Thursday, November 8, 2007

चला बोलू या - भाग २

लेख उपक्रमवर येथे पूर्वप्रसिद्ध...

आयोजकांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला.
आपली सांस्कृतिक/धार्मिक ओळख आपल्या मुलांनी कशी निर्माण करावी? त्यासाठी आपण मुलांना आपल्या धर्माबद्दल व संस्कृतीबद्दल, केव्हा (कोणत्या वयात), काय व किती सांगावे? मुलांच्या प्रश्नांना (आपण चर्चला का जात नाही?, थ्यांक्सगिविंगला टर्की का करत नाही? वगैरे) उत्तरे कशी द्यावी? मुलांना त्यांच्या मित्रांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायला कसे तयार करावे? अशा घटनांमधून मुलांच्या मनाला कसे जपावे? काय टाळावे व काय टाळायची गरज नाही?

एक तरुण पिता: मला वाटतं धर्म म्हणजे कर्मकांड हे आपण आपल्या मुलांना शिकवायची गरज नाही. त्यांना गरज पडल्यास ते तसे शिकू शकतील. पण त्यांना त्यांच्या जीवनात जेव्हा खूप मोठी अडचण येईल तेव्हा मर्गदर्शनाचा स्त्रोत हा त्यांचे आंतर्मन, त्यांचे जीवनातील अनुभव अन श्रद्धा हेच असते. यातली श्रद्धा फार महत्वाची आहे आणि ती आपल्याला आपल्या धार्मिक संस्कारांतून मिळालेली असते. मग ती श्रद्धा देवावरची असेलच असे नाही. माझं श्रद्धास्थान शिवाजी महाराज आहे. जेव्हा केव्हा मला कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं तेव्हा निर्णय घ्यायला शिवरायांच्या जीवनपटाचा संदर्भ मला उपयोगी पडतो.

तरुण आजीबाई: मला वाटतं धर्म हा तितकासा महत्वाचा भाग नाही. आपण चर्चमध्ये जातो का मंदिरात हा सुद्धा महत्वाचा भाग नाही. (आणि मग त्यांनी त्यांच्या चर्चच्या जाण्यावरचा एक अनुभव सांगितला).

दुसरे तरुण पिता: मला वाटतं आपण चर्चला जाताना जरा जागरुक राहणेक आवश्यक आहे. माझी मुलगी मिशनरी शाळेत जायची. तिच्या शाळेच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आम्ही तिला चर्चमध्ये सुद्धा घेऊन जात असू. तर तितल्या धर्मप्रचारकांना वाटले की आम्ही ख्रिश्चन धर्मच स्विकारायला हवा. ते दर रविवारी आमच्या घरी येऊन आम्हाला धर्मांतराबद्दल बोलत असत. मग आम्हाला एकदा त्यांना कडक भाषेत सांगावे लागले की बाबांनो आम्ही तुमच्या धर्माचा आदर करतो पण आम्हाला आमचा धर्म प्रिय आहे. आम्हाला तुमच्या धर्मात यायची गरज नाही. पण या सगळ्या घडामोडीदरम्यान आमच्या मुलाला धर्माची ओळख झाली.

आयोजक: ही धर्माची ओळख म्हणजे काय? मुलांना आपला धर्म म्हणजे काय हे कसे समजवावे?
एक पालक: धर्माची वेगळी अशी ओळख करुन द्यायची गरज नाही. आपण आपले सण-वार साजरे करावेत. निमित्त साधून मंदिरात जाऊन यावे. तसेच आपल्या आचरणातूनच मुलांना हळू-हळू धर्माबद्दल माहिती करून द्यावी.

आयोजक: पण ही माहिती कधी, कोणत्या वयात द्यावी?
एक पालक: मला वाटते यासाठी वयाची अट नाही. ही एक दैनंदिन जीवनातून शिकन्याची बाब आहे. जसे की मूल खूप लहान असताना त्याला तुम्ही रामकृष्णाच्या गोष्टी सांगू शकता, थोडे मोठे झाल्यावर काही श्लोक शिकवू शकता, तसेच अजून थोडे मोठे झाल्यावर त्याला गंध लावणे, मांसाहार न करने ह्या आपल्या धर्मातल्या गोष्टींची माहिती देऊ शकता.

आयोजक: मांसाहाराचा विषय निघाला आहे. तेव्हा तुम्ही पालक तुमच्या मुलांच्या आहाराबद्दल काय करता किंवा करू इच्छिता?
एक तरूण माता: आम्हाला वाटते आमच्या मुलांने बीफ व पोर्क, विषेशतः बीफ खाऊ नये. पण त्याचे मित्र जर ते सगळे खात असतील त्याला आडवणे आवघड आहे. कारण त्याच्या मित्रांपासून वेगळा पडणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. तर मग आम्ही त्याला म्हटले की तुला खायचे असेल तर खाऊन बघ. पण रेड-मीट आरोग्याला चांगले नसते. तेव्हापासून तो बाहेर असताना स्वतःच रेड-मीट नाही ना हे विचारुन घेऊन मगच खातो.

आणखी एक तरुण पिता: मला वाटतं काही खाल्ल्यामुळे बुडेल इतका आपला धर्म "हलका" नाही. पुर्वी मांस खाल्ले म्हणून आपण आपल्याच लोकांना धर्मबहिष्कृत केले. ते मुसलमान झाले. पुढे ब्रेड पावाच्या तुकड्यांनी आपले बांधव ख्रिस्ती धर्मात गेले. आता तरी आपण हे विचार सोडायला पाहिजेत. बाटतो वगैरे ह्या कल्पना आपण आत्ता नाही सोडल्या तर कधी सोडणार. आपणच सुरुवात करु या त्याची... माझ्या मुलीने कोणताही आहार घेतल्याने तिचा धर्म बुडणार नाही असे मी तिला सांगत असतो.

आणखी एक तरुण पिता: आणि हे करु नका ते करु नका असे सांगितल्याने मुलांना आपल्या धर्माबद्दल नसलेले गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा आपल्या धर्मात चांगल्या गोष्टी करण्यासाठी कसे प्रोत्साहन दिले जाते हे दाखवून दिले पाहिजे. आणि अगोदर चर्चेत म्हटल्याप्रमाणे मुलांना धर्माचा, श्रद्धेचा उपयोग कठीण प्रसंगी मार्ग काढण्यासाठी करता यावा.

आयोजक: (येथे वाढलेल्यांना उद्देशून) तुम्हाला काय वाटते? तुम्हाला धर्माचा/श्रद्धेचा कठीण प्रसंगी फायदा झालाय?
अ.म.त. : मी धर्माचा आदर करतो पण धार्मिक वगैरे नाही. मला अथर्वशिर्ष येते पण जर कधी खरेच कठीण प्रसंग आला तर मी "देवा मला वाचव" असे म्हणत बसणारा नाही. तर त्या वेळी मी सल्ला घेण्यासाठी माझे आई-बाबा अन तुम्ही सगळे जे त्यांच्यामुळे माझ्या जीवनात आलात आणि माझे मित्र बनलात यांच्याशी संपर्क करीन.

अ.म.ती. : हम्म, मी लहानपणापासूनच धार्मिक वगैरे नव्हते. पण माझा भाऊ होता. त्याच्याकडे धर्मावरच्या व्हिडिओ, पुस्तके वगैरे बरेच असत. पण आता मोठा झाल्यावर तो अगदी निधर्मि झालाय. आणि पहायला गेले तर मीच त्याच्या पेक्षा जास्त धार्मिक आहे असे म्हणता येऊ शकेल. पण संकटाच्या वेळी वगैरे मला काही धर्मामुळे फायदा होईल असे वाटत नाही.

आणखी एक तरुण पिता: मला वाटतं आपण धर्माकडुन प्रत्यक्ष फायद्याची अपेक्षा न ठेवता आपल्याजवळ जे जे चांगले आहे ते ते देऊन या समाजाला मदत करावी. जसे की योग, मेडिटेशन, ईतर धर्मांचा आपल्या धर्मात राहून आदर तसेच स्विकार या गोष्टी आपण या समाजाला देऊ शकतो. आणि त्या आवश्यकही आहेत.

आयोजक: बरे आता आपल्या धर्मामुळे या समाजात एकरूप होण्यासाठी आपल्याला काही आडचणी येतात का? त्या कशा सोडवाव्यात?
आणखी एक तरुण माता: आडचणी अशा विषेश वाटत नाहीत. पण मुलांचे प्रश्न मात्र फार खोचक वाटतात. कारण येथे मुले भीड-भाड न ठेवता बोलतात. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांचे समाधान होईल अशा प्रकारे आजच्या काळात लागू होणार्‍या गोष्टींतून धर्म समाऊन द्यावा लागतो. उदाहरणार्थ आपण मंगळसुत्रा, बांगड्या, टिकली का लावतो, आपल्याला येवढे जास्त देव का, वगैरे.

एक शिक्षिका: मला वाटतं आपल्या मुलांना या समाजात एकरूप होऊन वाढता यावे यासाठी आपणही काही गोष्टी पाळायला हव्यात. जसे की मुलांना टिळा/टिकल्या लावून शाळेत पाठवायची गरज नाही. माझ्या वर्गात एक मुलगा भस्माचा टिळा लाऊन यायचा. त्यावरुन त्याला त्याचे मित्र अनेक प्रश्न विचारतच असत, चिडवत असत. अर्थात त्या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नसल्याने व मित्रांच्या चिडवण्याने त्याच्या कोवळ्या मनात धर्माबद्दल गैरसमज तसेच चीड निर्माण झाली नाही तर नवल.

एक माता: आम्ही जसे गणपती, दिवाळी वगैरे आपले सण साजरे करतो तसेच येथील ख्रिसमस, हॅलोवीन सुद्धा साजरे करतो. मी टर्की खात नाही पण मुलांना आणि त्यांच्या बाबांना करुन देते. त्याने मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख राहते तसेच त्यांच्या मित्रांपासून वेगळेपण सुद्धा वाटत नाही.

अशा प्रकारे दोन्ही संस्कृतीचा सूवर्णमध्य साधला जावा असे सर्वच उपस्थितांचे मतैक्य झाले.

आयोजक: बरं कोणाला आपल्या सांस्कृतीक बाबींमुळे जसे की साडी नेसणे, काही अनुभव आले आहेत का?
एक माता: हो, माझ्या मुलाला कदाचित माझ्या साडी नेसून त्याच्या मित्रांसमोर त्याच्यासोबत राहण्या बद्दल नाराजी होती. तसे त्याने बोलून सुद्धा दाखवले. पण मी त्याला म्हटले की माझ्या कपड्यांची बाब ही माझी आहे. कपड्यांनी कधी कोणी लहान-मोठा ठरत नाही. तुला जसे कपडे घालायचेत तसे घाल पण माझ्या कपड्यांची निवड मलाच करु देत. त्यानंतर तो या विषयावर काही बोलला नाही तसेच तो नाराज आहे असे सुद्धा कधी जाणवले नाही.

या भागाचा सारांश काय तर प्रत्येक माता-पिता आपल्या मुलांना आपली संस्कृती जपत इथल्या मुख्य प्रवाहात मिसळता यावे यासाठी धडपडणारे होते. या भागची सांगता आयोजकांतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या प्रतिनिधिने खूप छान केली. मला नक्की शब्द आठवत नाहियेत. त्यांनीच येथे ती प्रतिसादात लिहावी ही त्यांना विनंती.

तळटीप: तरुण पिता/पिता याचा येथे "ज्यांची मुले अजून लहान (बालवयातील आहेत)" असा अर्थ अभिप्रेत आहे. तसाच तरुण आजी-आजोबांचा सुद्धा.

No comments: