Monday, November 5, 2007

चला बोलू या - भाग १

आज येथे, महाराष्ट्रापासून दहा हजार मैलांवर, अनेक मराठी लोकांना आपापल्या जीवनात कुठे ना कुठे, कधी ना कधी तरी उपयोगात पडेल असा एक अगळा वेगळा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र फाउंडेशन व कनेटिकट महाराष्ट्र मंडळाने "चला बोलू या" नावाच्या एका चर्चा सत्रासाठी येथील सर्व मराठी कुटुंबांच्या जीवनाशी निगडीत विषय निवडला होता, "अमेरिकेतील मराठी म्हणून आपले विचार, अनुभव व आपल्या समोरील प्रश्न".
या चर्चा सत्रात तीन मराठी पिढ्यांचे प्रतिनिधी होते. या तीन पिढ्यात होते आपली मुले येथे अमेरिकेत लहानाची मोठी करणारे अनुभवी पालक, ज्यांची मुले आजून लहान आहेत असे नवीन पालक व तिसरे आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे असे मराठी तरूण/तरुणी जे या पश्चात्य संस्कृतीत वाढले आहेत. यांत अनेक क्षेत्रातले दिग्गज जसे डॉक्टर, सामाज सेवक, शिक्षक, उद्योजक, मानसोपचार तज्ञ, आदिंचा सुद्धा समावेष होता. त्यांनी परदेशस्थ मराठी समाजा समोरील विविध समस्यांवर चर्चा केली तसेच या चर्चेच्या माध्यमातून मौलिक माहितीची देवाण-घेवाण पण केली. कार्यक्रमाच्या सुव्यवस्थित संचलनाने त्याला सर्व उपस्थितांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला व तो अफलातून यशस्वी झाला हे सांगणे नको.
या चर्चा सत्रात चर्चिले गेलेले काही मुद्दे सहसा मराठी वा भारतीय कुटुंबात चर्चिले जात नाहीत ज्यामुळे काही घटनांना कसे सामोरे जावे याची आपाली तयारीच असत नाही. चला तर बघू या काय झाले या कार्यक्रमात.
कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच सर्वांत मूळ प्रश्नाने करण्यात आली.या देशात आपल्या मुलांना मराठी येणे कितपत महत्वाचे आहे? या प्रश्नावर आलेली प्रातिनिधीक मते...
एक अजोबा: येत्या दोन-तीन दशकात मराठीचा वापर खुद्द महाराष्ट्रातच कमी होणार आहे. तर येथे मुलांवर "मराठी बोल, मराठी बोल" अशी बळजबरी का बरे करावी? मला वाटते मराठीचा अट्टाहास आपण सोडला पाहिजे. कारण ती या मुलांची ज्ञान-भाषा नाही, ती यांना वाचता येण्याची शक्यता कमीच आहे ज्यामुळे त्यांना तिची गोडी लागणार नाही आणि गोडी लागली नाही तर ते ती पुढच्या पिढीला कशी देणार? मग जर मराठी आपल्या पुढच्या दोन पिढ्या सुद्धा जगणार नाही, तर मग या मुलांचे "टॉर्चर" का?
दुसरे अजोबा: मी माझ्या नातीला कधीच मराठी बोल म्हणत नाही. ती जी इंग्रजी बोलते तिचे उच्चार भारतातल्या इंग्रजीपेक्षा वेगळे असतात. मग मी तिला ते हळू-हळू मला समजेल असे बोलायला लावतो. त्यांनतर तेच मराठीतून तिला सांगतो. तिला ते उच्चारायला अवडते अन आमचा संवाद मराठी मध्ये सुरु होतो. "टॉर्चर"चा प्रश्नच नाही.
अमेरिकन मराठी तरूण (अ.म.त.): (त्याला "टॉर्चर" बद्दल विचारले गेले तेव्हा) हो, होते "टॉर्चर". पण शाळेत जाणे, अभ्यास करणे, चांगल्या सवयी लावणे, हे सुद्धा "टॉर्चर"च आहे. ते चालते तर मग मराठी बोलण्यालाच का सोडायचे? शाळेत गेल्याचा, अभ्यास केल्याचा व आई वडिलांनी चांगल्या सवयी लावल्याचा फायदा होतो तसाच मराठी येत असल्याचा अभिमान पण वाटतो. आपल्या ईतर मित्रांजवळ नसलेली एक खूबी आपल्यात आहे हे पाहून आनंद वाटतो.
अमेरिकन मराठी तरूणी (अ.म.ती.)ची आई: मुलांना मराठी शिकवण्यासाठी "टॉर्चर"च करायची गरज नाही. काही छोट्या-छोट्या घटनांमधून त्यांच्यात ती शिकवण्याची भावना जागृत केली तर ते आपोआपच शिकतात. माझ्या मुलांना दुकानात मला कोणाबद्दल काही सांगायचे झाल्यास त्या व्यक्तिसमोरच मराठीतून सांगता आल्याने फार गंमत वाटायची (एक गंमतीशीर उदाहरण सांगितले).यावर आणखी एका पालकाने त्यांच्या मुलाचा अनुभव सांगितला. सार्वजनीक ठिकाणी आई-बाबा रागाऊ लागले तर ते इतरांना समजून आपली वेशीवर टांगली जाऊ नये म्हणून हा म्हणायचा, "आई/बाबा, मराठीत, मराठीत".
पण या छोट्या-छोट्या घटनांमधून त्यांची नाळ मराठीसोबत बांधून ठेवण्यात हे पालक यशस्वी झाले. त्यानंतर काहींनी आपल्या मुलांमध्ये मराठी येते हा एक "कॉन्फिडन्स" वाढवण्याचा भाग कसा असू शकतो ते सांगितले. काहींना आपल्या भावना पोचवण्यासाठी आपली मायबोलीच उपयुक्त असल्याचे वाटते तर काहींना भाषा ही त्यात महत्वाची वाटत नाही.
त्यानंतर ऐरणीवर आलेला दुसरा प्रश्न...आपण या समाजाच्या मुख्य प्रवाहात का व कसे सामिल व्हायला हवे? उदाहरणार्थ आपल्या अन्नाच्या सवयींमुळे मुलांना येथे काही सामाजिक त्रास होतात का? आपण या सवयी बदलायला हव्यात का? कशामुळे व कशाप्रकारे?या मुद्याच्या चर्चेला सुरुवात झाली मुलांच्या डब्यांमुळे निर्माण होणार्‍या समस्यांपासून. आपल्या मुलांना भाजी-पोळी/भात वा आणखी काही भारतीय जेवण दिले तर ही मुले त्यांच्या शाळेत जेवताना वेगळे पडतात. आपल्या अन्नाचा सुगंध बाकीच्यांसाठी उग्र असतो त्यामुळे ते आपल्या मुलांना वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात करतात, कधि-कधि नावे पण ठेवतात, चिडवतात. मग आपली मुले डब्यात मराठी/भारतीय जेवण नको म्हणतात. तसेच त्यांच्या मनात आपल्या अन्नाबद्दल, सवयींबद्दल व एकूनच संस्कृतीबद्दल न्यूनगंड निर्माण व्हायला मदत होऊ शकते. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलाला त्यांच्या शाळेत जास्तच वेगळे वाटणार नाही असे जेवण द्यावे, जसे की गुंडाळलेली पोळी-भाजी, चमच्याने खाता येणारे व सुगंध न पसरवणारे पदार्थ, वगैरे. पण यावरच न थांबता अधून मधून आपल्या सणांचे/उत्सवांचे निमित्त साधून अमेरिकन मुलांना जमेल असे पदार्थ (शंकरपाळे, साधी चकली, चुरमुर्‍याचा दाणे नसलेला चिवडा (जेणेकरुन कोणा अलर्जीवाल्याला त्रास होणार नाही), वगैरे) घेऊन शाळेत जावे. त्यांना आपल्या पदार्थांची माहिती करून द्यावा व त्यातून ते आपल्या मुलांस नावे ठेवणार नाहीत असा "ऍक्सेप्टन्स" मिळवावा. अशा प्रयोगशील पालकांनी या गोष्टींचा त्यांच्या मुलांना झालेला फायदा, त्यातून त्यांचा उंचावलेला "कॉन्फिडन्स" यांची काही उदाहरणे सांगितली. त्यातील एक म्हणजे आपल्या एका मराठी मुलाच्या मित्रांना शंकरपाळे एवढे आवडले की तो त्याच्या स्काऊट वगैरेची कमाई करण्यासाठी शंकरपाळे मित्रांना विकत असे!
एकंदरीत काय तर तुम्हाला तुमच्या जेवणाच्या सवयी सोडून द्यायची गरज नाही. तर गरज आहे ती आपल्या व त्यांच्यात सूवर्णमध्य साधन्याची.
क्रमश।पुढील भागात आपण खालील विषयांवरील चर्चेचे अवलोकन करू या. दरम्यान आपण या भागावर आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही विनंती...भाग २:आपली सांस्कृतिक/धार्मिक ओळख आपल्या मुलांनी कशी निर्माण करावी? त्यासाठी आपण मुलांना आपल्या धर्माबद्दल व संस्कृतीबद्दल, केव्हा (कोणत्या वयात), काय व किती सांगावे? मुलांच्या प्रश्नांना (आपण चर्चला का जात नाही?, थ्यांक्सगिव्हिंगला टर्की का करत नाही? वगैरे) उत्तरे कशी द्यावी? मुलांना त्यांच्या मित्रांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायला कसे तयार करावे? अशा घटनांमधून मुलांच्या मनाला कसे जपावे? काय टाळावे व काय टाळायची गरज नाही?भाग ३:आपणास आपल्या भारतातील जवळच्या नातेवाईकांची विषेशत। आई-वडिलांची येथे सतत उणीव भासते. तसेच आपल्या मुलांना त्यांच्या आजी-आजोबांची व ईतर नातेवाईकांची भासत नसेल का? त्यांचे सर्व नातेवाईकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण व्हावेत यासाठी आपण काय करू शकतो?भाग ४:आपल्या मुलांच्या डेटींगच्या प्रकरणात आपला सहभाग काय? मुलांसोबतचे संबंध जपत त्यांना मदत कशी करावी? शाळेत लैंगिक शिक्षण सुरु झाल्यावर आपण त्यांच्याशी काय बोलावे व कसे वागावे?

1 comment:

bhaskarkende said...

हा लेख मी सर्वप्रथम उपक्रमवर लिहिला. त्यावर झालेली चर्चा येथे आहे.

http://mr.upakram.org/node/800

तसेच मूळ लेखात काही मुद्दे विसरले होते ते सुद्धा नंतर चर्चा स्वरुपात मी टाकत गेलो.