Monday, November 5, 2007

आणि मुक्या ढाल जिंकतो............

मुक्या नेहमीप्रमाणे त्याच्या दोस्तांसोबत खेळत होता. धुळीने अंग माखून निघाले होते. तिकडून आईच्या हाका सुरू होत्या. संध्याकाळचा काळोख पडायच्या आत खेळ संपवून निघायचे होते. अंगणात शेजारच्या कंपाउंडर काकाच्या रेडिओवर हिंदी बातम्या चालल्या होत्या. नाना-मुकादम त्यांच्याकडे आलेला होता. पायरीच्या एका कोप-यावर बसून डाव्या हातातली तंबाखू उजव्या हाताच्या अंगठ्याने मळत समोरच्या कडुनिंबाच्या उंच शेंड्याला न्याहाळत किलकिले डोळे करून कान रेडिओकडे रोखून धरत खरखरणाऱ्या रेडिओतून आलेले सगळे समजत आहे अशा अविर्भावात नाना काकांच्या हो ला हो मिसळत होता. काकांनी टाळ्या पिटल्या तशा नाना सुद्धा वाहवा करत टाळ्या पिटू लागला. मुक्याला पण काहीतरी विशेष घडले आहे असे वाटले व त्याने कुतूहलाने काकांना विचारले,"काय झाले आहे हो काका?" काका मात्र त्या कार्ट्याला हातानेच शांत राहण्याचा इशारा करून पुन्हा बातम्यांत मग्न झाले. नानाला पृच्छा करण्यात काही अर्थ नाही कारण त्यांना हिंदी समजत नाही हे त्याला ठाऊक होते. तरी पण उगीच ताटकळत उभा राहण्यापेक्षा प्रयत्न केलेले बरे म्हणून मुक्याने नानाला विचारले, "नाना, तुम्ही तरी सांगा काय बातमी आहे ते?"
"तुला रं काय काय करायचंय? जा तिकडं तुझी माय हाका मारायतीय तुला."
"नाना, बातमी काय आहे ते कळले नाही असं म्हणा ना सरळ," बेरक्या मुक्याने नानांच्या मर्मावर घाव घातला तसा नानांचा चेहरा पडला व काकांना खुदकन हसू आले.
"नाना सांगा ना त्याला की आपल्या पी. टी. उषाने सुवर्णपदक जिंकले म्हणून", शेवटी काकांनी नानाला आधार दिला.
"हे सुवर्णपदक काय असते?" पुन्हा मुक्या उत्तरासाठी उतावीळ झाला.
"आपल्या गावच्या जत्रात रामू पहिलवानाला कुस्तीत ढाल मिळाली ना तशीच मिळाली हीला," नानांनी पुन्हा आपली अक्कल पाजळवली होती व काका पुन्हा बातम्यांत हरवले होते.
मुक्या घरी आला खरा पण त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. काकांना या उषाच्या विजयात येवढा आनंद का झाले असेल बुवा? कदाचित त्यांच्या नात्या-गोत्यातली असेल ती. पण तिला रामू पहेलवानासारखी ढाल कशी बरे मिळाली असेल? छे, ती कुस्ती नसेल खेळली, काही तरी दुसरा खेळ असेल. पण काका तर सुवर्ण पदक म्हणाले? खरेच सोन्याचे ताट असेल का ते? काका शहरात राहिलेले एकमेव जाणकार आहेत. त्यांना सगळे माहित असते. पण ते आपल्याला सरळ उत्तर देतील याचा भरोसा नाही... जर ते सोन्याचेच ताट असेल तर ती स्वतः जेवणार का त्यात, कथेतल्या राजकन्येसारखी? का आई-वडिलांना जेवायला देणार ते ताट? जर ती एकटीच त्या ताटात जेवली तर तिचे बहीण भाऊ नाही का भांडणार तिला? अशा कितीतरी विचारात असताना छपराकडे बघत-बघत मुक्याला झोप लागली होती.

गुरुजींनी फळ्यावर लिहून दिलेला उतारा सर्वांनी लिहून घेतला तसा मुक्याने पण घेतला होता. गुरुजी म्हणाले, "परवा आपल्या वर्गात मी उत्कृष्ट वाचन स्पर्धा घेणार आहे. या स्पर्धेत हा उतारा सर्वांनी वाचून दाखवायचा आहे. जो कोणी हा उतारा न अडखळता स्पष्ट व शुद्ध वाचून दाखवील त्याला आपल्या केंद्र शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते बक्षीस मिळणार आहे. बक्षिसाच्या खर्चासाठी सर्वांनी उद्या चार-चार आणे घेऊन यायचे आहेत."
"गुरुजी, बक्षीस काय असणार आहे?" मुक्याने न राहवून विचारले. "ते बक्षीस देतानाच कळेल," गुरुजींनी मुक्याच्या उत्कंठतेत भर घातली होती. सगळी मुले स्पर्धेच्या तयारीला लागली. बिचारा मुक्या मात्र डोळे आल्यामुळे वाचू शकत नव्हता. कसेतरी बाहेर पाहू शकत होता तेही मोठ्या मुश्कीलीने. गुरुजींनी आज त्याला मागे कोपऱ्यात बसायला सांगितले होते व कोणीही त्याच्या जवळ जायचे नाही असे बजावले होते. मधल्या सुट्टीत त्याने गुरुजींच्या वायरच्या पिशवीत हळूच डोकावून पाहिले होते. त्यात जेवणाचा डबा, मोठा पांढरा रुमाल आणि काहीतरी होते. "सुवर्णपदक असेल का? का छोटी ढालच असेल?" मुक्या अंदाज बांधायचा प्रयत्न करत होता. स्पर्धा सुरू झाली. सगळी मुले धडाधड जाऊन वाचून येऊ लागली. शेवटी गुरुजींनी मुक्याला बोलावले. मोठ्या कष्टाने डोळे चोळत मुक्या गेला व डोळ्यांची पर्वा न करता उतारा वाचून आला, अगदी सहजतेने. केंद्रावरून आलेल्या हजारे गुरुजींनी बक्षीस जाहीर केले. मुक्याचे नाव घेताच मुक्याला कोण आनंद झाला. बक्षीस घ्यायला जाताना सगळ्या वर्गाने टाळ्या पिटल्या होत्या. पण बक्षीस मिळाल्यावर मात्र मुक्याचा भ्रमनिरास झाला. फक्त पेन होता तो. शाळा सुटल्यावर शहरातून आणलेला भारीचा पेन पाहण्यात त्याच्या मित्रांनी धन्यता मानली होती तरी मुक्या मात्र संतुष्ट नव्हता.

पुढे मुक्याचे ते गुरुजी बदलून जाऊन नवीन गुरुजी आले. या नव्या गुरुजींना शाळेत रस जरा कमीच असे. त्यामुळे नंतर त्यांच्या गावच्या त्या शाळेत स्पर्धा वगैरे काही झाले नाही. मुक्या मात्र नेहमीप्रमाणे या वर्षी सुद्धा पहिल्या नंबरात पास झाला. आता पुढच्या वर्गासाठी मुक्याच्या दाद्याने त्याला शहरातल्या शाळेत घालायचे ठरवले. त्याचा दाद्या शहरातच कामाला असायचा.मुक्याला घेऊन दाद्या शहरातल्या शाळेत गेला. मुख्याध्यापकांनी त्याची गुणपत्रिका न्याहाळत मुक्याला काही प्रश्न विचारले. महाराष्ट्राची व भारताची राजधानी तसेच जगातला सगळ्यात मोठा देश विचारून झाल्यावर काही भागाकार-गुणाकाराची गणिते करून झाली. एक ओळ लिहायला लावून वाचून घेण्यात आली व मुख्याध्यापक दाद्याकडे वळले."पोरगा हुशार आहे. त्याला विशेष तुकडीत टाकू या. या वर्गात टाकल्यावर संस्कृत शिकायला मिळेल तसेच हा मेरिटच्या अपेक्षित विद्यार्थ्यांचा वर्ग असल्याने शाळा सुटल्यावर सुद्धा क्लास घेतले जातील. तुम्हाला खेड्यातून ये-जा करून जमणार नाही. याला इथेच ठेवावे लागेल. तसेच शाळेचा गणवेश व पायात चप्पल असणे आवश्यक आहे, "त्यांनी मुक्याच्या अनवाणी पायाकडे इशारा करत सुचवले. तसा दाद्यानेही होकार दिला. मुक्यालाही आनंद झाला. शाळे बद्दलचे अनेक विचार, अनेक स्वप्ने पाहत मुक्या घरी आला. मोठ्या शाळेत शिकायला मिळणार. या शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा होत असतील, त्यात भाग घ्यायला मिळणार म्हणजेच ढाल जिंकायची संधी! मुक्या मनातच हुरळून गेला. खेडवळ दिसणाऱ्या मुक्याला सुरुवातीला जेमतेमच मित्र होते. पण त्याच्या खेळीमेळीच्या स्वभावामुळे व हुशारीला पाहून गावातल्या एवढे नसले तरी त्याला बरेच मित्र मिळू लागले. मुक्याच्या अपेक्षेप्रमाणे या शाळेत स्पर्धा होत असत. पण अजून ढाल तर सोडाच शाळेतल्या निवड फेऱ्यांतच तो बाद होत होता. खेडवळ उच्चार आहेत म्हणून वक्तृत्व स्पर्धेतून बाद, सुभाषिते/श्लोक वापरता येत नाहीत म्हणून निबंधात बाद, समान उंचीत अक्षरे येत नाहीत म्हणून हस्ताक्षरातून बाद... बाद, बाद, बाद... इथली मुले घरीच सुभाषिते शिकून येत. मुक्याच्या तर बालाही सुभाषिते येत नव्हती. गावात याच्या बोलण्याचे कौतुक व्हायचे. तसेच याच्या पेक्षा सुंदर अक्षर याच्या गुरुजींचे सुद्धा नव्हते हे त्यांनीच कित्येकदा कबूल केलेले. गावातल्या शाळेत असताना कोणत्याही स्पर्धेत निर्विवाद पहिला असणारा मुक्या मागे पडत असल्यामुळे कधीकधी खचून जायचा. पण पुन्हा त्याला आठवायचा त्याचा दाद्या. गरीब असला तरी वरच्या जातीतला असल्याने मुक्याला वसतिगृहाने प्रवेश नाकारला तेव्हा तो दाद्यासोबतच राहायला गेला होता. मुक्याला अभ्यासात व्यत्यय नको म्हणून दाद्याने कामावरल्या आपल्या सहका-यांना सोडचिठ्ठी देऊन परवडत नसताना सुद्धा स्वतंत्र खोली केली होती. गावी मुक्याच्या घरातल्या एका खोलीत राहणाऱ्या कंपाउंडर काकांचे वर्षात होत नसेल येवढे भाडे मुक्याच्या दाद्याला शहरात एका महिन्यात द्यावे लागायचे. बाकीचेही खर्च खूपच होते. तरीही दाद्या याला शिकवायचेच यावर ठाम असे. आता मुक्याला ढाल व पदकातला फरक समजू लागला होता. त्याने मित्राच्या घरी टीव्हीवर व पेपरात ढाल-पदके मिळवणारे अनेक खेळाडू पाहिले होते. त्यासाठी काय करावे लागते हे सुद्धा माहित झाले होते. खेळात त्याची शाळा मागे होती. त्यांच्या शाळेत मैदानी खेळांच्या स्पर्धेत उतरून तयारी करण्यासाठी मैदान व साहित्य नव्हते. व ते असणाऱ्या महागड्या शाळा मुक्याच्या नव्हे पण त्याच्या दाद्याच्या आवाक्याच्या बाहेर होत्या. पण एके दिवशी त्याला आशेचा किरण दिसला. त्यांच्या शाळेत जिल्हा स्तरीय अडथळ्यांच्या स्पर्धेची सूचना फिरवली गेली. मुक्याने लगेचच संबंधित शिक्षकांशी संपर्क साधला. त्या मराठीच्या शिक्षकांनी त्यांना होती तेवढी माहिती दिली. "मुक्या आज बोलत का नाहीस रं?" दाद्याने रात्री झोपताना मुक्याला विचारले, "दाद्या, मला बूट पाहिजेत. पळायची स्पर्धा आहे."
"किती लागतील?""माझ्या मित्राने स्वस्तातल्या कंपनीचे घेतले दोनशे रुपये मोजून. पण बिनाकंपनीचे घेतले तर ६० रुपयाला मिळतात. मी बघून आलो सुभाष रोडला आज.
"आणि दोघेही डोळे बंद करून झोपल्याचे नाटक करता करता झोपून गेले होते. दुसऱ्या दिवशी मुक्या संध्याकाळी खोलीवर आला तर त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. दाद्या त्याच्यासाठी ते जोडे (शूज) घेऊन आला होता.

स्पर्धेचा रविवार उजाडला. सूचने प्रमाणे मुक्या सकाळी सहालाच जिल्हा परिषद मैदानात पोचला. प्रसन्न वातावरणात श्वान-वराहांच्या व्यतिरिक्त कोणीही इतर प्राणी हजर नव्हते. "हुशारांच्या" वर्गातला असल्याने त्याचा कोणी वर्गमित्र येणे अपेक्षित नव्हतेच. थोड्या वेळाने त्याच्या शाळेतले इतर काही मुले हजर झाली होती. स्पर्धा सातला सुरू होणार होती. पण आठ वाजेपर्यंत कोणीही मैदानावर न फिरकल्याने यांना परत जावे लागले होते. दुसऱ्या दिवशी शाळेत चौकशी केल्यावर कळले की स्पर्धेचे ठिकाण बदलून पोलिसांच्या कवायतीचे मैदान झाले होते. पण मराठीच्या शिक्षकांकडून स्पर्धांची जबाबदारी इतिहासाच्या शिक्षकांवर सोपवण्यात आली असल्याने ही सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली नाही...

स्पर्धेचा रविवार उजाडला. सूचने प्रमाणे मुक्या सकाळी सहालाच जिल्हा परिषद मैदानात पोचला. प्रसन्न वातावरणात श्वान-वराहांच्या व्यतिरिक्त कोणीही इतर प्राणी हजर नव्हते. "हुशारांच्या" वर्गातला असल्याने त्याचा कोणी वर्गमित्र येणे अपेक्षित नव्हतेच. थोड्या वेळाने त्याच्या शाळेतले इतर काही मुले हजर झाली होती. स्पर्धा सातला सुरू होणार होती. पण आठ वाजेपर्यंत कोणीही मैदानावर न फिरकल्याने यांना परत जावे लागले होते. दुसऱ्या दिवशी शाळेत चौकशी केल्यावर कळले की स्पर्धेचे ठिकाण बदलून पोलिसांच्या कवायतीचे मैदान झाले होते. पण मराठीच्या शिक्षकांकडून स्पर्धांची जबाबदारी इतिहासाच्या शिक्षकांवर सोपवण्यात आली असल्याने ही सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली नाही...

पुन्हा स्पर्धेचा दिवस उजाडला. मुक्या व त्याची दोस्त मंडळी स्पर्धास्थानावर पोहचली व तिथे आलेल्या बाकी स्पर्धकांना बघून यांना स्वतःवरच हसू येऊ लागले. बाकी जवळपास सगळे स्पर्धक मोठ्या वयाचे व बलदंड शरीराचे होते. त्यांनी मोठ-मोठे ढगळ बनियन व अर्ध्या विजारी घातल्या होत्या व त्यांच्या समोर ही पोरे-टोरे म्हणजे डेव्हिड-गॉलियथच्या कथेतल्या डेव्हिड सारखे वाटू लागले. त्यांच्या सायकली तर मुक्या आणि कंपनीने स्वप्नातही कधी पाहिल्या नव्हत्या अशा दिसण्यातच चपळ होत्या. व्हायचे तेच झाले. स्पर्धा सुरू झाल्यावर एक-दोन मैलाच्या अगोदरच ते स्पर्धक समोर दिसेनासे झाले व या मित्रमंडळाला मग मुक्याच्या रस्त्यात असणाऱ्या शेतात जाऊन बोरे-टहाळ-सिताफळे-हुरडा या रानमेव्याने विजयोत्सव साजरा करून परत येण्याची वेळ आली.

अशा अनेक स्पर्धा झाल्या. पण मुक्याचे ढाल मिळवण्याचे स्वप्न काही केल्या पूर्ण होत नव्हते. एके दिवशी शाळेतून परतताना नेहमी प्रमाणे मुक्या सार्वजनिक वाचनालयात वर्तमानपत्रे वाचत होता. त्याच्या नियमित वाचनाला व पुस्तकांच्या निवडीला पाहून वाचनालयातल्या एका कर्मचाऱ्याला चाणाक्ष मुक्या आवडायचा. त्याने एके दिवशी मुक्याला बातमी दिली,"आपल्या वाचनालयाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आम्ही मोठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेत आहोत. तुझे वाचन चांगले आहे. तू नक्की भाग घे." मुक्या सोडणार थोडाच होता. शाळेतही काही दिवसांनी ही सूचना फिरवण्यात आली. त्याने आपले नाव नोंदवले. त्याच्या त्या हुशारांच्या वर्गातल्या सर्वांनीच यात भाग घेतला. पहिली फेरी लेखी लेखी परीक्षेची होती. अनेक शहरात अनेक मोठमोठ्या शाळांना परिक्षाकेंद्रे बनवले होते. मुक्या आपल्या केंद्रावर उत्साहाने नेहमीप्रमाणे पोहचला. हजारो विद्यार्थ्यांच्या त्या इवल्याशा समुदायातून उत्साह भरभरून वाहत होता. अनेकजण आपले काही खरे नाही या भावनेने भेदरलेले दिसत होते. मुक्याला असे नव-नवे वातावरण बघायची आता सवयच लागली असल्याने त्याचा चेहरा मात्र शांत होता. परीक्षा झाली. हजारो विद्यार्थी गळाले. मुक्याचे नाव मात्र दुसऱ्या फेरीच्या यादीत होते. तसे त्याच्या वर्गातल्या त्या हुशार मुला-मुलींचे पण होते. आता दुसऱ्या फेरीत वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या विभागात परीक्षा द्यायच्या होत्या. मुक्या पुन्हा सज्ज. त्याच्या वर्गमित्रांची पुन्हा तयारी सुरू झाली. मुक्याला मात्र ही "तयारी" म्हणजे काय ते माहित नव्हते. त्याने वाचनालयातल्या त्या कर्मचाऱ्यास गाठले व तयारीबद्दल विचारले. "या वाचनालयातली सगळी पुस्तके वाच" एवढेच तो म्हणाला!! अवघड वाटणारी दुसरी व तिसरी फेरी सुद्धा मुक्या लीलया पार करून गेला। त्याच्या त्या हुशार वर्गमित्रांतले बरेच रथी महारथी सुद्धा गळाले होते. "याचे काय खरे आहे. चुकून पास झाला आहे तो." अशा अविर्भावात त्याच्याकडे बघितले जाऊ लागले. तेव्हा आता शेवटची चौथी फेरी पार करणे त्याला आवश्यक वाटू लागले होते. शेवटची फेरी मोठमोठ्या विभूतींच्या समोर मंचावर होणार होती.आणि तो दिवस उजाडला। वार्ताहर, छायाचित्रकार यांची गर्दी मंचासमोर होती. मंचावर संयोजक, पाहुणे तसेच परीक्षक येऊन विराजमान झाले. प्रास्ताविक झाले व शेवटच्या फेरीतील स्पर्धकांना मंचावर आमंत्रित करण्यात आले. मुक्याचे नाव घेतले गेले. तसा मुक्या गर्दीतून वाट काढत पुढे सरकू लागला. दाद्या कामावरून सुट्टी घेऊन आज पहिल्यांदा मुक्यासोबत स्पर्धास्थानावर आला होता. मंचावर चढताना दाद्याच्या प्रेमळ हाताची थाप पाठीवर पडली तसा मुक्या पाठमोरा वळला. दाद्याच्या डोळ्यात त्याने प्रचंड आत्मविश्वास चमकलेला पाहिला.शेवटी स्पर्धा सुरू झाली. चार स्पर्धक व एक बक्षीस, असंतुलित समीकरण होते. पहिल्या फेरीत सगळी उत्तरे बरोबर आली तशी मुक्याची गुणतालिका आघाडीवर गेली. पण दुसरी फेरी होती संगीताची. दुसऱ्या व तिसऱ्या परीक्षेच्या वेळी या विषयातले प्रश्न पाहिले असल्याने अंतिम फेरीतही हा विषय येणार हे त्याला माहित होते. संगीतातही प्रकार असतात, राग असतात, चाली असतात हे त्याला अशातच कळले होते. पण प्रश्न आला "हा राग ओळखा"... आणि मुक्या मागे पडला. त्याला आठवली ती पी. टी. उषा. कुठल्या मागास भागातून आलेली म्हणून सुरुवातीला जगाने हिणवलेली. सुरुवातीला प्रस्थापितांच्या मागे पडलेली व नंतर जिंकलेली. स्पर्धे दरम्यान दोन पावले मागे पडताच दुसऱ्याच क्षणाला चार प्रतिस्पर्ध्याच्या पुढे चार पावले जाणारी. मुक्याने क्षणभर डोळे मिटले. त्याला पुन्हा त्याचा दाद्या दिसला, काबाडकष्ट उपसणारा, पळण्यासाठी बूट आणून देणारा, हप्त्यावर सायकल घेऊन देणारा... अन आठवली त्याला दाद्याच्या काबाडकष्टाने खरबरीत झालेल्या हाताची प्रेमळ थाप मंचावर चढताना पडलेली. पुन्हा एकदा अपयश? छे, शक्य नाही हे पचवणे आता...

