Tuesday, November 18, 2008

दर्शन भारत मातेचे (भाग २)

मुंबई-पुणे दृतगती मार्गावरुन पुण्याला वळसा घालून शिक्रापूर मार्गे अहमदनगर-बीड असा आमचा प्रवास सुरु झाला. अद्यापपर्यंत दृतगतीमार्गावर दोनवेळेला टोल भरला होता. पण वाचलेल्या वेळामुळे अन हा महामर्ग नसताना पूर्वीच्या मार्गावर अनेकदा तासन तास घालवल्याच्या आठवणी विसरलेल्या नसल्याने हा टोल भरताना काही वाटले नाही.

पुढे पुण्याच्या वळणरस्त्यावर असताना बंधू म्हणाला, "अण्णा, पुढच्या वळणावर काही तरी गडबड असणार आहे". मी चमकलोच.
"तुझा अध्यात्मातला अभ्यास चांगला आहे. पण तुला भविष्य कधिपासून कळायला लागले?" मी प्रश्न टाकला. तसे आम्ही त्या वळणापर्यंत पोचलो होतो. आणि काय आश्चर्य तेथे एक अपघात झालेला होता. वाईट वाटण्यापेक्षा मला खूप राग आला होता.

प्लेगच्या बातम्या पसरल्या होत्या तेव्हा शासनाने उंदीर मारण्यासाठी ठिकठिकाणी सापळे लावले असल्याचे ऐकून होतो. पण येथे तर सरकारी लोकांनी प्रत्यक्ष माणसांना मारण्यासाठीच सापळा लावला होता. रस्त्याच्या कडेला बांधकामासाठी एक खड्डा खोदलेला होता व बांधकामासाठी आणलेल्या वाळूचा भर हमरस्त्यात ढीग घातला होता. त्याच्या बाजूला अंधारात सूचना देण्यासाठी साधे पांढरे दगड सुद्धा टाकलेले नव्हते. रात्रीच्या प्रवासात समोरुन येणार्‍या गाड्यांच्या दिव्यांमुळे हा ढीग दिसने शक्यच नव्हते. बंधूला मघाशी काय म्हणायचे होते ते मला चांगलेच समजले होते. त्याचे ते भविष्य कोणा शेमड्या पोराने सुद्धा वर्तवले असते पण शासनाला दिसले नव्हते... पण राग आणून करणार काय? सुदैवाने बंधू काल रात्री यातून वाचला होता. मुंबईकडे येताना त्याच्या समोरची कार अचानक उजवीकडे वळून या ढिगार्‍याला वळसा घालून पुढे गेली व हे या ढिगार्‍यावर चढले म्हणे. गती कमी असल्याने हे वाचले. पण त्या अपघातात सापडलेले जे कोणी होते ते सुदैवी नव्हते बिचारे.

असो. आम्ही जीव मुठीत घेऊन, भगवंताचे नाव घेत पुढे निघालो.


अशा पद्धतीची रहदारी बघितली नाही असे नाही. पण मध्येच उगीच पोटात गोळा आल्यासारखे होत होते.

पुण्याहून जसजसे मराठवाड्याच्या जवळ जाऊ लागलो तसतसे उघडी-बोडकी शेतं जास्त दिसू लागली. जुलैचा महिना पण एप्रिल-मे प्रमाणं कोरडं वाटत होतं. नगर जिल्ह्यात हमरस्त्याच्या बाजूला शेतात एक वस्ती होती. तिथं ही मुलं क्रिकेट खेळताना दिसली म्हणून त्यांच्याशी थोड्या गप्पा केल्या. शेतीची उन्हाळ कामं पारंपारिक पद्धतीनं उरकलेली होती. आता पावसाची वाट पाहनं चालू होतं. अन काम नाही म्हणून दररोज दिवसभर क्रिकेट खेळतो असं त्यांचं म्हणनं होतं.



शेणापासून स्वयंपाकाचा गॅस तसेच विद्यूत बनवता येते हे त्या मुलांना सुद्धा ठाऊक होतं. तसे प्रयत्न सुद्धा तिथे केले गेले होते पण योग्य मर्गदर्शन नसल्याने ते फसले. काही लोकांनी तर म्हणे जमीनीत खड्डे न खणता शे-दोनशे खर्चून जमीनीवरच नकली बांधकाम करुन बायोगॅसच्या योजनेचे पैसे खाल्ले होते. त्या तरुणांना विचारले तुम्हाला कुणी खरोखर मार्गर्शन केले तर तुम्ही बायोगॅस यशस्वी कराल का तर ते सगळे फिदी-फिदी हसले. आम्ही समजायचे ते समजून पुढे निघालो.

नगरपासून पूर्वेला बीडकडे जाणार्‍या रस्त्यालगत काही किमी वर हा यादवकालीन बारव आहे. उत्सुकतेपोटी त्यात पाणी किती आहे हे पहायला गेलो आणि...


याच्या कडेला ती माणसं बसली आहेत ना, त्याखाली छोट्या-छोट्या खोल्या आहेत. त्या वाटसरुंच्या निवार्‍यासाठी बनवलेल्या आहेत. त्यांची आता वाट लागलेली आहे हा भाग अलहिदा. या बारवाच्या बाजूला एक मंदिर होते (बहुतेक महादेवाचे) जे मुसलमानी राजवटीत नष्ट झाले. त्याचे काही अवशेष या कोरड्या बारवात पहायला मिळाले. आता तिथे केवळ एक छोटेखानी मंदिर उरलेले आहे.
हे विदीर्ण करणारे चित्र पाहून पुढे निघालो पण तेवढ्यात ग्रिष्मातल्या सरी याव्यात तशी एक आनंदाची झुळूक मनाला स्पर्ष करुन गेली.

<दिंडी व्हिडीओ>

या दिंडीच्या जवळ जाताच आम्ही गाडी थांबवली व वारकरी होऊन विठ्ठल नामात क्षणभर मन मग्न झाले. दुर्दैवाने आमच्या वाटा वेगळ्या असल्यानं पुन्हा गाडीत येऊन बसलो अन बीडाकडं निघालो.

दहा वर्षापूर्वी होता तसाच दहा ठिकाणी हाडं दुखावणाराच होऊनही दहा ठिकाणी विनाकारण टोल दिल्यामुळं दहा पटीने महाग झालेला प्रवास संपवून शेवटी आम्ही आमच्या मौज या गावी पोचलो.



बालपणीच्या आमच्या सवंगड्याने सुरु केलेले आमच्या गावातले हे दुकान. अशी आणखी दोन दुकानं गावात आहेत.

अशी उदास, भकास चेहर्‍याची बक्कळ माणसं आमच्या दुष्काळी भागात दिसतात.

हा आमच्या गावचे पुढारी द्वारकादास डावकर यांचा वाडा. काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षातून आत बाहेर उड्या मारण्यात, विधानसभा, पंचायत समित्या यांच्या निवडनुका लढण्यात अन मंत्री बनन्याची स्वप्नं बघण्यात हे साहेब एवढे मग्न असतात की वीज विकत घ्यायची असते हे माहित करुन घ्यायला त्यांना अद्याप वेळच मिळालेला नाही.

एकट्या बीड जिल्ह्यात विद्युत महामंडळाचे दर महिन्याला करोडो रुपयांचे नुकसान का होते त्याचे हे उत्तर.

----
क्रमशः

हा लेख मिसळपाव वर सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे. त्यावरचे प्रतिसाद वाचण्यासाठी येते टिचकी मारा (क्लिक करा).

No comments: