Wednesday, April 25, 2012

पाटलांचे सेतुबंधन


आपल्या मराठीत खास वल्ली लोकांना त्यांच्या स्वभाव आणि कर्तबगारी नुसार हमखास विशिष्ट विशेषणे मिळालेले आपण पाहतो. अगदी पंचयतीच्या निवडणूकीत पडलेले आमचे लोकनेते मा ना रा रा श्री शरदचंद्रजी शिंदे-पटिलसाहेब यांच्यासारख्या मान्यवर मंडळी पासून ते गल्लीतल्या बेरक्या बबन्या पर्यंत. अशीच एक वल्ली म्हणजे आमच्या गावचा मुकुंदा. "लय भारी गाडी" हे बिरूद त्याला तसं कोवळ्या वयातच मिळालं होतं. पुढं शिकून पुण्यात नोकरीला लागल्यावर त्याला "अगदी हरहुन्नरी व्यक्तिमत्व बरं का हो" अशी पदवी आपसूकच मिळाली होती. आणि आता त्याला इथे अंग्लदेशात versatile, multifaceted, अशा काही-बाही विशेषणांनी संबोधलं जातं.  

हा रांगडा पण polished मुकुंदा जेव्हा अमेरेकेत पहिल्यांदा पोचला तेव्हाची हि एक घटना. मी त्याला विमातळावर आणायला गेलो होतो. त्याचं विमान वेळेच्या अगोदर आल्याने साहेबांची स्वारी विमानतळाबाहेर arrival ला येऊन आमची वाट पाहत उभी होती. प्रवास कसा झाला म्हणून विचारले तर साहेब म्हणाले, "अगदी मस्त. पण इथे तुझी वाट पाहत असताना वेळेचं थोडं चीज करता आलं असतं तर बरं झालं असतं. पण नाही जमलं यार. करणार काय, साला अंघोळ न केल्याने अंगाचा वास येतोय अन ब्रश चेक इन ब्यागेत गेल्याने दात घासता आले नाहीत." या संदिग्ध वाक्याने माझ्या चेहऱ्यावर उडालेला गोंधळ बघून साहेबांनी रस्त्यावरच्या पाटीकडे बोट दाखवले. त्यावर लिहिले होते - "kiss & ride" (क्षणिक थांब्याची पाटी).

या पाटीमुळे याचे डोके ज्या राइडवर चडले होते ती  राइड पुढील प्रवासातही बऱ्याच अमेरिकन पाट्यांनी चालू ठेवली. त्याचे धक्के खात खात आमचा प्रवास सुरु झाला. थोडे पुढे आलो तर रस्त्याचे काम चालू असल्याच्या पाट्या आणि सूचना होत्या. "speed limit, caution road workers ahead, do not pass" अशा सगळ्या पाट्यांकडे सवयी प्रमाणे दुर्लक्ष करत मी गाडी हाकत होतो. पण हा भारी गाडी त्या सगळ्यांकडे मन लावून लक्ष देत होता. "किती हे जाचक नियम! आणि ते पाळायचे सुद्धा! आणि काय तर म्हणे nation of freedom!" असं काहीतरी एक पाटीकडे पाहत तो पुटपुटला. पुढे अजून एक पाटी अली मुकुंदाने निश्वास टाकला, "सुटलो रे बाबा एकदाचा."  ती पाटी होती gas exit ची. त्यानंतर जो काही ग्यास exit झाला कि माझ्या नाकाचेच काय कारचे सुद्धा गास्केट एकदाच उडाले. 

त्या ग्यास बॉम्ब पासून सुरु झालेली धक्क्यांची मालिका अजूनही अशीच चालू आहे. काही महिन्यापूर्वी त्यात एक भयंकर पर्व सुरु झालं. 

एका शनिवारच्या भल्या पहाटे दारावरची घंटा जोरजोरात ठोठावली जात असल्याने मी चरफडतच उठलो आणि डोळे चोळत दर उघडले. समोर मुकुंदा दत्त म्हणून उभा. मी स्वगतच म्हटले, "म्हणजे मघाशी याचा फोन आला ते स्वप्न नव्हते तर." मी पुन्हा बेडरूमकडे वळत असल्याचे बघून या परम मित्राने मला न्हाणीघरात ढकलले. 
"काय यार मुकुंदा, तुला कितीदा सांगितलं तुझ्या त्या सटकलेल्या गृपसोबत शुक्रवारी बसत जाऊ नको. आजून उतरली नाही तुझी आणि घरी जायच्या ऐवजी इथे येऊन तू मला पिडतोयेस." माझं बोलनं मध्येच काटून मुकुंदानं दुसरा गोळा फेकला, "फार महत्वाचं काम आहे. ब्रशला पेस्ट लाव आणि दात घासत-घासत माझ्या कार पर्यंत ये. आपल्याला आत्ता न्यूयार्कात जायचयं".
"का रे, सगळं ठिक आहे ना?", शिव्या घालायच्या आत काहि गोष्टींची पडताळणी करावी लागते म्हणून विचारणा सुरु केली, "देशातून कुणी येतय का?"
"सगळं ठीक आहे. देशातून कुणी येत नाहीये आणि आता प्रश्न बंद. दोन मिनिटात बाहेर ये." 

शिव्यांची लाखोली वाहात कसेतरी उरकून मी कारपाशी आलो. पाहतो तर काय, मला ड्रायवर सीटवर जाण्याची खून झाली. "च्यामारी, फुकटातला ड्रायवर समजलास का रे मला?" 
असं म्हणत गाडी सुरु केली. मनात शनिवार सकाळचे कांदे पोहे हुकणार याचं वाईट वाटत होतं. ते मुकुंदानं ताडलं.
"घराकडं काय बघतोयस? खिडकीतून कांदापोह्यांची प्लेट उडत तुझ्याकडे येणार नाहीये. एखाद्या शनिवारी पेह्याऐवजी बेगल खाल्याने तू लगेच इहलोकातून वैकुंठ लोकात पोचणार नाहीयेस."
थोड्या वेळात आम्ही महामार्गावर होतो. "मी घर घेतोय."
"काय, कुठं?" हा अजूनही रात्रीच्या नशेत होता का काय अशी मला शंका आली.
"न्युयार्कात."
आणि मी उडालोच.
"मुकुंदा, कधि-कधि तू अंमळ हुकल्यासारखा वागतो असं आम्हा सगळ्य मित्रांचं प्रामाणिक मत आहे. आणि मध्येच असं काहीतरी वागून तू ते सिद्ध करत असतो."

त्यानंतर त्यानं त्याचा न्युयार्कात आणि तेही मॅनहॅटनात घर घेण्याचा बेत समजून सांगितला. तिथल्या राहण्यातले प्रश्न, शाळा, पार्किंग तसेच कर्ज आणि खरेदीसाठी लागणारी सगळी माहिती गोळा करून साहेब पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले होते.

आम्ही घर बघितले. छान वाटले. पूर्वीचा रहिवासी defaulter बनल्याने बँकेने घर खूप कमी किमतीत विकायला काढले होते. दोन बेडरूम, दोन न्हाणीघर, छोटेखानी स्वयंपाकघर, खिडकीतून खाली दिसणारा झगमगाट, पार्किंग, आणि दहा-बारा मिनिटांवर मोठी बाग. मुकुंदा खिडकीतून परिसर न्याहाळत कुठेतरी हरवला होता. "नरीमन पॉईंटला घर घ्यायची खूप इच्छा होती. चला आता मॅनहॅटनमध्ये सही. आणि चौपाटी नव्हे तर सेन्ट्रल पार्क सही."
एजंट देशी होता. आणि आम्ही पहिलेच गिर्‍हाईक. त्याने ऑफर टाकली, "आजच फायनल करून टोकन द्या, अजून वीस हजार डॉलरची सूट मिळवतो तुमच्यासाठी." तरीही किंमत भारी होती. मुकुंदाने मदतीची विचारणा केल्यावर मी सुद्धा माझे चारआणे टाकले. आणि संध्याकाळ पर्यंत सगळी कामे उरकून परत निघालो.

"खूप महाग वाटत आहे रे," माझ्या मध्यामार्गीय मनाला अजूनही हा व्यवहार झेपत नाह्वता. "नको काळजी करू यार. इथे पैसा सुद्धा बक्कळ आहे. साला दुप्पट बिलिंग रेटवर प्रोजेक्ट मिळवतो का नाही बघ. आणि माझा बच्चू लहान आहे रे अजून. तो दुसरी-तिसरीत जाईपर्यंत जरा मॅनहॅटनचं जीवन जागून घेऊ. तोवर अर्थव्यवस्था नक्की सुधारेल. तेव्हा नफ्यात हे घर विकून पुन्हा बाहेर राहायला जायचं. त्यात काय एवढं!" मुकुंदाच्या या धडाडीला बघून  माझ्यासारख्या अस्सल मराठी माणसाला गुदमरल्यासारखे नाही झाले तर नवल.

पुढचे काही दिवस माझी गत "घोडं मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं ओरझर्‍यानं" या म्हणीतल्या त्या शिंगरा सारखी झाली होती.

एका संध्याकाळी मुकुंदाचा फोन आला, "पुढच्या रविवारी गृहप्रवेश बरं का रे." आणि मी उत्साहात उत्तर देणार तोच त्याच्या सौ ने दिलेलं पार्श्वसंगीतही कानावर पडलं, "काही नको. तुमच्या चांडाळ चौकडीला ग्राहप्रवेशाला बोलवाल आणि इथल्यासारखे तिथे पण तुम्ही सगळे सोबत पडलेले असाल पुन्हा दर विकेंडला. नव्या घरात पहिला पाहुणा माझा भाऊ असणार आहे. त्यानं शार्लेट वरून येण्यासाठी तिकीट सुद्धा काढलं आहे." असं संगीत ऐकण्याची खाशी सवय असल्याने मी ते काही मनावर घेतलं नाही हा भाग निराळा.

मुकुंदा आणि कुटुंब नवीन घरात स्थिरस्थावर झाल्यावर एका निवांत विकांताला आम्ही सहकुटुंब त्यांना भेट द्यायला गेलो. आमच्या स्वागतासाठी पाटील कुटुंब इमारतीबाहेर आले होते. एलेवेटर (लिफ्ट) मध्ये मस्तीत असलेलं एक तरुण जोडपं पण आमच्या सोबत होतं. मुकुंदाच्या तृतीय वर्षातल्या चिरंजीवांचे त्या जोडप्याकडे बारीक नव्हे, धडधडीत लक्ष होतं, अगदी डोळे फाडून. एकमेकांच्या मिठीत असलेल्या त्या अधीर जोडप्याने गालावर प्रेम कळ्या उधळलेल्या पाहून चि. पाटील त्यांच्या आई-वडिलांना म्हणाले, "आई-बाबा, आता तुमचा टर्न."

अशा काही बदलांना सामोरं जावं लागणारच असं मनाशी समजून घेऊन आम्ही घरात आलो. 

गप्पा-टप्पा चालू असताना असं कळलं कि न्यूयार्कला राहायला गेल्यापासून यांच्याकडे पाहुण्यांचा राबता जरा जास्तच वाढला होता. कुणी पर्यटनासाठी तर कुणी पासपोर्ट वगैरेच्या कामानिमित्त भारतीय वकिलातीत जाण्यासाठी, कुणी नोकरीच्या मुलाखतीसाठी तर कुणी प्रवासातल्या थांब्या दरम्यान, अशा विविध कारणांमुळे पाहुण्यांची रेलचेल चालू झाली होती. यातील कुणी एका-दोन दिवसासाठी तर कुणी मस्त पैकी आठवड्या भरासाठी असत तर कुणी कुणी केवळ एखाद्या दिवशी पार्किंग ची सोय करण्यापुरती. कधीही संपर्कात नसणारे दूरचे नातेवाईक, मित्राचे मित्र, स्नेह्यांचे स्नेही, अशा विविध रंगी विविध ढंगी पाहुण्यांच्या आगत-स्वागताने पाटील कुटुंबाचा पाहुणचाराचा उत्साह काही आठवड्यातच मावळला होता. पाहुणचारापेक्षाही त्रासदायक असा प्रकार म्हणजे शनिवार-रविवार मस्त ताणून देण्याच्या ऐवजी लोकांना टाईम चौक, वाल स्ट्रीटचा तो कठाळ्या आणि ती लिबर्टीमाता यांच्या दर्शनाला घेउन जाण्याचा. मुकुंदाच्या भाषेत सांगायचं तर, "एवढ्या नेमाने कोल्हापुरात लक्ष्मीच्या देवळात गेलो असतो तर लक्ष्मी प्रसन्ना होऊन समोर अवतरली असती."

या दुखण्यावर सगळ्यात पहिल्यांदा प्रथमोपचार सुरु झाले ते म्हणजे जो येणार त्याचे फोन न उचलणे, मेलला उत्तर न देणे आणि स्वतःहून कुणाला संपर्क न करणे. त्यात अनेक गमती जमाती झाल्या. एकदा एका दूरच्या मित्राने एका विकांताला न्यूयार्क बघायला सोबत येऊन मार्गदर्शन करता का म्हणून फोन केला. त्याला मुकुंदाने सांगितले कि आम्ही विकांताला काही घरी नाही आहोत. तर तिकडून उत्तर काय आले - "अरे वा छान झाले. मग आम्ही तुमच्या घरीच थांबू कसे. शिवाय तिथे पार्किंग ची सुद्धा सोय होईलच."

एकदा एका जुन्या सहकार्‍याने मेल टाकला, "माझा भाऊ शनिवारी भारतातून येत आहे. त्याला विमानतळावर घ्यायला जा आणि पेन स्टेशनावरुन इकडे येणार्‍या रेल्वेत बसवुन दे." साहेबांनी त्याच्या मेलला उत्तर दिले, "मी या विकांताला बाहेर गावी जात आहे." त्या विकांताच्या शनिवारी दहा वाजेपर्यंत झोप काढून झाल्यावर फेसाबुकात टाकले, "what a great feeling to sleep till 10am!". व्हायचे तेच झाले. त्या दूरच्या मित्रांनी प्रतिसादात यांचा तो इमेल जसाच्या तसा अडकवला. 

आम्ही परत आल्यावर आमच्या इतर मित्रांनी मुकुंदाच्या नव्या घर बद्दल चौकशी केली. आम्हाला सुद्धा हुरूप आला आणि आम्ही त्यांच्या घरी आणि काढलेले काही फोटो जनतेसाठी फेस्बुकावर चिटकवून दिले. आता आम्हाला काय माहित कि त्या विकांताला सुद्धा पाटील साहेब तीन-चार लोकांच्या लेखी "ऑन पेपर" परगावी गेलेले होते म्हणून! झाले, पुन्हा तोच किस्सा.

एके दिवशी हापिसात असताना मुकुंदाचा फोन आला, "उद्याची सुट्टी काढून इकडे न्युयार्कात ये." मी म्हटलं, "अरे बाबा, उद्या पुन्हा कामावर यायचं आहे. सुटी मिळणार नाही."

तर अजून एक बॉम्ब टकला, "अरे हा ऐतिहसिक दिवस असणार आहे मराठीच्या इतिहासातला." मी नेहमीप्रमाणे पुन्हा स्तब्ध होऊन काय ऐकायला मिळणार याची उत्सुकतेने वाट पहात होतो, "उद्या मराठी आणि न्यूयार्क मध्ये सांस्कृतिक सेतू उभा राहणार आहे. कारण मी नामांतर करतोय नामांतर."

याचं तर लग्न झालेलं. बायकोच्या आवडीचं नाव घेतोय का काय अशी शंका डोकं काढताच होती. तितक्यात, "आता पर्यंत मुकुंद खडके-पाटील म्हणून परिचित असणारा मी उद्यापासून मुकुंद खडके-मॅनहॅटनकर बनणार आहे."

आता मात्र मी चक्रावलो होतो, "अरे पागल झाला का काय? एवढे वजनदार आडनाव सोडून तू हे असले कसले भ्रष्ट आडनाव घेतोय?"

"कसले वजनदार अन कसले काय यार? विदर्भ पासून ते कोकणापर्यंत कुठेही दहा मराठी माणसं गोळा केलीस तर त्यात दोन-चार तरी पाटील निघतील. आमचे वाड-वडील पाटीलकी करायचे म्हणून आम्ही झालो पाटील. आपल्या जोश्याचे खानदान होते भिक्षुक म्हणून त्यांचे आडनाव जोशी. हे देशमुख, पटवारी, कुलकर्णी सगळे तसेच. आपल्याकडे कामानुसार, जातीनुसार, मान-पानानुसार, पदाव्यानुसार, तसच गाव आणि कुलादैवातानुसार आडनाव लावण्याची प्रथा आहेच रे. मंगेशकर, गावसकर, तेंडूलकर हे सगळे आडनाव तसेच तयार झालेले आहेत. 

"आपल्या धर्मात सुद्धा आडनावाला अजिबात किंमत नाही. कूळ, गोत्र, पूर्वजांची नावे, राहते स्थान, यांनाच जास्त महत्व आहे. आणि राहिला प्रश्न नामांतराचा, तर तो तर आपला मराठी लोकांचा फार आवडता विषय आहे. कधी विद्यापीठाचं नामांतर, कधी गावा-शहराचं नामांतर, कधी रस्त्या-चौकाचं नामांतर, तर आता दादरच्या रेल्वे स्टेशनाचं नामांतर. नामांतर हि तर आपली परंपराच आहे. म्हणून आडनाव बदलून मी काही चूक करत नाहीये तर उलट आपली मराठी प्रथा बंद पडण्यापासून वाचवत आहे. शिवाय मॅनहॅटनकर या आडनावाने मराठी आणि मॅनहॅटन यांच्यात एक नवा सांस्कृतिक सेतू निर्माण होणार आहे हे तर सांगायलाच नको. सांग, होणार का या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार?"

हा बुद्धिभेद ऐकून मला मात्र भोवळ आली होती.

2 comments:

bhaskarkende said...

This story is also posted on my favorite marathi site below... http://www.misalpav.com/node/21501

sachin said...

Good Story,please keep it up