"आता पुढची व अंतिम फेरी", सूचना झाली तसा मुक्या भानावर आला. या फेरीत सर्वांना एकच प्रश्न विचारला जाणार होता व सर्वांत चांगल्या उत्तराला गुण मिळणार होते. मुक्याने गुणतालिकेकडे नजर टाकली. त्याचे व प्रशांत नावाच्या त्याच्या प्रतिस्पर्ध्याचे गुण सामानच होते ४८०.

प्रश्न आला, "तुमच्या जीवनाचे ध्येय काय?"

प्रशांत शांत व धिरगंभीरपणे उत्तरला, "माझ्या आई-वडिलांना अभिमान वाटवा असा व्यक्ती बनणे।" टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यात मुक्याचीही होती. आता माईक मुक्याच्या हातात आला. सगळे स्तब्ध झाले. काय बोलावे हे मुक्याला कळेना तेव्हा त्याने हे काम त्याच्या अंतरात्म्यावर सोडून दिले व नकळत त्याच्या ओठातून शब्द बाहेर पडले, "परं वैभवं ने तुमे तत् स्वराष्ट्रम्!" टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला, होतच राहिला, कदाचित न संपण्यासाठी!"आणि प्रथम विजेता आहेSS.... मुकुंद पुजारी!!"... पहिल्यांदाच मोठ्या भोंग्यातून आपले नाव ऐकून मुक्याला स्वतःच्या कानावर विश्वास बसेना. मुक्याने एकदाची ढाल जिंकली होती. पाहुणे उठले, आयोजक पुढे झाले, छायाचित्रकार पुढे सरसावले. प्रशांतला पुष्पगुच्छ मिळाला होता. आता मुक्याला पुढे बोलावण्यात आले... मुक्याने पाहुण्यांना चरणस्पर्श करून ढाल स्वीकारली. कॅमेऱ्यांच्या फ्लॅशने एका अनोळखी चेहऱ्याला पहिल्यांदाच उजेडात आणले. माईक पुन्हा मुक्याच्या हातात दिला गेला. त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. अन गहिवरलेल्या गळ्यातून थरथरत्या ओठांच्या मधून शब्द बाहेर पडले,"दाद्या इथे ये..."गर्दीतून वाट काढत डोळे पुसत कुणीतरी कृष तरूण मंचावर जाताना गर्दीने पाहिला. मुक्या पुढे झाला व दाद्या ढाल दाद्याच्या चरणावर ठेवली, "हीची जागा इथे आहे..." टाळ्यांच्या गजरात हे शब्द दाद्याच्या कानावर पडले व त्याने आपल्या या लहानग्या भावाला कडकडून मिठी मारली.

No comments: