बालवयापासून कौटुंबिक जबाबदार्या, काबाडकष्ट करून घेतलेले शिक्षण आणि पुढे नोकरी व एकत्रित कुटुंबासाठी वाहून घेतलेले जीवन हा आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबप्रमुखाच्या जीवनाचा लेखाजोखा. यात कितीतरी मूक यातना, क्षणोक्षणी उराशी बाळगलेली परंतू कधीही पूर्ण न झालेली स्वप्ने, समाजाबरोबरच आप्तस्वकियांकडून झालेला मानसिक त्रास असा प्रचंड गाळ साचलेला असतो. या गाळात रुतून धीर खचलेल्या मनाने व क्षीण बनलेल्या शरीराने मग हा मध्यमवर्गी कुटूंब प्रमूख काळाशी तडजोडी करत उत्तर आयुष्याला खंगलेल्या अवस्थेत सामोरा जातो. त्यातही काही शारीरिक व्याधींचा ससेमिरा लागलेला असेल तर विचारायलाच नको. त्यात समाजही टिपण्ण्या टाकायला लागतो... "खूप कष्ट केलेत हो, आता थकलेत ते", "आता काय राहिलय? मुलं-मुली आपापल्या संसारात लागलेत. यांचं काम यांनी केलंय, आता सगळं भगवंताच्या हाती". आणि या अशा तिन्हीसांजेला कोणाला सुद्धा या पिकल्या पाणाच्या मनात राहून गेलेल्या स्वप्नांच्या ठाव-ठिकाणांची कल्पनाही नसते.
मात्र काही अपवाद असतात जे केवळ नातवंडासाठीच नव्हे तर पूर्ण समाजासाठीही आदर्श बनून जातात. थकलेल्या पंखात केवळ गरूडभरारी घेण्याची ताकदच नव्हे तर मनातही उमेद आहे हे ते सिद्ध करून दाखवतात. अशाच एका फिनिक्सला पाहण्याचे भाग्य मला लाभलेय, नव्हे त्यांच्या आशिर्वादाचा हातही माझ्या पाठीवरुन फिरला आहे. अशा या चिरतरुणाबद्दल लिहिणे हा सुद्धा माझे अहोभाग्यच.
दहा-पंधरा वर्षांपासून असंख्य व्याधिंनी त्रस्त असताना अन शरीर घराबाहेर पाऊल टाकायला साथ देत नसताना एखाद्या तरूण संशोधकाला सुद्धा थक्क करायला लावेल असे काही या व्यक्तिने केलय. या ऋषितुल्य व्यक्तिचं नाव उमाकंत रामदासी; आपल्या संस्कृतीनुसार माझ्यासाठी पितृतुल्य, माझे सासरे.
साधारण दहा-बारा वर्षापूर्वी मृत्यूशी झूंज देऊनही हा पठ्ठ्या सहिसलामत बाहेर आला. अजाराने शरीराकडून मुघली कर वसूल केला होता. शरीरात त्राण नसलं तरी मन मात्र अजूनही तरूणच होते. हे तरूण मन समाजासाठी काहीतरी करण्यासाठी जिद्दीने पेटून उठलेले होते. ज्या मातीत धर्म-संस्कृतीच्या रक्षणासाठी रामदास-शिवरायांपासून ते सावरकरांपर्यंत महान विभूती जन्माला आल्या त्या मातीत जन्माला येऊन किड्या-मुंगीसारखे जीवन जगणे या तरूण मनाला मान्य नव्हते. धर्म संस्कृतीसाठी काय करता येईल याच्या शोधात असताना त्यांना एक गोष्ट सापडली. बीड शहराच्या मध्यभागी बिंदूसरेच्या कडेवर एका मोठ्या उकीरड्यात आपल्या संस्कृतीचा एक मोठा वारसा नष्ट होत आहे हे लक्षात आले आणि तन-मन कामाला लागले.
साधारण एक हजार वर्षापूर्वीच्या काही समाध्या, त्यावरील शिलालेख यांचा अभ्यास होऊ लागला. जवळपासच्या शहरातील इतिहासतज्ञ, अभ्यासक, पत्रकार तसेच शहरातील मदत करु शकतील अश्या व्यक्तिंना श्री. उमाकांतराव रामदासींचे फोन यायला लागले. पुरातन पुस्तकांची पाने चाळली जाऊ लागली. बघता बघता एका ऐतिहासिक वारशाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी समाजधुरिणांची एक फौज कामाला लागली.
दाहाव्या व अकराव्या शतकात बीड शहरात एक महान ज्ञानी योगी रहात असत. ते दुसरे तिसरे कोणी नसून संत ज्ञानेश्वरांचे, मुक्ताबाईंचे अजोबा होत. त्यांची समाधी त्या उकीरड्याखाली सापडली. तिचे हे छायाचित्र.
या संशोधनाला पुढे सरकार दरबारी मान्यता मिळाली. या चळवळीतले कार्यकर्ते, नेते व हौशा-नौशांनी मिळून या समाधिस्थळाला शहरातील इतर महान ऐतिहासिक स्थळांच्या पंक्तिमध्ये बसवण्यासाठी कार्यक्रमांची रीघ लावली.
आता तेथे मुक्ताईंची पालखी पण त्यांच्या आजोबांच्या दर्शनासाठी थांबून जाऊ लागली आहे.
आणि हे कार्य सफल झाल्याच्या आनंदात हा फिनिक्स आता नवीन भरारी घेण्याच्या विचारात आहे.
------------------
या लेखावर अधिक प्रतिक्रिया मिसळपाव या संकेतस्थळावर आल्या आहेत. त्या वाचण्यासाठी
येथे टिचकी मारा.