Wednesday, December 5, 2007

गावरान (देशी) बाजरी नष्ट झाली

पूर्वप्रसिद्ध: उपक्रम...
http://mr.upakram.org/node/895

बाजरीच्या एका कणसात शेकडो फुले असतात. त्या फुलांवरील परागकण (नाव बरोबर आहे ना?) दुसर्‍या फुलांवर पडले की बाजरीच्या दाण्यांची वाढ सुरु होते. हे परागकणांचे वहन वार्‍याने होत असते. एका शेतातल्या बाजरींचे परागकण दहा-पंधरा किलोमिटरपर्यंत दूर असणार्‍या दुसर्‍या शेतात सहजपणे वापरले जातात. असे घडणे हे नित्याचे आहे. सुगीच्या काळात असे वेगवेगळ्या पिकांवरचे, तणांवरचे करोडो परागकण आपल्या आवती भोवती आपल्या नकळत दरवळत असतात. त्यांच्या या दरवळण्याने वातावरणात एक प्रकारचे चैतन्य, आल्हाददायकता असते. पण या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असताना बाजरीच्या बाबतीत एक फार वाईट घटना घडत गेली आहे. परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापिठात तसेच राजस्थानातल्या कृषी विद्यापीठात यावर संशोधन चालू आहे.

हरितक्रांतीच्या पर्वात उत्पन्न वाढवण्याच्या सपाट्यात शेतकर्‍यांनी संकरीत (हायब्रीड) बियानांचा सर्रास वापर सुरु केला. त्यात पूर्वापार चालत आलेले नैसर्गिक बियाणे वापरणे बंद होऊ लागले. पण या संकरीत बाजरीची चव थोडीशी कडवट असल्याने काही शेतकरी तरीही त्यांच्याजवळचे पारंपारिक बियाणे वापरुन स्वतःला खाण्यापुरती बाजरी पिकवत. आम्ही पण त्यातलेच. संकरीत बियाणांमुळे दहा मनाच्या ऐवजी आमच्या शेतात साठ-सत्तर मन बाजरी व्हायला लागली होती. त्यात इतर नवीन पिके तर वेगळीच. या वाढलेल्या उत्पन्नामुळे आम्ही शेतकरी आनंदी होतो. पण...

गावरान (देशी) बाजरीच्या अरुंद पाट्यालगत दूरदूर पर्यंत संकरीत बाजरीची पिके जोमाणे घेतली जात होती. त्यांच्या परागकणांनी देशी बाजरी संकरीत होत होती. पाहता पाहता देशी बाजरी साधारणतः २००१-२००२ पर्यंत नामषेश झाली होती. :(

काय गमावले:
१. गावरान बाजरीचे तोंडाला पाणि सोडणारे आता ते रुचकर पदार्थ इतिहासात जमा.
२. आयुर्वेदात सांगितलेले बाजरीचे गुणधर्म बदलेले असल्याने आयुर्वेदिक उपचार पद्धतीतून बाजरी बाद होण्याची भिती. बाजरी सोबत या गटात अनेक भाज्या, फळे, कडधान्ये असू शकतात. उदा. केळी पित्तनाशक असते. पण पुण्याच्या एका आयुर्वेदाचार्यांच्या रुग्णांच्या तक्रारीनंतर त्यांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले की खते, किटकणाशके, वगैरे रसायणे वापरल्याने पुण्यात मिळणारी बहुतांश केळी पित्तवर्धक आहे. (त्या आयुर्वेदाचार्यांचे नाव विसरलो.)

1 comment:

Prakash Ghatpande said...

आमच्या घरात कायमच बाजरीची "दशमी "केली जायची . दशमी म्हणजे बाजरीच्या पीठात पाण्या ऐवजी दूध घालून तयार केलेली भाकरी. ताज्या भाकरीवर तूप टाकून खाल्ले जायचे. पण मला मात्र शिळी दशमी प्रिय. कारण ती कुस्करता येते.दूध-दशमी-गूळ, दूध-दशमी-केळं, तूप-दशमी-गुळ , तुप-दशमी हा प्रकार फक्त ताजी असेल तरच. भात हा फक्त सणावारीच केला जायचा. त्यामुळे मी भाज्या आमटी खात नसे. मग कधी कधी आमटी दशमी बळेच खायला लागायची. दशमीला पापुद्रे यायचे, भाकरीला नाही. प्राथमिक शाळा घराच्या (वाडा) मागच्या दारातून जवळ तर माध्यमिक शाळा घराच्या पुढच्या दारातून जवळ. त्यामूळे दुपारचे जेवण घरी. इतर वाड्या वस्त्यांवरील मुल. भाकरी, चटणी. कांदा, लोणचं फडक्यात गुंडाळून आणत. तोच त्यांचा डबा असे. एखाद्या कडे कोड्यास असले तर मजाच. [ कोड्यास- कोरड्यास काही तरी ओले हवे या गरजेतून निर्माण झालेला शब्द, कालवण या अर्थाने] बाजरी हेच पीक तिथे सार्वत्रिक असल्याने गावरान "बेनं "( बियाण या शब्दाचा अपभ्रंश) हे जाणीव पुर्वक जतन केले जायच. जोंधळा (ज्वारी) हे २ नं चे पीक होते. तेव्हा सुटीत पुण्यात आल्यावर पण मामीला माझ्यासाठी बाजरीचे पीठ करुन आणावे लागे.
हायब्रीड चालू झाल आन् ती चवच हळू हळू नष्ट झाली.
प्रकाश घाटपांडे