Wednesday, August 27, 2008

ओरिसा - पोप महाशयांचे दु:ख

सध्या ओरीसात जे काही चालले आहे त्याने प्रत्येक भारतीयाला दु:खच होत आहे. तसेच आज पोप महाशयांनी सुद्धा या विषयाबद्दल त्यांची चिंता व्यक्त केली. मला बुवा त्यांची कमाल वाटते.

काही आठवड्यांपूर्वी याच पोप महाशयांनी ऑस्ट्रेलियात जाऊन तेथील मूळ वंशजांची माफी मागितली होती. त्यात त्यांनी "मूळ वंशजांची संस्कृती, धर्म व भाषा यांचा ख्रिश्चनांनी नाश केला" याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. या अगोदर पोप महाशयांनी अशा प्रकारच्या माफी अमेरिकेत व इतरत्र सुद्धा मागितल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला याबद्दल त्यांचा आदरच वाटणार. जर शांतीदूत म्हणजे जर कोणी असेल तर केवळ हेच अशी अनेकांची यामुळे समजूत होणे शक्य आहे!

पण जरा खोलात जाऊन बघितल्यास आपल्या लक्षात येईल की त्यांनी ज्यांची माफी मागितली ते आता ख्रिश्चन धर्मात जवळपास संपूर्णपणे मिसळून गेलेले आहेत. त्यांना त्यांचे धर्म, संस्कृती वा भाषांचे पुनरुज्जीवन करणे केवळ आशक्य आहे. जर पोप यांना खरेच पश्चताप होत असेल तर त्यांनी येथून पुढे असे होऊ नये याची काळजी घेतल्यास जगातले बरेच प्रश्न कमी होतील.

भारतापुरते बोलायचे झाल्यास पोप महाशयांनी खालील गोष्टी कराव्यात जेणे करून त्यांना आजच्या सारखा शोकसंदेश पुन्हा द्यायची वेळ येणार नाही.

१. भारतात मिशनर्‍यांनी धर्मांतरे पूर्ण बंद करावीत जेणेकरून स्थानिक लोकांची त्यांच्या धर्म/संस्कृती पासून नाळ तुटणार नाही.
२. मिशनरी शाळांतून सक्ती असणारे हे नियम पुर्णतः रद्द करावेत जेणेकरुन मुलांची त्यांच्या संस्कृतीशी नाळ ढिली होणार नाही...
मुलींनी टिकली न लावणे, सणावारंना सुटी न घेणे, सक्तीने ख्रिस्मस साजरा करायला लावने, बळजवरीने बायबलवरील "प्रोजेक्ट" करुन घेणे (न केल्यास खूप कमी मार्क देणे वा नापास करणे), डब्यात भारतीय जेवन आणन्यास मज्जाव करणे, वगैरे.
३. सेवाभावी मिशनरी दवाखाण्यातून कसल्याही धार्मिक शपथा वगैरे न घ्यायला लावता रुग्णांची सेवा करणे. (येशु महाराजांची आरती न म्हणनार्‍यास इलाज लागू होत नाही अशा तद्दन फोटारड्या गोष्टी सांगून आदिवासींना न फसवने).
४. भुकंप/पूर वगैरे नैसर्गिक आपत्तींच्या वेळी कोणाच्याही नावात बदल न करता मदत करने.
(सर्वांत महत्वाचे) - ५. आतापर्यंत धर्मांतरीत झालेल्या भारतीयांना त्यांच्या मूळ संस्कृती/धर्मा नुसार पुन्हा जगणे शक्य आहे. त्यांची माफी मागून त्यांना परत आपल्या मूळ धर्मात जायला सांगावे.

वरील मुद्दे २,३,४ सारख्या अनेक बाबी आहेत ज्या स्थानिक हिंदूंना ख्रिश्चनांच्या विरुद्ध भडकवतात. त्यांनी या टाळल्या तरच या दोन धर्मांमध्ये सलोखा निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतू मिशनर्‍यांचे डाव वेगळे आहेत. पुर्वांचलात ख्रिस्ती धर्म मोठा करुन आल्पसंख्यांक हिंदूंना आपल्या इशार्‍यावर नाचवायला सुरु केल्यावर त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी अदिवासी/वनवासी भागातील भारतीयांना आपले "टार्गेट" बनवून धर्मांतरांचा सपाटा चालवला आहे व या मार्गात कोणी स्वामी लक्ष्मानंद सरस्वतीसारखा आलाच तर त्यांचा काटा काढून बाकीच्यांना दहशत बसवून आपले काम फत्ते करण्याचा त्यांचा मानस दिसतो आहे.

आपल्याला पोप यांच्या भुमिकेबद्द्ल काय वाटते?

Tuesday, August 19, 2008

६१ वा स्वातंत्र्यदिन की ६२ वा?

मंडळी, हा आपला ६१ वा स्वातंत्र्यदिन की ६२ वा?

काही वॄत्तपत्रे म्हणतात एक्सष्टावा तर काही बासष्टावा. माझे मत... एकसष्टावा. का?
१५ ऑग. १९४७ ला पहिला स्वातंत्र्यदिन.
१५ ऑग. १९४८ ला दुसरा.
१५ ऑग. १९५८ ला बारावा.
१५ ऑग. १९६८ ला बावीसावा.
.
.
.
१५ ऑग. २००८ ला बासष्टावा.

मग ६१ च घोळ का? समजा आमचा बब्या एक वर्षाचा झाला... तर तो त्याचा पहिला वाढदिवस. दोन वर्षाचा झाला तर दुसरा. मात्र आपला देश ६१ वर्षाचा झाला तर तो त्याचा ६२ वा स्वातंत्र्यदिन, नव्हे का?

Friday, August 15, 2008

रशियाचा धडा

मागच्या आठवड्यात रशियाने एका धडाक्यात जवळ जवळ अख्खा जॉर्जिया पदक्रांत केला. कारण काय तर दक्षिण-ओसेटिया या जॉर्जियाच्या फुटीर भागात जॉर्जियाने पुन्हा आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली होती. त्यात जॉर्जिया पडला अमेरिकेचा मित्रदेश! त्यांचा प्रभाव आपल्या परसदारात वाढू देणे रशियाच्या पचणी पडणारे थोडेच होते! मग काय... शेकडो रशियन रणगाडे निघाले. एक-दोन दिवसात दक्षिण-ओसेटिया व अब्खाजिया हे फुटीर प्रांत रशियाच्या ताब्यात घेऊन जॉर्जियाची राजधानी त्बिलीसीच्या आवारात जाऊन उभे राहिले.

आता पुढे काय?

  • दक्षिण-ओसेटिया व अब्खाजिया हे फुटीर प्रांत रशियाशी जोडले जातील वा स्वतंत्र देश बनतील.

  • जॉर्जियाने नाटो सदस्यत्व घेऊ नये असे बंधन त्यांच्यावर घातले जाऊ शकते.

  • रशियन सैन्यावर केवळ जॉर्जियाच नव्हे तर इतर शेजार राष्ट्रे सुद्धा हल्ला करण्याचा केवळ विचारही करणार नाहीत.


आता श्रीलंकेचे उदाहरण...
श्रीलंकेन सैन्याने तमिळ वाघांच्या बिमोडासाठी निकराची चढाई केली आहे. अगोदर हवाई हल्ला करून नगरीकांना हुसकावने व तमिळ वाघांचा सफाया करत गाव्/शहर कबिज करने हा त्यांचा धडाका चालू आहे.

आणि आता कश्मिर...
कर्फ्यूच्या काळात लाखो लोक (त्यात खरे कश्मिरी किती व पाकचे भाडेकरू किती हा प्रश्न निराळा) पकिस्तानी झेंडे हातात घेऊन ताबारेषा ओलांडून मुजफ्फराबादला निघतात व त्यांना आडवता आडवता पोलिसांना/सैन्याला गोळ्या चालवाव्या लागतात... काही तासाच्या आत भारताने मुस्लिमांचे रक्त सांडले अशा आशयाच्या सचित्र बातम्या बीबीसी, सिएनएन सारख्या आघाडीच्या वृत्तवाहिन्यांवर झळकतात व खुलेआम भारताची बदनामी करतात.

तात्पर्यः
आपल्या नेतृत्वात हा प्रश्न सोडवन्याची इच्छाशक्ती संपली आहे का की ती कधीच नव्हती? जगातल्या दुसर्‍या क्रमांने मोठ्या सैन्याला कश्मिरप्रश्न हाताळता येत नाही यावर कोणाचाच विश्वास बसू शकत नाही.

वेळोवेळी जगातल्या मुत्सद्दी राज्यकर्त्यांनी त्यांचे प्रश्न तत्पुरता राजकीय तोटा सहन करून मोठ्या हिमतीने सोडवले आहेत. रशिया त्यांच्या शेजार देशातील गडबडीला तर श्रीलंका त्यांच्या फुटिरवाद्यांना तसेच हिमतीने हताळत आहेत. हेही तसेच एक उदाहरण. त्यातून भारताचे नेते/मुत्सद्दी (कोणी असतील तर) काही शिकतील का? आपले मिळमिळीत धोरण हा प्रश्न सोडवू शकेल का?

Thursday, January 10, 2008

सूर्यनमस्कार यज्ञ, शक्तिची उपासना

या वर्षी दुसर्‍यांदा अमेरिकेत हिंदू स्वयंसेवक संघ या संस्थेने सूर्यनमस्कार यज्ञ आयोजित केला आहे. या यज्ञ कालावधित वेगवेगळ्या ठिकाणी सर्व सहभागी लोकांनी मिळून कमित कमी दहा लाख सूर्यनमस्कार करायचे असा या यज्ञाचा निर्धार आहे. दररोज केवळ सात-आठ मिनिटे देऊन सुद्धा आपण सूर्यनमस्काराच्या माध्यमातून निरोगी राहू शकतो याची जाणीव लोकांना व्हावी तसेच व्यायामाची, योगासनांची गोडी निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा हेतू. आम्ही गेल्या वर्षी या कार्यक्रमात सहकुटुंब सहभागी झालो होतो. त्यासाठी आम्ही या संकेतस्थळावरुन चलतचित्रफित उअरवून घेतली होती व त्यासोबतच आम्ही सूर्यनमस्कार करत असू. यज्ञाच्या २१ दिवसाच्या कालावधित सूर्यनमस्काराची जी सवय लागली ती अद्याप अखंडपणे चालू आहे. अगदी भारतभेटीला गेल्यावर तिथे सुद्धा नातेवाईकांसमवेत आम्ही सूर्यनमस्कार करत असू.

या उपक्रमात या संस्थेव्यतिरिक्त अनेक स्थानिक संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, मंदिरे, वगैरे सुद्धा सहभागी होत आहेत. गेल्या वर्षी तर एका राज्याने तर इतर काही शहरांनी या यज्ञा दरम्यान योग-दिन जाहीर केला होता. आपल्या संस्कृतीचा असा जागतीक प्रसार होताना पाहुन मनाला आनंद तर होतोच शिवाय त्यामुळे इतरांचेही कल्याण होते आहे हे पाहून आत्मिक समाधानही मिळते.

आपण सुद्धा या उपक्रमात सहभागी होऊन स्वतःचा फायदा का करुन घेत नाही?

----
या लेखावर येथे चर्चा चालू आहे.

Friday, January 4, 2008

दंत (कथा नव्हे) अनुभव

आरोग्य पत्रिकात सगळे विद्वान सांगत असतात की तुम्ही कितीही पैलवान असाल पण जर दाताच्या आरोग्याकडे तुमचे लक्ष नसेल तर तुमच्या अरोग्याला तुम्ही सुरुंग लावलेत असे समजा. दात खराब असतील म्हणजे किडलेले असतील वा साफ केलेले नसतील तर तुम्ही खात/पीत असलेल्या प्रत्येक घासा सोबत/घोटासोबत तुम्ही त्या अन्नाचे मारेकरी पोटात पाठवत आहात. अन्नाची वाट लाऊन हे जीवजंतू स्वस्थ बसतीलच असे नाही तर तुमच्या पचन संस्थेवर तसेच पुढे शरीरात शिरुन आतल्या अनेक संस्थांवर ते हल्ले करत राहतात.

म्हणजेच निरोगी रहायचे असेल तर दातांना सुद्धा निरोगी ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य बनते. सुदैवाने वा दुर्दैवाने आम्हाला पाश्चात्य जीवनाबरोबरच भारतीय ग्रमीण तसेच शहरी जीवन सुद्धा चांगलेच अनुभवायला मिळाले आहे. या तिन्ही जीवनपद्धतीत आमच्या दंत आरोग्यावर वेगवेगळे परिणाम झाले. त्यांना येथे उतरवत आहोत.

ग्रामीण जीवन :
आमच्या परस बागेत तसेच गावात कडुलिंबांची संख्या भरपूर असल्याने कडुलिंबाची काडी हे आमचे दात साफ करण्याचे (केवळ घासन्याचे नव्हे) मुख्य साधन असे. कधी कधी बदल म्हणून मोगला, उंबर (औदुंबर), सुबाभूळ, वगैरे झाडांच्या काड्या सुद्धा आम्ही वापरत असू. फार कोवळी वा फार मजबूत नसलेली एक वीतभर काडी एका टोकाला आडकित्त्याने व्यवस्थित तोडून नंतर तिला हळू-हळू चावत चावत एका टोकाला एक इंचभर लांबीचा ब्रश बनवायचा. मग त्या मऊ पडलेल्या ब्रशने दातांच्या मधून तसेच हिरड्यांची सफाई करायची. ब्रशचे धागे नैसर्गिक रित्या तयार झालेले असल्याने त्यांत लहान मोठे तसेच मजबूत व मऊ असे सगळ्या प्रकारचे धागे असत. ब्रश तयार करताना दाढींचे पृष्ठभाग साफ व्हायचे तर नंतरच्या ब्रशमुळे दातांच्या मधले अन्नकण पूर्णपणे निघून जात. कडुलिंबाच्या औषधी गुणांमुळे घशातले जीवजंतूही मरुन जात व दिवसभर श्वास कसा मस्त तजेलदार रहात असे.

शहरी जीवन :
आमच्या दातांना थोडेफार ग्रहण लागले ते शहरात रहायला लागल्यावर. कडुलिंब न मिळाल्याने नाईलाजाने आम्हाला ब्रश-पेस्टचा सहारा घ्यावा लागला. आपल्याकडे अजूनही खूप चांगल्या प्रकारचे ब्रश वापरणे सामान्यांच्या आवाक्यातले नाही (किमती हजार रुपयांच्या पुढे आहेत). साधारण ब्रशने दांतांच्या मधले किटाणू जात नाहीत तसेच हिरड्यांची सुद्धा झीज होते. एकंदरीत शहरी पद्धतीने (ग्रामीण भागात सुद्धा) राहणार्‍या सर्वांच्या दांचे आयुर्मान प्रचंड कमी असते. पन्नाशीत बत्तीशी पूर्णपणे गमावलेले अनेक लोक आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. काही म्हणतात की ही आपल्या समाजाची संक्रमण अवस्था आहे. पण त्यासाठी काय दोन-तीन पिढ्यांनी आपले बलिदान द्यायचे? मी केवळ दातांचेच नाही तर त्यांच्या आयुष्याचे म्हणतोय. कारण निरोगी दात असतील तरच निरोगी आरोग्य.
बरे आपल्याकडचे डेंटिस्ट तरी काय मजेशीर. मी मुंबईतल्या एका चांगल्या डेंटिस्ट कडे सहामाई दंतसफाई साठी गेलो होतो. त्याने माझे दात साफ करायचे सोडून सल्ला दिला की तुझे दात साफ करायची काही गरज नाही कारण दात-हिरड्या फार व्यवस्थीत दिसत आहेत. आणि नेहमी-नेहमी अशी सफाई केल्याने तुझ्या हिरड्यांची झीज होईल (व्यवस्थित सफाई केल्यास हिरड्यांना इजा पोचत नाही हे मी त्याला शिकवायाची गरज पडावी?). मी म्हटलो की मला कधी-कधी दुर्गंधी आल्यासारखी वाटते. तर म्हणाला की तुझ्या दाताला शक्यच नाही! काय बोलणार, कप्पाळ!


पाश्चात्य जीवन :
इकडे अमेरिकेत जवळपास सर्व जनता दर सहा महिन्याला दंत-सफाई करुन घेते. प्रत्येक दाताचे हिरडीसोबतचे आंतर मोजले जाते. जर हिरडी घट्ट नसेल तर त्यावर उपाययोजना केली जाते. आणि जर एखाद्यच्या हिरड्यातून रक्त येत असेल वा त्यात किटाणू मर्यादेपेक्षा जास्त असतील तर त्याची हिरड्यांच्या शल्यचिकित्सकाकडून सखोल सफाई केली जाते (मला वाटते ०.००१ मिमि पर्यंत). येथे डेंटिस्ट विद्युत घारणी असलेला ब्रशच सर्वांना वापरायला सांगतात. तसेच ब्रश सकाळ संध्याकाळ करायला सांगतात. त्याच बरोबर ब्रशने दातांच्या सांधींमधून तसेच खोल हिरड्यांमधून अन्नकण निघत नसल्याने फ्लॉस वापरणे अनिवार्य असल्याचे सांगतात. भारतात फ्लॉस काय भानगड असते ते कित्येक औषध विक्रेत्यांना सुद्धा माहित नसते. मग प्रश्न पडतो की आपण पाश्चात्यांप्रमाणे ब्रश वापरण्याचे सुद्धा अंधानुकरणच करत नाही का?

दंत शस्त्रक्रिये विषयी :
भारतात सर्वसाधारणपणे रुट कॅनाल केलेल्या दाताच्या मुळाला काही वर्षात पुन्हा किटाणू संसर्ग होतो व बहुतेक वेळेला तो दात गमावण्याची पाळी आपल्यावर येते. त्याचे कारण समजावून घेताना असे लक्षात आले की अद्ययावत यंत्रसामग्रीच्या अभवाने भारतातल्या बहुसंख्य रुट कॅनाल शस्त्रक्रियेत दात साफ करताना त्याच्या मुळाशी जाणे शक्य होत नाही. तो भाग खूपच चिंचोळा असतो व तेथे खूप कमी किटाणू मावू शकतात. ते किटाणू त्रास देण्याच्या संख्ये येवढे वाढेपर्यंत अनेक वर्षे गेलेले असतात. पण या दीर्घ काळा नंतर आपल्यावर दात गमावण्याची वेळ आलेली असते.
हीच बाब दताला टोपी (कॅप) बसवताना वा पूल (ब्रीज) बसवताना सुद्धा प्रकर्षाने जाणवते. आमच्या सौ.च्या दातांवर भारतात बसवलेल्या चार टोप्या व एक पूल दोन-तीन वर्षात उध्वस्त झाले. कारणे काय तर पुन्हा अद्ययावत यंत्रसामग्री व योग्य धातूमिश्रण यांचा अभाव. त्यामुळे बसवलेल्या टोप्यांची कडा दताच्या आवरणाशी एकजीव होऊन न बसल्याने वा जेथे तो धातू संपून दाताचा पृष्ठभाग सुरु होतो तेथे खाच निर्माण होते. हीच खाच किटाणूंचे घर बनते व कालांतराने टोपी वा पूल उध्वस्त होतो.

यावर जाणकार अधिक व शास्त्रीय दृष्टीकोणातून योग्य माहिती देऊ शकतील. आम्ही आमच्या अल्प बुद्धिला जेवढे समजले तेवढे लिहिले. पण एक मात्र खरे की जर आमच्या पुरते बोलायचे तर ग्रामीण जीवना नंतर गमावलेले दंत आरोग्य पुन्हा मिळवले आहे म्हणून आम्ही आनंदी आहोत.

----
या लेखावर येथे चर्चा चालू आहे.