Thursday, November 22, 2007

आंगणातील देवडांगर


बालपणी आईच्या मदतीने लावून वाढवलेल्या झेंडू, सदाफुली, अबोली, मोगरा, शेवंतीच्या फुलांसोबतच वांगी, टोमॆटो यासारख्या मेहनवाल्या भाज्या त्यासोबतच कोहाळा, दुधी भोपळा, दोडका, पारसा दोडका, कारली, देवडांगर, वाल अशा स्वत:च वाढणा-या वेली-भाज्या यांनी आमची परसबाग नटून जायची. त्यात डाळींब, सिताफळ, रामफळ, लिंबोणी, कडूलिंब, सुबाभूळ, उंबर ही झाडे सुद्धा आमच्या विशाल आंगणात दिमाखने डोलत. त्या सगळ्या आठवणींना या चित्राने पुन्हा ताजे केले. हे चित्र आमच्या आंगणात या वर्षी आलेल्या देवडांगराच्या वेलीचे आहे. आता नवीन घर बांघल्यापासून तशी मोठी बाग नाही. पण जमेल तेवढे काम करत माझी आई आम्हा सर्वांच्या आठवणी काढत या बागेत काम करते आहे, पंखात बळ आलेल्या तिच्या लेकरांचं कौतुक करत पण स्वतःच्या एकटेपणाची बोच मनात ठेवत आला दिवस आनंदी करण्याचा प्रयत्न करते आहे असं मला हे डांगर सांगत आहेत.
आमच्या बालपणी हे देवडांगर एका खोलीतली अर्धिअधिक जागा व्यापून टाकत. घरी आलेल्या पाहुण्यांना जाताना आम्ही भाज्या, आणि हे डांगर भेट म्हणून सोबत देत असू. आषाढी कार्तिकी एकादश्या, महाशिवरात्री अशा उपवासांना या देवडांगराच्या फोडी भल्या मोठाल्या फराळतला एक भाग असत. तसेच यांची भाजी सुद्धा मस्त होते. या देवडांगराला चक्की, पांढरा भोपळा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. बोली इंग्रजीत याला "व्हाईट पंपकीन" असे म्हणतात. आमच्या अमेरिकन मित्रांना हा फोटो विलक्षण आवडला कारण त्यांनी आतापर्यंत असा पंपकीन पाहिलेला नाही.
गार पावसातला सुगंध पसरलेला, पहाव तिकडे चोहीकडे पसरलेला हिरवाकंच शालू, सुगीतल्या कामांची शेतक-य़ांची लगबग, त्यातच आनंद द्विगुणीत करुन द्यायला येणारे नागपंचमी, दसरा, दिवाळी यासारखे सण आणि आंगणातल्या बागेत फुललेली आमची बाग. त्या बागेचा अविभाज्य घटक असलेल्या या डांगराने माझ्या आठवणीतला एक कप्पा व्यापून टाकलेला आहे.

No comments: