहिलो. पुन्हा त्या हवालदाराला थोडा आनंद झाला. आता कॅमेरा सापडला होता. त्याचीही पावती दाखवली. पावत्यावरुन गिर्‍हाईक परदेशातून आलं आहे याची जाणिव साहेबाला झालेली होती. सामानात बाकी काही सापडले नाही. तसा पाच्-दहा मिनिटात दुसरा गणवेशात नसलेला त्याचा सहकारी म्हणाला, "काय साहेब, दोन्-चारशे द्यायचे. निघायचं. उगं कशाला टाइम पास करता फॉरेनवून आल्या आल्या". त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता मी तसाच उभा होतो. शेवटी त्यांनी कंटाळून आम्हाला तिथून निघण्यास सांगितले. तशी पडत्या फळाची अज्ञा समजून आम्ही पण निघालो. वाटले चला सगळे आडथळे पार पडले. आता सरळ गावी जाऊ.

पण कदाचित नशीब म्हणत होते. ये तो अभी शुरुवात है, आगे आगे देखो होता है क्या...

क्रमशः

वा लेखावर मिसळपाव वर भरपूर व गरमागरम चर्चा चालू आहे. ती पाहण्यासाठी येथे टिचकी मारा (क्लिक करा).

No comments: